Ticker

10/recent/ticker-posts

'मी पण' गाळून जाण्याचा सोहळा : पंढरीची वारी

टाळी वाजवावी, गुढी उभारावी

वा ती चालावी पंढरीची

पावसाळा सुरू झाला की, आषाढात पालख्यांचे वेध लागतात. आषाढातली ही एकादशी आणि तिची वारी हे वारकऱ्यांचं व्रत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा' ज्येष्ठ महिना आला की, वारकऱ्यांना पंढरीच्या वारीचे वेध लागतात. सासुरवाशिणीला श्रावणात माहेरची जशी आठवण व्याकूळ करते ना, तशीच पंढरीच्या भेटीसाठी वारकरी व्याकूळ होतात. जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया अशा भावावस्थेत वारकरी आळंदी, देहू, सासवड, पैठण, शेगांव, जुन्नर, नारायणगांव, ओतूर या गावी जमतात  तेथून त्या-त्या संतांच्या पालखीसोबत पायी चालत चालत आषाढी वारीसाठी पंढरीत दाखल होतात. महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून वेगवेगळ्या संतांच्या २५० ते २०० पालख्या ज्येष्ठ - महिन्यात समारंभपूर्वक प्रस्थान ठेववात. व पंढरीकडे मार्गक्रमण करतातजाता पंढरीसी ! “सुख वाटे जीवा' अशी ही पायी वाटचाल सुखाचा 'एक आनंद सोहळाच असतो.  



प्रतिवर्षी या प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यासाठी सकल संतांची मांदियाळी वैष्णवांसह पंढरपुरी जायला निघते. जागोजागी मुक्काम करीत पायी पंढरपुरास पोहोचते. एका अर्थी ही संत साहित्य संमेलने होतात. चर्चा होतात. अनुभवी वारकऱ्यांची किर्तने होतात. त्यातून टाळकऱ्यांचे  सहज शिक्षण होते. वारीची ही वाट संतांनी दाखविली. आणि याच मार्गावरून वाटचाल करीत जीवनालाच सदाचारी बनविले. अहो! एखादी सहल काढायची झाली, तरकिती तयारी करावी लागते हे तुम्हाला माहितच आहे. विचार करावा लागतो जेवढी सहलीला येणाऱ्यांची संख्या जास्त, तेवढा तणाव अजुन वाढतो नाही का! पण, वारीचं तसं नाही. वारी ठराविक तिथीला निघते आणि आषाढीला पोहोचते. कोणाला निमंत्रण नाही की, वर्गणी नाही, सक्‍ती नाहीपण, विणेकऱ्यांच्या भोवती दिंडीचा आराखडा, रांगा किती, महिला किती, महिला वारकरी कुंठं, सगळं काही ठरवल्यासारखं असतं बरं का!


पंढरीची वारी व अन्य तीर्थक्षेत्री होणाऱ्या यात्रा यांमध्ये फरक आहे. पंढरीची यात्रा नव्हे, तर  'पंढरीची वारी' काशीला गंगास्नानास, ज्योर्तिलिंग दर्शनास आपण जातो, ती काशी यात्रा. चारधाम दर्शनास जातो ती चारधाम यात्रा. या यात्रांना कोणी वारी म्हणत नाही. वारी म्हणजे फक्त पंढरीचीच. यात्रा ही केव्हाही, आपल्या सवडीने केली जाते, यात्रेला  विशिष्ट कालबद्धतेचे बंधन नसते. याउलट नियमितता सातत्य हेच पंढरीच्या वारीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. 'वारी' या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ 'फेरी' (खेप) असा आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी नियमितपणे, सातत्याने पुन्हा पुन्हा पंढरीला जाणे, फेरी करणे म्हणजे वारी. यात्रा पुन्हा पुन्हा करण्याचे बंधन नाही. पण, पंढरीची वारी एकदा घेतलेल्या संकल्पानुसार आजीवन केली जाते. एवढेच नव्हे, तर वडिलांची-आजोबांची वारी त्यांच्या मृत्यूनंतर मुले-नातवंडे मोठ्या निष्ठेने करतात. म्हणून पढरीची वारी अनेक घराण्यांमध्ये अनेक पिढ्या आजही चालत आलेली दिसते. पंढरीची वारी आहे माझे घरी' असे अभिमानाने सांगणारी हजारो घराणी महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेरही आहेत


