श्रीक्षेत्र पंढरपूर हे भूतलावरचे वैकुंठ आहे आणि या वैकुंठाच्या राजाच्या दर्शनासाठी त्याला डोळे भरभरून पाहण्यासाठी आषाढी कार्तिकी एकादशीला विठ्ठलभक्त या तीर्थक्षेत्राची वारी करतात. सकल भक्तांची माऊली या पंढरपुरात नांदते. अठ्ठावीस युगं झाली हा मायबाप पांडुरंग भक्तांसाठी विटेवर आजही उभा आहे.
-दादासाहेब येंधे
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, असं म्हणलं तर वावगे ठरणार नाही. कारण गेले अनेक जन्म आपण काहीतरी सत्कर्म केले असणार म्हणूनच या भूवैकुंठावरी मनुष्य योनीमध्ये जन्म मिळाला आणि म्हणूनच या पंढरीच्या वारीचा हा अलौकिक सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्याचा आपल्याला योग आला आहे. साधू संतांचा सहवास लाभला आणि साक्षात या माऊलीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे आपल्याला भाग्य लाभत आहे. ही पंढरीची वारी नुसती पायी चालून शरीराने करायची नसते तर ती मनाने देखील करायची असते. पायी चालताना मन जर संसारात बुडाले असेल तर तो विठुराया कसा दिसणार? सांगा बघू. या विठू माऊलीला पाहण्यासाठी मनाचे कप्पे उघडून त्यातून संसारिक मळभ झाडून तो देहाचा देव्हारा स्वच्छ निर्मळ करावा लागणार आणि मग त्या विठ्ठलाला अंतरंगातून शोधलं की तो आपल्या आतमध्येच दडलेला आपल्याला दिसून येईल, आणि मग आपल्याला ही वारी पायी चालत पंढरीला जाऊन करावी लागणार नाही. कारण तो हरी, सखा, माऊली, मायबाप आपल्या कायारूपी पंढरीतच आपल्याला सापडेल.

आपली काया म्हणजेच आपला देह. हीच आपली पंढरी आहे आणि त्यात नित्य वास करणारा आत्मा हाच आपला विठ्ठल आहे. तो विठ्ठल, तो परमात्मा, परमेश्वर आत्मरूपाने आपल्या आतमध्ये राहतो. वास करतो आहे. सद् विचारांच्या प्रकाश रूपाने नांदतो असे म्हटले तर आपल्यापैकी अनेकांना तो काव्यरूपी, रूपकात्मक वाटू शकेल. पण, हेच अंतिम सत्य, हेच परम सत्य एकनाथ महाराजांनी त्यांना आलेल्या अनुभूतीतून शब्दांच्या माध्यमातून अभिव्यक्त केलं आहे. पुढे महाराज म्हणतात-
भावभक्ती भीमा उद्या किती वाहे |
बरवा सोबत आहे पांडुरंग ||
या भौतिक जीवनामध्ये मनुष्याचा आचार विचार, वृत्ती कशीही असली तरी त्याचा परमेश्वराप्रति असलेला भाव, श्रद्धा, भक्ती ही जर निखळ, निर्मळ, तरल आणि पाण्याप्रमाणे शुद्ध असेल तर ती भक्ती तो भाव चराचरांमध्ये असणाऱ्या ईश्वरचरणी पोहोचतोच. म्हणजेच या कायारूपी पंढरीमध्ये आत्मरूपी वास करणाऱ्या पांडुरंगापर्यंत जर आपला भाव पोहोचवायचा असेल तर तो भक्तीरूपी भीमेच्या माध्यमातूनच शक्य आहे. भीमा म्हणजे शक्ती, या भक्तीभावात प्रचंड शक्ती आहे आणि विठ्ठल भावभक्तीचाच भुकेलेला आहे.

दया क्षमा शांती हेचि वाळवंट|
मिळालासे थाट वैष्णवांचा ||
या ध्यान मध्ये आपण डोकावून पाहिलं तर आपल्याला या मनुष्य देहामध्येच पंढरपूर आहे, भीमाकाठचं वाळवंट आहे याची खात्री पटेल. या कायारूपी पंढरीमध्ये आत्मरूपी वास करणारा पांडुरंग हा भावभक्तीचा भुकेलेला आहे आणि या कायारुपी पंढरीमध्ये एक वाळवंट आहे जे वाळवंट या भूतलावरील वाळवंटप्रमाणे कधीच रुक्ष नसतं. तसं पाहिलं तर मानवाच्या देही काम, क्रोध, मद, मोह, सूडबुद्धी, अशांती यांनी घर केले आहे आणि म्हणूनच मनुष्य कधी सुखी, समाधानी, आनंदी नसतो तर तो नेहमीच सुखाच्या मागे, नाशवंत उपभोगांच्या मागे धावत असतो आणि त्यामुळेच तो सत्संगामध्ये रमत नाही. या भौतिक विकारांची गर्दी पार करून येणे त्याला अवघड होते. जेव्हा या विठ्ठल नामाचा महिमा त्याला होऊन जाईल. सावळ्या विठुरायाची सावळी बाधा त्याच्या मनाला, अंतःकरणाला होईल तेव्हा हे सारे विकार या भक्तीरुपी भीमा नदी धुतले जाऊन त्याचे मन शुद्ध होईल आणि या अशांततेच्या गर्दीतूनही त्याला या कायारुपी पंढरीत सद् विचारांची मांदियाळी दिसेल.

देखिली पंढरी देही-जनी-वनी |
एका जनार्दनी वारी करी ||
श्रीक्षेत्र पंढरपूर हे भूतलावरचे वैकुंठ आहे आणि या वैकुंठाच्या राजाच्या दर्शनासाठी त्याला डोळे भरभरून पाहण्यासाठी आषाढी कार्तिकी एकादशीला विठ्ठलभक्त या तीर्थक्षेत्राची वारी करतात. सकल भक्तांची माऊली या पंढरपुरात नांदते. अठ्ठावीस युगं झाली हा मायबाप पांडुरंग भक्तांसाठी विटेवर आजही उभा आहे. त्याचप्रमाणे संत एकनाथ महाराज म्हणतात की, ही आपली काया म्हणजे आपले शरीर सुद्धा एक तीर्थक्षेत्र आहे आणि आत्मारूपी पांडुरंग त्यामध्ये वास करत आहे. ही पंढरीची वारी पायी वर्षातून दोनदाच करता येते. पण, जेव्हा मन अस्थिर होईल तेव्हा तेव्हा या कायारूपी पंढरीची वारी करावी. भावभक्तीने वाहणाऱ्या भीमे काठी क्षणभर थांबावे. आनंदाच्या वाळवंटात विसावा घ्यावा. अध्यात्मुरूपी वेणूचा आस्वाद घ्यावा, इंद्रियांवर विजय मिळवून तो भक्तिमय गोपाळकाला प्रसाद म्हणून ग्रहण करावा आणि अशा कायारूपी पंढरीची वारी निरंतर सुरू ठेवावी ठेवावी.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.