छोटा गोविंदा जसा निर्भयपणे, आत्मविश्वासपूर्वक हंडी फोडून खरा हिरो होतो. तसाच आपल्या आयुष्याचा जीवनप्रवास असावा लागतो. श्रीकृष्णाच्या जन्मदिवसाची आठवण म्हणून देशभरात साजरा होणारा दहीहंडीचा उत्सव आजवर हेच सांगत आला आहे.
-दादासाहेब येंधे
दहीहंडीचा सण म्हणजे तरुणांचा जल्लोषाचा सण. दहीहंडीचा सण श्रावण महिन्याच्या नवमीला साजरा करण्यात येतो. या सणात दही भरून मातीचे मडके सजवून एका मोठ्या दोरीवर टांगले जाते आणि तरुणांचा एक गट थर लावून ती दहीहंडी फोडतो. हा सण मुख्यकरून महाराष्ट्र, गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पण, या सणाची वाढती आवड बघता हा सण भारतभर साजरा करण्यात येत आहे.

कृष्णापासून दह्याचे संरक्षण व्हावे यासाठी यशोदा आणि इतरही गवळणी दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे अशी कथा प्रचलित आहे. पण, श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.
दहीहंडीची प्रक्रिया अत्यंत धाडसाची आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी याचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, फळे इत्यादी भरुन एका उंच ठिकाणी हे मडके मोठ्या दोरीवर बांधले जाते. हे मडके फोडण्यासाठी तरुण मंडळी प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील एकावर एक पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. थर रचतात. या थरांच्या सर्वात वरच्या थरावर जो असतो त्याला गोविंदा असे म्हणतात. तो आपला तोल सांभाळत दहीहंडी फोडतो. हंडी फोडणाऱ्या तरुणांना, मंडळांना विविध भेटवस्तू देऊन गौरविण्यात येते. मुंबईत गोविंदांसह, महिला गोविंदाही या उत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. मुलांप्रमाणेच धाडस दाखवत थरांवर थर लावून या महिला गोविंडही दहीहंडी फोडतात.
श्रीकृष्णाच्या हाती दही लागू नये यासाठी यशोधने शिक्यावर ठेवलेली दह्याचे हंडी अतिशय कौशल्याने फोडून त्यातील दही खाणारा कृष्ण नि त्याचे सवंगडी यांच्या अनेक कथा पुराणातून आपल्याला वाचावयास मिळतात. कीर्तन, प्रवचन तसेच कितीतरी ग्रंथांतून हा कृष्ण प्रत्येकाला भेटत राहिला आहे. कृष्ण लीलांचाही अनुभव प्रत्येकजण या माध्यमातून घेत आले आहेत. संघटन, कौशल्य, नेतृत्वाचे अंग असलेला कृष्ण मात्र हंडी फोडतानाच समोर आला आहे. उंच मनोरा करत तोल न जाता दह्याची हंडी लीलया फोडणाऱ्या तरुणांसमोर आपल्या अख्ख्या आयुष्यातही मोहमाया, व्यसन यामुळेही तोल जाणार नाही याची काळजी सर्वच गोविंदांना घ्यावी लागेल, हेच त्यांच्यासमोर आव्हान आहे. गोविंदा ज्याप्रमाणे निर्भयपणे, आत्मविश्वासपूर्वक हंडी फोडून खरा हिरो होतो. तसाच आपल्या आयुष्याचा जीवनप्रवास असावा लागतो. श्रीकृष्णाच्या जन्मदिवसाची आठवण म्हणून देशभरात साजरा होणारा दहीहंडीचा उत्सव आजवर हेच सांगत आला आहे.
दहीहंडीच्या या खेळत अनेक जण पडतातही. मात्र, पुन्हा उभं राहून पडल्यानंतरही उभं राहता येणे आणि पडणे म्हणजे हरणे नव्हे तर पुन्हा तितक्यात शक्तीने, उत्साहाने उठून लक्षाकडे वाटचाल करणे हा अर्थच प्रत्येक वर्षीची दहीहंडी या तरुणांना श्रीकृष्णाचा बोध सांगत राहिली आहे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.