Ticker

10/recent/ticker-posts

लाडक्या बहिणींना सुरक्षाही पुरवा

"ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत..." बदलापूरच्या शाळेत चिमुरडीवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली अन दुष्कृत्याला वाचा फुटली.... 

-दादासाहेब येंधे

'निर्भया' प्रकरणानंतर देशभरात जन आक्रोश झाला होता १६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर सामूहिक अत्याचार केले होते. पण, मारेकऱ्यांनी तिला मरणाच्या दारात नेऊन ठेवले होते यानंतर तत्कालीन डॉ. मनमोहन सिंग सरकारने महिला अत्याचाराचे सगळे कायदे अधिक कडक केले होते. ते नव्या न्याय संहितेतही आले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तेव्हाच केवळ कायदे कठोर करून हा प्रश्न सुटणार नाही, असा इशारा दिला होता. जनतेचा आक्रोश शमविण्यासाठी कायदे कडक करू, फासावर लतजवू अशा घोषणा होतात. मात्र, त्यातून काही निष्पन्न होत नाही. असा प्रश्न न्यायसंस्थेला पडला होता. कोणत्याही समाजचिंतकालाही तसेच वाटेल आणि आज तोच प्रश्न अधिक प्रकर्षाने आपल्याला सतावत आहे.

देशाला हादरवून टाकणारे अजमेर अत्याचार प्रकरणातही फक्त सहा आरोपींना नुकतीच विशेष 'पोक्सो' न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. एकूण आरोपी आहेत १८ आणि याआधी शिक्षा झालेले केवळ सहा म्हणजे मोठ्या टोळीने केलेल्या नंगानाचानंतर ३२ वर्षांनी केवळ बारा आरोपींना शिक्षा होऊ शकली आहे. तेव्हा अजमेरच्या चिस्ती कुटुंबातील एका राजकारणात असलेल्या पदाधिकाऱ्याने आधी एका अल्पवयीन मुलीला फसवले. नंतर तिला ब्लॅकमेल करून दुसरी मुलगी, मग तिसरी... असे करत करत २५० मुलींना जाळ्यात ओढले आणि त्यांना ब्लॅकमेल करत अत्याचार चालू ठेवले. तेथील स्थानिक पत्रकाराच्या धडाडीमुळे हे प्रकरण उजेडात आले. 

मात्र, अजमेर या अनेक धर्मांच्या तीर्थस्थळातला हा दुराचार इतक्या वर्षांनीही समाधानकारक तार्किक शेवट गाठू शकलेला नाही. अनेक मुली शरमेपायी साक्षीला गेल्या नाहीत. पालकांना मुलींच्या भवितव्याची, संसाराची चिंता वाटली. हे प्रकरण उघड होऊ लागले तेव्हा बदनामीच्या भीतीने काही मुलींनी जग सोडले. महिला आणि मुलींवरील अत्याचाराची प्रकरणे किती गुंतागुंतीची आणि महिलांवर अन्याय करणारी होतात, याचे अजमेर प्रकरण हे कमालीची चीड आणणारे आहे.

यानंतर आता नुकतेच कोलकाता येथे एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. तर बदलापूरच्या एका नामांकित शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना कोणत्याही संवेदनशील व्यक्तीचे हृदय पिळवटून टाकील अशीच आहे. आपल्याला नेमकी वेदना काय होतेय, याचेही आकलन नसलेल्या या छोट्या निरागस मुलींच्या वाटेला आलेले भोग समजून घेण्यात ती शाळा, तिचे व्यवस्थापन, पोलीस खाते, महिला अधिकारी असे सारेच कमी पडले. पोलिसांकडूनही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झला. परिणामी, बदलापूरकरांनी ट्रेनच्या पटरीवर उतरून रेल्वे वाहतूक रोखण्याचेआंदोलन केले.

