२७/५/१९

नरेंद्र मोदींची त्सुनामी अन युतीचं चांगभलं

नरेंद्र मोदींची त्सुनामी अन युतीचं चांगभलं
-दादासाहेब येंधे (dyendhe@rediffmail.com)
'चौकीदार चोर है' असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वारंवार मोदींवर केलेली टिका, मावळते पंतप्रधान अशी तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगालच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केलेली मानहानी यावरच न थांबता नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत म्हणून तब्बल दोन डझन विरोधी नेत्यांनी मोदींविरुद्ध एकत्र येत चालवलेली धडपड मतदारांनी सपशेल नाकारली असून, युतीच्याच पारड्यात एकगठ्ठा मते टाकत पुन्हा देशात युती (एनडीए)सरकारलाच जणू पाचारण केले आहे. देशात ३०० पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा जिंकून एनडीए सरकारने विरोधकांची पळता भुई थोडी केली आहे.
महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती ३४पेक्षा जास्त जागा जिंकू शकत नाही, असे म्हटले जात होते. परंतु बारामती वगळता महाराष्ट्रात ४८ पैकी ४१ जागा जिंकत युतीने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. याचे श्रेय नक्कीच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना द्यावे लागेल. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युती करण्याचा उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय योग्य ठरल्याचे यातून स्पष्ट जाणवते आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान मोदींनी आपल्या सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील विकास कामांचे रिपोर्ट कार्ड जनतेसमोर मांडले. त्याचवेळी वंशवाद, भ्रष्टाचार, परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांवरून ते विरोधकांवर तुटून पडले. मोदींनी प्रचाराची दशा-दिशा आपल्या सोयीनुसार फिरविली आणि विरोधक त्यात अडकले. पक्षांतर्गत सर्वेक्षणाच्या आधारावर प्रचाराची रणनीती आखण्यात आली. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष एनडीएतून बाहेर पडला, तर मोदींनी बिहारमधील दुरावलेला मित्र मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जदयुला एनडीएमध्ये परत आणण्यात यश मिळविले. याचा परिणाम दोन्ही राज्यांत दिसला. आंध्रात जगमोहन रेड्डी यांनी नायडूंचा पुरता धुव्वा उडविला, तर तिकडे बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या सोबतीने भाजपाने जागा राखण्यात यश मिळविले. तेव्हा मोदींविरोधात कोण? असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर विरोधकांकडे नव्हते आणि नेमका हाच या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरला.
भारताच्या लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडले की, ६७.११ टक्के नागरिकांनी उत्स्फूर्त मतदान केले. लक्षात राहण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे पुरुष मतदारांपेक्षा महिलांनी जास्त प्रमाणत मतदान केले. आपल्या देशातील अर्धी लोकसंख्या २५ वर्षे वयाच्या आतील आहे. महिलांसाठी एनडीए  सरकारने नवनवीन योजना आणल्या होत्या. त्यांचा फायदा थेट महिलांना होऊन त्याचा पक्षाला विजयासाठी हातभार लागला. त्यातील काही योजना जसे, उज्जवला या योजनेनुसार गॅस कनेक्शन, जनधन खाते सुमारे ५० टक्के महिलांचे आहे. मुद्रा योजनेनुसार ७० टक्के कर्ज वाटप महिलांना झाले आहे. फेब्रुवारी २०१९ पर्यंत, युती सरकारने ९.२ कोटी शौचालये बांधल्याचा दावा केला आणि २८ राज्ये व केंद्र शासित प्रदेशांतील ५.५ लाख गावे शौचालय युक्त झाल्याचे घोषित केले, त्याचा थेट प्रभाव महिलांवर झाला. तसेच मोदी यांची टीव्हीवर प्रसारित झालेली व अक्षय खन्ना याने घेतलेली बिगर राजकीय मुलाखत रणनीतीही फायदेशीर ठरली. ज्यात त्यांनी स्वतः जेवण तयार करणे, कपडे धुणे आणि कविता लिहिण्याचे प्रसंग सांगितले. ज्यामुळे महिला मतदारांचे लक्ष चौकीदार असलेल्या प्रधानमंत्री यांच्याकडे आपोआप खेचले गेले.
सरकार व संघटना यांच्या या संयुक्त कामगिरीला योग्य पद्धतीने केलेली युती व जोडलेले मित्रपक्ष यांची चांगली जोड मिळाली. या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणून भाजपाला मिळालेले यश आहे.

