-दादासाहेब येंधे
माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी वृताची सांगता केली जाते. पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शीव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला 'महाशिवरात्री' असे म्हणतात. शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातात. शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे.
शिवशंकराला देवांचा देव महादेव असे मानतात. महादेवाचे मंदिर नाही असे गाव भारतात शोधून देखील सापडणार नाही. देशभरातील प्रत्येक प्रांतात शिवशंकराची आराधना केली जाते. 'हर हर महादेव...', अशा जयघोषात शिवाचे भाविक तल्लीन होऊन जातात. सदाशिव, सांब, महेश, गिरीजापती, पार्वतीपती, भूतनाथ, नीलकंठ, चंद्रमौली, आशुतोष व महादेव असे नामस्मरण करून भाविक चराचरात सामावलेल्या शिवशंकराचा धावा करीत असतात. शिव हे दैवत मंगलमय, कल्याण करणारे असून त्यांच्यावर भाविकांची अपार श्रद्धा आहे. शिव कृपेने जीवनात कोणत्याच प्रकारचे दुःख येत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे.
ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता तर विष्णू सृष्टीचा पालनकर्ता. शंकर तिचे संरक्षण करणारा आहे. यामुळेच भोलेनाथाला कैलास निवासी असे म्हटले जाते. 'आशुतोष' म्हणजे तत्काळ संतुष्ट होणारे. शिव तसाच आहे. समुद्रमंथनात निघालेले विष स्वतः प्राशन करून जगाचे कल्याण करणाऱ्या शिवाला निळकंठ असेही संबोधले जाते. शिवाच्या मस्तकावर गंगा व चंद्र यांचे स्थान आहे, म्हणून त्यांना 'त्र्यंबकेश्वर' असेही म्हणतात. 'ओम नमः शिवाय' या मंत्रामध्ये सर्व प्रकारचे दुःख नष्ट करण्याची शक्ती आहे. शिव म्हणजेच पापाचा नाश करणारे, त्याआधी असणारा 'नमः' हा शब्द मोक्ष प्रदान करणार आहे. उमा-महेश्वर हा देवाधिदेव महादेव आहे. 'नमः शिवाय' या पाच अक्षरी मंत्रात अद्भुत सामर्थ्य असून तो जगाच्या कल्याणासाठी सार्थ ठरला आहे.
'शिव' या शब्दाचा अर्थच मुळी कल्याण आहे आणि सर्व प्राणीमात्रांचे कल्याण शिवाला अभिप्रेत आहे. शिवपुराणात अनेक उल्लेख गमतीचे आहेत. भगवान शंकर आणि पार्वती यांच्या कथाही लोककथांसारख्या सारख्या प्रचलित आहेत. त्या प्रचलित कथांचा एक अर्थ असा आहे की, शिव आणि पार्वतीने मनुष्याच्या कल्याणाबद्दल बरीच चर्चा केलेली आहे ती माना किंवा मानू नका; पण शिवाने आणि पार्वतीने स्वतःबद्दल ही चर्चा केलेली नसून मानव जाती बद्दल केलेली आहे आणि पार्वतीने शिवाला प्रश्न विचारला आहे की, 'मृत्यूलोकातील प्राण्यांना मनःशांती मिळावी याकरिता त्यांनी कोणते व्रत केले पाहिजे?' त्यावर शिवाने उत्तर दिले आहे, 'शिवरात्रीत पूजन, तप आणि उपवास..'
प्रत्येक धर्माने हे असे उपवास शरीर शुद्धीकरिता जसे सांगितलेले आहेत तसेच ते चित्त शुद्धी करता ही सांगितलेले आहेत. शरीरशुद्धी आणि चित्तशुद्धी हे एकत्र जाणारे विषय आहेत. शरीराची शुद्धी स्वच्छ स्नानाने उत्तम साबणाने होऊ शकेल परंतु मनाची शुद्धी साबणाने होत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे...
महाशिवरात्रीचाही प्राणिमात्राला हाच संदेश आहे. जीवन निर्मळ करा आणि प्रेमळ करा. शिवाची उपासना ही सत्यम, शिवम, सुंदरमची उपासना आहे. महाशिवरात्रीचा हाच अर्थ प्रत्येकाने समजून घ्यायला हवा.
Photo :google
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.