आजी आजोबा एक संस्कार शाळा
नातवंडांसाठी आजी-आजोबा म्हणजे एक संस्कार शाळाच असते. लहानपणी गुडघ्यात वेदना असूनही नातवाला आजोबांनी दिलेली घोडेस्वारी आणि आजीच्या कुशीत झोपल्यावर मिळणारी ती ऊब, याची तुलना कशाशीच करता येणार नाही. त्याकाळचा अनुभवच काही निराळा होता.
-दादासाहेब येंधे
नातवंडासाठी आजी आजोबा म्हणजे आनंदाचा खजिनाच! पूर्वी संपूर्ण कुटुंब एकत्रित राहायचं तेव्हा नातवंडांना आजी-आजोबांचे प्रेम भरभरून मिळायचे. त्याकाळी आजी-आजोबा हे संपूर्ण कुटुंबाला बांधून ठेवणारा दुवा होते. आजी-आजोबांबद्दल आदरयुक्त भीती सर्वांच्याच मनात होती. पण, आताच्या काळात एकत्र कुटुंबापेक्षा विभक्त कुटुंब पद्धत जास्त पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजी-आजोबा आणि नातवंडांची ताटातूट व्हायला लागली आहे. लहान होऊन नातवंडांबरोबर खेळण्याचा आनंद आजोबांनाही मिळत नाही. मुलं शिक्षणानिमित्त परदेशात जातात आणि तिकडेच कुटुंबाबरोबर स्थायिक होतात. परिणामी, त्या नातवंडांनाही आजी-आजोबांचे प्रेम मिळत नाही.
प्रत्येक नात्याचं एक वेगळंपण जपणंदेखील तितकंच महत्त्वाचं असतं. मग ते नातं भावा बहिणीचं असो किंवा आजी-आजोबांचं. पण, या सगळ्या मायेची ऊब देणारे आजी-आजोबा म्हणजे जगातील सर्वात मोठे सुख. पण, आज या सुखाला आपण पोरकं झालो आहोत असं म्हटल्यास वावगे ठरू नये. आज अनेक पालक आजी-आजोबा म्हटलं की, आपल्या मुलांना सांभाळणारी असं म्हणून संबोधतात. एकत्र कुटुंबापासून सुरू झालेला हा प्रवास आज विभक्त कुटुंबापर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळे आजी-आजोबा अडचण वाटू लागलेत. आज लहान मुलांना देखील आजी आजोबांविषयी तितकी आपुलकी राहिलेली नाही. आजी-आजोबा त्यांच्या नातवंडांमध्ये त्यांचं बालपण शोधू पाहत असतात. पण, हेच कुठंतरी आज हरवल्याचं चित्र समाजात पहायला मिळत आहे.
नातवंडांसाठी आजी-आजोबा म्हणजे एक संस्कार शाळाच असते. लहानपणी गुडघ्यात वेदना असूनही नातवाला आजोबांनी दिलेली घोडेस्वारी आणि आजीच्या कुशीत झोपल्यावर मिळणारी ती ऊब, याची तुलना कशाशीच करता येणार नाही. त्याकाळचा अनुभवच काही निराळा होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी केल्यावर आजीच्या हातचे खायला मिळणारे चमचमीत खमंग, चवदार पदार्थ आणि संध्याकाळी अंगणात बसून आजी-आजोबांबरोबर मारलेल्या गप्पा आजही आठवतात. पण, आत्ताच्या या मॉडर्न जमान्यात बर्गर आणि पिझ्झा खाणाऱ्या नातवंडांना कुठून मिळणार आजीच्या हातचे पदार्थ..?
हट्ट पुरवणारी आजी आणि आपल्या आनंदात आनंद शोधणारे आजोबा या नात्याची ओढच वेगळी असते. आजकालच्या धावपळीच्या जगात पालक आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाहीत. म्हणून ती मुले आजी-आजोबांच्या सानिध्यात मोठे होतात. त्यामुळे मुलांना एकटेपणा जाणवत नाही. आई-वडिलांपेक्षा आजी-आजोबा मुलांचं म्हणणं शांतपणे समजून घेतात आणि काही चुकल्यास योग्य मार्ग देखील दाखवतात असा हा आधारस्तंभ सगळ्यांनाच हवा असतो. जिथे आपण मनानं मोकळे होतो. पण याचा अर्थ असा होत नाही की ते नातवंडांचे बेबीसीटर आहेत असा गैरसमज पालकांनी वेळीच दूर करणे गरजेचे आहे. आपल्या मुलांना योग्य वळण लावणं ही जबाबदारी पालकांचीच आहे. आजी-आजोबा फक्त लाड आणि प्रेम देऊ शकतात. तसंच जर सगळेच कठोर वागायला लागले तर मुलं मनमोकळेपणाने व्यक्त होणार नाहीत आणि चुकीचा मार्ग निवडतील. आजी-आजोबांच्या प्रेमाला तोड नसते. त्यामुळे आपणही आपल्या मुलांप्रमाणे आजी-आजोबांनादेखील तितकंच प्रेम दिले पाहिजे. हे आपण समजून घेणे गरजेचे आहे.
स्मार्टफोनच्या जमान्यात मोबाईल वर तासनतास गप्पा मारल्यावर कुठे मिळणार वेळ, आजोबा सोबत गप्पा मारण्यासाठी. थेटर मधून सिनेमा पाहिल्यानंतर आजीच्या छान छान गोष्टींचं कुतुहल कसं वाटणार. आताची पिढी या आनंदाला मुकली आहे. काय हवं असतं त्या आजी-आजोबांना तुमच्याकडून..? काही नाही. फक्त तुमचे प्रेमाने बोललेले दोन शब्द!
मनुष्य जन्माला येताना आपण अनेक नाती घेऊन येतो. त्यापैकी आजी-आजोबांचं नातं हे अतिशय जिव्हाळ्याचं असतं. पण, हे जिव्हाळ्याचं नातं काळाच्या ओघात कुठेतरी हरवत चाललं आहे असं वाटतं.
1 टिप्पण्या
खूप छान
उत्तर द्याहटवाPlease do not enter any spam link in the comment box.