Ticker

10/recent/ticker-posts

सौभाग्याचे लेणे असलेली महावस्त्र 'पैठणी...'

पूर्वी पैठण्यांमध्ये बावीस तोळे चांदी आणि वेगवेगळ्या वजनांचं सोनं वापरलं जात असे. साडेअकरा ग्रॅम सोनं वापरलेल्या पैठणीला 'बारामाशी', साडे सतरा ग्रॅम सोनं वापरलेल्या पैठणीला 'अठरामासी' आणि साडेचौतीस ग्रॅम सोनं असलेल्या पैठणीला 'छत्तीसमासी' म्हणत असत.

-दादासाहेब येंधे


पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा... असे गुणगुणत प्रत्येक मराठमोळ्या महिलांची, तरुणींची एक इच्छा असते की, आपल्याकडे एकतरी पैठणी असावीच असावी. त्यामुळे महाराष्ट्राचे 'महावस्त्र' अशी ओळख निर्माण झालेल्या पैठणीला नेहमीच महिलांकडून मोठी मागणी असते. त्यातही येवल्याची पैठणी जगप्रसिद्ध आहे. पैठणी येवल्याचीच हवी असे म्हणत महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून ग्राहक पैठणी खरेदीसाठी खास येवल्यात येत असतात. पैठणी हे सर्वात महागडे वस्त्र म्हणून ओळखले जाते. पण तरीही सणासुदीला आणि लग्नसमारंभासाठी पैठणी खरेदी केलीच जाते. त्यामुळे येवल्यात नेहमीच ग्राहकांची पैठणी खरेदीसाठी मोठी गर्दी  दिसून येते.

सातवाहन काळात तेव्हाच्या प्रतिष्ठान आणि आत्ताच्या पैठणमध्ये हातमागावर पैठणीचे निर्मिती होत असल्याचे संदर्भ सापडले आहेत. पण, खऱ्या अर्थाने १७ व्या शतकात पेशव्यांनी या उद्योगाला उर्जितावस्था दिली. पेशव्यांच्या घरातील स्त्रियांसाठी पैठणहून पैठणी साड्या मागवल्या जात असत. श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांनी त्यांना हव्या असलेल्या पैठणी नक्षीचा नमुना पैठणला पाठवून सुंदर रेशीम धोतर बनून घेतल्याचा उल्लेख संदर्भ ग्रंथांमध्ये आढळतो. पुढे पेशव्यांनी पैठणच्या पैठणी विणणाऱ्या काही कारागिरांना नाशिक जवळ येवल्यात स्थायिक केलं.

पेशवेकालीन पैठण्या सोळा हात लांब आणि चार हात रुंद असत आणि एकेका पैठणीचे वजन तीन साडेतीन किलो असायचे! पूर्वी पैठण्यांमध्ये बावीस तोळे चांदी आणि वेगवेगळ्या वजनांचं सोनं वापरलं जात असे. साडेअकरा ग्रॅम सोनं वापरलेल्या पैठणीला 'बारामाशी', साडे सतरा ग्रॅम सोनं वापरलेल्या पैठणीला 'अठरामासी' आणि साडेचौतीस ग्रॅम सोनं असलेल्या पैठणीला 'छत्तीसमासी' म्हणत असत. आता मात्र, चांदीच्या किंवा तांब्याच्या धाग्यांवर सोन्याचं पाणी लावून 'जर' तयार केली जाते. सध्या सेमी पैठण्यांमध्ये सिंथेटिक 'जर' वापरली जाते.


पूर्वी नैसर्गिक रंगात पैठणी बनत असल्याने त्या काही ठराविक रंगातच मिळायच्या. लाल बॉर्डरची काळी पैठणी म्हणजे 'चंद्रकळा' पोपटी रंगाची 'राघू पैठणी', निळ्या रंगाची 'निलीगुंजी', पिवळ्या रंगाची 'सोनकळी', गुलाबी रंगाची 'राणी', लाल हिरव्या रंगाची 'पसीला', काळ्या पांढऱ्या रंगाची 'गुजरी', तर कांद्याच्या रंगाची 'अबोली' पैठणी! अंजिरी, दुधी, सोनकुसुंबी रंगाच्या नावानंही पैठण्या असत. मात्र,आता अनेक रंगछटांमध्ये पैठण्या दिसून येतात.

पैठणीवरील नक्षीकामाचा सर्वात जुना प्रकार म्हणजे 'आसावली'. पदरावर, काठावर पानाफुलांची सुंदर वेलबुटी असलेला. पदरावर, काठावर गोलाकार मोर असल्यास 'मोर बांगडी'; पोपट दिसल्यास 'मुनिया', डार्क कॉन्ट्रास्ट बॉर्डर असेल तर 'कडियाल' पैठणी. चौकोनी फुलांच्या नक्षीला 'अक्रोटी' म्हटलं जात असायचं. सातवाहन काळात पैठणीच्या पदरात बगळे आणि राजहंस तर यादवकालीन पैठण्यावर कमळं जास्त असत. मुघलकाळात पानं, फुलं, पक्षी विणले जात असत, तर आता मोर, पोपट, वाद्यं, नथ, कमळ, कळस, राधाकृष्ण वगैरे दिसून येतात.

पूर्वी फक्त राजघराण्यांमध्येच पैठणी वापरल्या जात असत म्हणून पैठणीला 'महावस्त्र' असे म्हटलं जात असायचे. आता प्रत्येक चोखंदळ स्त्रीकडे एक तरी पैठणी असतेच असते आणि तिचं त्या पैठणी सोबत घट्ट रेशमी नात असतं.


पैठणी म्हटलं की, साडी हे समीकरण आधुनिक काळात बदलत आहे. फॅशनच्या असंख्य क्षेत्रात पैठणीने शिरकाव केला असून तिचे आंतरराष्ट्रीय स्थानसुद्धा उंचावले आहे. २००० मध्ये ब्रिटिश एअरवेजने विमानाचा बाहेरील भाग पैठणीच्या नक्षीने सजवण्यात आला होता. तसेच त्यांच्या तिकीट, पेन, पेन्सिल, टी-शर्ट अशा वस्तूंवर देखील पैठणीचे नक्षी झळकली होती. 

आजकाल तरुण वर्गामध्ये पैठणीची फॅशन म्हणून प्रसिद्धी होत आहे. जसे कुर्ती, जॅकेट, धोती, घागरा, ओढणी, ब्लाउज, वॉलपीस, पर्स, ट्रे, वन पीस, तोरण, आकाश कंदील अशा अनेक वस्तूंवर पैठणीचा ठसा उमटताना दिसून येत आहे. 

जॅकेट

पर्स


आकाश कंदील


आकाश कंदील

सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांनी पैठणी या कवितेत त्यांच्या आजीच्या पैठणीचे वर्णन केले आहे त्यातील काही ओळी...


वर्षा मागून वर्ष गेली 

संसाराचा सराव झाला 

नवा पोरा कडक पोत 

एक मऊपणा ल्याला 

पैठणीच्या घडी घडीतून 

अवघे आयुष्य उलगडत गेले 

अहेवपणी मरण आले 

आजीच्या माझे सोने झाले... 

अशी ही प्रत्येक महिलेच्या आयुष्याचे सोने करणारी सौभाग्याचे लेणे असलेली महावस्त्र पैठणी...




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या