Ticker

10/recent/ticker-posts

पालकांनी नेहमी दक्ष रहावे

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

आजकालच्या विद्यार्थी पिढीला समजून सांगणे अथवा समजून घेणे सध्या जिकरीचे झाले आहे. कारण आत्ताची शाळेत जाणारी लहान मुले काय करतील हे सांगता येत नाही. कधी अभ्यासामुळे, निराशाने ग्रासलेले असतात, तर कधी टीव्हीवरच्या सतत मालिका पाहिल्याने त्यांच्या मनावर विपरीत परिणाम झालेला असतो. त्या पार्श्वभूमीवर घडलेल्या दोन घटना...



चेन्नईमध्ये एका १५ वर्षांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांने शिक्षकेचा खून केला. तर दुसरीकडे टीव्हीवरच्या गुन्हेगारी जगताविषयीच्या सिरीयल पाहून १२ वर्षाच्या एका विद्यार्थ्याने दिल्लीमध्ये आत्महत्या केली. दोन्ही घटना एकूणच गंभीर आहेत. चेन्नईमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी त्याच्या बाईंचा खून केला. त्याचे कारण म्हणजे त्याला परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले होते आणि बाईंनी त्याची त्याच्या पालकांकडे तक्रार केली होती, एवढेच निमित्त. ह्या घटनेमुळे कुठल्याही शाळेतील शिक्षक आता विद्यार्थ्यांना त्यांच्या चुकीबद्दल शिक्षा किंवा पालकांकडे तक्रार करण्यास धजावणार नाहीत. पण, विद्यार्थ्यांना जर परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले असतील तर त्यांच्या विरोधात पालकांकडे तक्रार करणे योग्यच आहे. 


विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शिक्षा देऊ शकत नाही; पण त्यांच्या शिस्तीला लगाम तर हवाच. पण, आताच्या विद्यार्थ्यांच्या विरोधात तेवढेही करणे गुन्हा ठरतो. काय करायचे अशा विद्यार्थ्यांचे हा प्रश्न आता शिक्षकांपुढे उभा ठाकला आहे. आजच्या घडीला शिक्षक त्यांना प्रेमाने समजून सांगतात काही मुले ते समजून घेतात तर काही समजण्याच्या पलीकडे असतात. अशा वेळेस पालकांनीही मुलांना समजावून त्यांच्या कलाकलाने घेतले पाहिजे. काही विद्यार्थ्यांना अभ्यास नको असतो फक्त शाळेमध्ये जाऊन मज्जा करायची असते. अशा वेळेस काय करावे हा प्रश्न पालक आणि शिक्षक दोघांपुढेही पडलेला असतो. कारण वाईट संगतीच्या मुलांमुळे हा परिणाम झालेला असतो. मग, त्यांना ह्या वेळेस प्रेमाने समजून सांगणे गरजेचे असते.


शिक्षक म्हणा किंवा पालक म्हणा यांचा विद्यार्थ्यांना धाक तर हवाच. पण, अति प्रमाणात नको. तरच त्या मुलांना समजून घेणे सोयीस्कर ठरेल. कारण मुले मोठी व्हायला लागली की, त्यांना मैत्रीपूर्ण भावनेने समजून मित्रांप्रमाणे त्यांच्याशी वागले पाहिजे. आताच्या काळात त्याचीच खरी गरज आहे. पण, मुलांना धाक मात्र हवा. 


दुसरी गोष्ट म्हणजे टीव्हीवरील मालिका आणि चित्रपट पाहून मुलांवर वाईट परिणाम होण्यास वेळ लागत नाही. बारा वर्षाचा विद्यार्थी जेव्हा आत्महत्या करतो त्यामागचे कारण म्हणजे तो नेहमी गुन्हेगारी विषयक मालिका बघत असणार. त्यामध्ये तर खून, दरोडे, चोरी, आत्महत्या सारखेच प्रकार दाखवलेले असतात. मग त्या मुलाच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम होऊन त्या मालिकेतल्या घटनेप्रमाणेच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल त्या मुलाने उचलले. ती मालिका पाहिल्यावर तो त्याच्या आईलाही वारंवार याबाबत अनेक प्रश्न विचारत असे. त्याच्या या प्रश्नांचे निरसन करून त्याला या मालिकेमधील खरं नसतं, मालिका केवळ मनोरंजन म्हणून पहायच्या असतात हे पटवून देत असे. पण, तो ते समजवण्याच्या पलीकडे गेला होता. अशा वेळेस त्याच्या आईने ती मालिकाच पाहणे बंद करायला हवे होते.


या घटनेचा बोध घेऊन तरी पालकांनी आपल्या मुलांना टीव्हीवरील कार्यक्रम बघताना त्यांच्याबाबतीत जागरूकता दाखवली पाहिजे. लहान मुलांसाठी टीव्हीवर अनेक कार्यक्रम त्यांच्या ज्ञानात भर पडणार असतात ते दाखवायला पाहिजेत. विशेष गुन्हेगारी जगतावरील सिनेमा, मालिका त्यांच्यासमवेत बघत असतील तर त्यांना हे खरं नसतं हे पटवून सांगायला पाहिजे. टीव्ही, इंटरनेट, मित्रांची वाईट संगत ह्यामुळे विद्यार्थी दशेतील मुलांवर वाईट परिणाम होत आहे. अशा वेळेस पालकांनी याबाबतीत सजग राहून विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.



Photo : google

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. सध्याच्या वास्तव परिस्थिती दाखवणारा उत्तम लेख

    उत्तर द्याहटवा

Please do not enter any spam link in the comment box.