Ticker

10/recent/ticker-posts

माळीण, तळीये, इर्शाळवाडी आणखी किती बळी घेणार..?

डोंगराळ भागावर वाढते अतिक्रमण, त्यावर वस्ती होण्याचे वाढते प्रमाण, अतिक्रमण, डोंगरावरील खोदाई आदी कारणांमुळे देखील दरड कोसळण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे...

-दादासाहेब येंधे


यंदा दडी मारलेल्या पावसाने आता चांगलेच बस्तान बसवले असून तो राज्यात सर्व दूर पोहोचला आहे. कोकणात तर अतिदृष्टी झाल्यामुळे हाहाकार माजला आहे. जोरदार पावसामुळे रायगड मधील खालापूर तालुक्यातील इर्शाळ वाडीवर डोंगराचा काही भाग कोसळून अख्खे गावच्या गाव दरडीखाली दबून गेले. कुटुंबच्या कुटुंबे नाहीशी झाली. खालापूर येथील इर्शाळ गडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड १९ जुलैला रात्री ११ वाजता कोसळली. या वसाहतीत आदिवासी समाजाची घरे आहेत. रोजच्या जगण्यासाठी कष्ट करून झोपलेल्या इथल्या आदिवासी कुटुंबांना कल्पनाही नसेल की, आजची रात्र आपल्या आयुष्यातील अखेरची रात्र असेल किंवा आजच्या रात्री असं काही आपण गमावणार आहोत. खालापूर मधील चौक गावापासून सहा किलोमीटर अंतरावर डोंगरदरांच्या वेढ्यात मोरबे धरणाच्या वरच्या बाजूला ही आदिवासी वाडी आहे. 

या दुर्घटनेचे वृत्त कळताच एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, अंधार व पावसामुळे बचाव कार्यात अडथळा येत होता तसेच गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे बचाव कार्यात चिखल तुडवत, खाच-खळग्यांतून, डोंगरावरून इर्शाळ वाडीपर्यंत एक तासाचा प्रवास करून पोहोचावे लागले. 


माळीण आणि तळीये च्या आठवणी ताज्या झाल्या...


राज्यात याआधीही भूस्खलन होऊन घडलेल्या अनेक आठवणी या घटनेमुळे ताज्या झाल्यात. माळीण गावासाठी २३ जुलै २०१४ च्या रात्र काळरात्र ठरली होती. आजही घटना आठवली की अंगावर चर्रकन काटा येतो. संपूर्ण डोंगरच माळीण गाववर कोसळला होता. क्षणात हे गाव नाहीसे झाले होते. या घटनेला नऊ वर्ष उलटून गेली आहेत. माळीन हे गाव आंबेगाव तालुका तेथे आहे. जेव्हा गावावर डोंगर कोसळला तेव्हा या गावाची लोकसंख्या अंदाजे साडेसातच्या आसपास होती. ग्रामस्थ साखर झोपेत असताना डोंगर गावावर कोसळला होता. या घटनेत ४४ हून अधिक घरे आणि  गुराढोरांसह गाडली गेली होती. या दुर्घटनेची भीषणता इतकी होती की, सहा दिवसानंतर देखील मृतदेह बाहेर काढणे सुरूच होते. तब्बल १५१ लोकांनी या घटनेत आपला जीव गमावला होता. सकाळी एसटी घेऊन आलेल्या चालकामुळे या घटनेची माहिती मिळाली. मात्र, मोबाईल आणि इतर साधनांची मदत नसल्याने मदत पोहोचेपर्यंत बराच उशीर झाला होता. 


तळीये गावात देखील अशीच दुर्घटना घडली होती. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये हे गाव आहे. २२ जुलै २०२१ रोजी हा अपघात घडला होता. गावावर दरड कोसळली. या घटनेत ३५ घरे जमीनदोस्त झाली होती या घटनेत जे कामावर गेले होते तेवढेच जिवंत राहिले ही घटना एवढी भीषण होती की चार दिवस मातीच्या ठिकाणी मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते जवळपास ५३ मृतदेह अधिकाऱ्याकडून बाहेर काढण्यात आले चौथ्या दिवशी बचाव कार्य थांबवण्यात आले जे ३२ जण बेपत्ता होते त्यांना अखेर मृत घोषित करण्यात आले होते.


माळीण दुर्घटनेनंतर भूस्खलनतज्ञ डॉक्टर सतीश ठिगळे यांनी केलेल्या अभ्यासात असे लक्षात आले की, अशा दुर्घटना मुख्यतः जमिनीचे सपाटीकरण आणि त्यासाठी केलेल्या जंगलतोडीमुळे होतात. त्याचप्रमाणे अतिवृष्ट, डोंगराळ भागावर वाढते अतिक्रमण, त्यावर वस्ती होण्याचे वाढते प्रमाण, अतिक्रमण, डोंगरावरील खोदाई आदी कारणांमुळे देखील दरड कोसळण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डोंगरावर कमी होत असलेली वृक्षसंपदा दरड कोसळण्याचे आणखी एक मुख्य कारण आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आजवर झालेल्या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार अतिशय संवेदनशील भाग असलेल्या प्रदेशांमधील हस्तक्षेप तातडीने थांबवले पाहिजेत. मानवी कृत्यांबरोबरच हवामानातील बदलांचे गांभीर्य लक्षात घेऊन यापुढे काळजीपूर्वक पावले उचलावी लागणार आहेत. 

अशा घटनांना वाढती लोकसंख्या देखील कारणीभूत ठरत आहे. भारत हा जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश बनला आहे.  वाढत्या लोकसंख्येमुळे निवाऱ्याची गरज वाढत चालली आहे. त्यामुळे लोक जिथे जिथे जागा मिळेल तिथे दाटीवाटीने झोपडीवजा घरे बांधतात त्यातून डोंगरही सुटत नाहीत. सपाट जागा संपली की लोक डोंगर माथ्याकडे वळतात. सरकार तसेच वनखात्याचेही लोक ऐकत नाहीत. वेळोवेळी सरकारकडून इशारे देण्यात येतात. पण, नागरिक आपली घरे सोडायला तयार होत नाहीत.  इर्शाळ वाडीसारख्या मुख्य रस्त्यापासून एक तास चालत जाण्यास वेळ लागत असला तरीही अशा  ठिकाणी  आधारकार्ड तसेच पोलिओ लसीकरणदेखील वेळोवेळी होताना आम्ही ट्रेकिंगच्या वेळी पाहिलं आहे. त्यामुळे सरकारलाही दोष देता येणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या