७/५/१९

पिण्याच्या पाण्याचे नियोजन ही काळाची गरज

पिण्याच्या पाण्याचे नियोजन ही काळाची गरज
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
मुंबई आणि परिसरात पाणी कपात केल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पाण्याचे योग्य नियोजन महापालिकेकडून झाले नसल्यामुळे पिण्याचे पाणी मुंबईकरांना कमी पडत आहे. पाणी गळती व चोरीमुळे दररोज मुंबईचे ७५ कोटी लिटर पाणी वाया जात आहे. त्याकरिता गळती शोधणारे पथक सक्षम करून उपलब्ध पाण्याचा काटेकोरपणे वापर व्हावा म्हणून प्रेशर मॉनिटरिंग करावे. रेन वॉटर हार्वेस्टिंगची सत्ती, पाणी गळती व चोरी रोखणे, बेकायदा जल जोडण्या बंद करणे, वाया जाणारे पाणी कमी प्रमाण करणे. विहिरी आणि कूपनलिकांची युद्धपातळीवर दुरुस्ती करणे, वृक्षलागवड करणे, पाणी वाचविण्याकरिता नागरिकांमध्ये जाऊन जल प्रबोधन करणे आदीसह पाण्याचे विविध स्त्रोत विकसित करणे अपरिहार्य आहे.
पावसाचे पाणी अडविण्याची पद्धत


रेेन वॉटर हार्वेस्टिंग 
पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे. पिण्याचे पाणी मौलिक धन आहे. प्रवासात आपल्याला त्याचे महत्त्व कळते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पाण्यासंबंधी खूप छान उद्गार काढले आहेत. ते आजही तितकेच महत्त्वाचे आहेत.  ते म्हणतात,
"धन हे कुबेराच्या खजिन्यात नसते,
धन हे श्रीमंताच्या धनकोशात नसते, 
तर खरे धन हे पाण्याने भरलेल्या 
काळ्याभोर मेघांमध्ये असते,
बरसणाऱ्या जलधारांमध्ये असते". 
तलाव, नदी आणि भूजल साठा यांची जलसमृद्धी ही बरसणाऱ्या जलधारांमुळेच होते. म्हणजेच पर्जन्यमानावरच अवलंबून असते. म्हणून या पर्जन्याच्या मौलिक थेंबाची 'वाचवा-वाचवा' ही आर्त हाक आता प्रत्येकाने ऐकण्याची गरज आहे. इमारतींच्या छतावरील पाणी प्रत्येकाने स्वतःसाठी स्वयंशिस्तीने अडविले तर पिण्याच्या पाण्यावर येणारा ताण कमी होऊ शकतो. प्रत्यक्ष मुंबईत काही संकुलांमध्ये असे प्रयोग यशस्वी झालेले आहेत. प्रत्येक शहरातील, गावागावातील, वाड्यांमधील प्रत्येक घराच्या छतावरील पाणी वाया जाऊ न देता ते टाक्यांमध्ये संकलित केले तर पाण्याची उन्हाळ्यात होणारी समस्या सुटू शकते.
तसेच प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून घरातील नळ चालू करताना जाणीवपूर्वक हळू उघडावा. एकदम जोरात नळ उघडला तर पाणी वाया जाते. गरज संपल्यावर लगेचच नळ बंद करावा. बाथरूममध्ये एक बादली भरून ठेवावी. कमोड टाकीत दहा लिटर पाणी असते. प्रत्येक व्यक्तीने ती सकाळी एकदाच रिकामी करावी. इतर वेळी बदलीतील तीन मग (तीन लिटर) पाणी टाकावे.एकावेळी सात लिटर पाणी वाचते. तसेच आंघोळीसाठी अर्धी बादली(५ते ६लिटर) पाणी पुरते. चंबूतील (अर्धा लिटर) पाणी थोडे थोडे अंगावर घेत चोळून चोळून स्वच्छता होते. "घळाघळा ओतीले तांबे, अंगावरी थेंब ना थांबे" अशा स्नानने अंग स्वच्छ होत नाही. पाणी वाया जाते. मुख्य म्हणजे पाणी वापरताना भान सतत राखावे. 'मी एकट्याने पाणी वाचवून काय होणार, पाईप फुटून कितीतरी लाख लिटर पाणी वाया जाते. रोज कित्येकजण रस्त्यावर गाड्या धुतात. असा विचार करू नये. असे पाणी वाया जाते म्हणून अधिक पाणी वाचविणे हे माझे कर्तव्य ठरते, असा विचार करावा. जेणेकरून, आपले मनोबल वाढेल. 
राज्य सरकार आणि महापालिकेने एकत्र बसून पाणी टंचाईवर उपाययोजना करावी. सध्या अस्तित्वात असलेल्या धरणांप्रमाणेच नवीन धरणांचा विचार करावा. प्रत्येक विभागात विहिरी निर्माण कराव्यात. मुंबईत जमिनीखाली नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत. ते कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देता येऊ शकते.
दूध उत्पादकांचा रोजगार वाढावा

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणाऱ्या दुग्धव्यवसायाची तर कोरोनामुळ...