बदलापूरच्या एका नामांकित शाळेमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यापैकी एक मुलगी चार वर्षाची तर दुसरी सहा वर्षाची असल्याची माहिती मिळत आहे. शाळेमध्ये नुकताच सफाई कामगार म्हणून रुजू झालेल्या अक्षय शिंदे नावाच्या २३ वर्षाच्या नराधमाने हे अमानवी कृत्य केल्याची घटना घडली आहे. १२ ऑगस्ट रोजी ही घडलेली घटना आहे. अक्षय शिंदे हा १ ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीने कामावर रुजू झाला होता. मुलींच्या स्वच्छतागृहांची सफाई करणाऱ्या या आरोपीने त्याच्या कामाचाच गैरफायदा घेत मुलींवर  अत्याचार केला.

१२ ऑगस्ट २०२४ रोजी एका मुलीने शाळेतून घरी गेल्यानंतर तिच्या पालकांकडे तक्रार केली. "आई मला शुच्या जागी मुंग्या चावतायत…" असं त्या कोवळ्या मुलीचं वाक्य होतं. सातत्याने ही मुलगी तिच्या पालकांकडे तक्रार करू लागल्याने पालकांना संशयाला आणि त्यांनी मुलीला विश्वासात घेत विचारणा केली. त्यावेळी तिने शौचालयात गेली असता अक्षय शिंदे नावाच्या नराधमाने तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचे उघड झालं. त्यानंतर पालकांनी त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला नुकतीच त्यांची मुलगीही शाळेत जायला घाबरत असल्याचं समजलं होतं. दोन्ही मुलींची अवस्था ही संशयास्पद असल्याने पालकांनी तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी करण्याचे ठरवलं आणि तपासणीनंतर शाळेतीलच नराधमान त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आलं. 

लहान मुलींवरील महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. बदलापूरच्या घटनेचा विचार केल्यास शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी दोन समित्या नेमणे बंधनकारक आहे. अशा प्रकारच्या समित्या महाराष्ट्रातील किती शाळांमध्ये आहेत? दुसरा मुद्दा म्हणजे अनोळखी व्यक्तींशी बोलू नका, त्यांच्याकडून खाऊ घेऊ नका, त्यांच्यासोबत कुठे जाऊ नका अशी शिकवण आपण लहान मुलांना, मुलींना देत असतो. पण, शाळेतला कर्मचारी छोट्या मुलींना ओळखीचा वाटत असतो. त्याला त्या काका-मामा, दादा म्हणत असतात. पण, बदलापूर मधील शाळेत अशा जवळच्या वाटणाऱ्या ओळखीच्या माणसाकडून हे विकृत कृत्य केलं गेलं. कोलकत्या मधील घटनेमध्ये ती व्यक्ती पोलीसमित्र होती. अनेक मुलींच्या बाबतीत तर ज्याच्यावर जिवापाड प्रेम केलेले असते तोच त्यांना मारून टाकत असतो. बलात्काराच्या, अत्याचाराच्या घटनांचा तपशील पाहिल्यास बहुतेकदा जवळच्या व्यक्तीकडूनच ही कृत्य झाल्याचे दिसते. अशा स्थितीत मुली आणि महिला निर्भयपणे कशा जगू शकतील..?

ज्या वयात शी-शू सांगण्याचेही मुलांना समजत नाही, अशा निरागास बालकांकडेही विकृतपणे पाहणाऱ्या नजरा येथे आहेत. अशा वखवखलेल्या नजरांना कायद्याचा धाक हवा. चुकीचे केले, तर वेळेत शिक्षा होते ही जरब बसायला हवी. पोलिसांचा गुंडांवर वचक हवा.सामान्य लोकांना पोलिसांकडे जाणे शिक्षा वाटू नये. दरवेळी जनतेच्या आंदोलनानंतर आणि माध्यमांनी दखल घेतल्यानंतरच यंत्रणा हलणार असेल तर ती चूक आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

देश आणि राज्यातील बहिणींच्या सुरक्षेची जबाबदारी सुद्धा सुरक्षा सरकारी तपास यंत्रणेतील भावांनी घ्यायला हवी यासोबतच या देशाच्या नागरिक असलेल्या भावांनीही लाडक्या बहिणींना संविधानाला अभिप्रेत असलेल्या प्रतिष्ठाने जगण्याच्या हमीचेही संरक्षण करायला हवे. लाडक्या बहिणींना सुरक्षित वातावरणात कसे वावरता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या