आपण काशीला, तिरूपतीला, चारधामला जातो, तेव्हा लोक आपणांस यात्री', 'भाविक' किंवा यात्रेकरू असे संबोधतात.  'वारकरी' म्हणत नाहीत. पंढरीस येणारे सर्वजण भाविक असतातच, पण त्यांना 'वारकरी' म्हटले जाते. वारी म्हणजे पंढरीची आणि वारकरी म्हणजे पंढरीचाच. अशाप्रकारे वारी, वारकरी आणि पंढरी या शब्दांचा भावबंध आहे. पांढरा शुभ्र नेटका पोषाख घातलेले, क्रमांकाच्या दिंडीत चालणारे तुमच्याशी फार मृदू, शुद्ध बोलतील. त्यांची पालखी सोहळ्याच प्रशासन पाहणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी ओळख असते. सोहळ्याच्या नियम, नियमावल्या माहीत असतात. वारीच्या वाटेवर त्यांची मुक्काम खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था असते. खरंतर सर्व वारकरी असेच असायला हवेत, असं तुम्हाला वाटेल. पण तुम्हाला याउलटचं चित्र मोठं दिसेल. धुवट धोतराचा काचा मारलेले, गावंढळ हेलकाव्यात भजन म्हणणारे तुम्ही बोलायला गेलात, तर बिचकतील. ही मंडळी कुठल्याही दिंडीत किंवा रस्त्याच्या कडेने दिंडीतल्या भजनाशी सूर मिळवत टाळ्या वाजवत चाललेली दिसतील.


मुक्कामाच्या ठिकाणी कुठल्याही पंगतीत जेवताना दिसतील. सोहळ्यात रात्री चक्कर मारलीत ना, तर रस्त्याच्या कडेलाच उघड्यावर झोपलेली मंडळी हीच असल्याचं एकूणच चित्र दिसेल. त्यांना थंडी वाजत नाही, किंवा मच्छर चावत नाही. पहाटे साडेतीन-चारलाच जागी होऊन ती वाटचाल करू लागतात. वाटेतल्या ओढे-नाल्यांवर आंघोळ करतील, कपडे धुतील न वाळवतील. आणि एव्हाना तुम्हाला ओळखू लागले असतील. अडकित्त्याने कातरलेली सुपारी तुम्हालाही देत, तुमच्याशी हळू-हळू गप्पा मारू लागतील, आणि तेही मीपणा सोडून... न एक गोष्ट तुम्हाला नक्की जाणवेल, मन मोकळं करण्यासाठी पंढरीच्या वाटेसारखी योग्य जागा नाही! पाण्याअभावी पीक जळालंय, सावकाराने कर्जाचा तगादा लावलाय, उभा ऊस शेतातच वाळून चाललाय, पोरगं शेतात राबायला नको म्हणतयं, सासूचा जाच सोसवत नाही, जावा-नणंदा पाण्यात पाहतात, कामाच्या रहाटगाड्यातून सुटका होत नाही, या आणि अशा अनेक तक्रारी; गाऱ्हाणी इथे एकमेकांना ऐकविली जातात. आपलं कोणी तरी ऐकून घेतंय, यात केवढं समाधान! परस्परांना आग्रह करत जेवतात. वाटचालीने थकलेले जीव एकमेकांचे पाय चेपूनही देतात. वारीवरोबरची ही मौज रोजच अनुभवायची बरं का! मिष्टान्नाचा लाभ तर वारीच्या वाटेवर रोजच. गावचं विचारलं तर मंडळी सांगतील, पंढरीच्या वारीला गेलो म्हणून, गावात मान वाढतो. पंढरपूरहून आल्यावर लोक दर्शन घेतात. माळकरी बुवा म्हणून गाव आदर करतं. ही सारी पांडुरंगाची कृपा. हे सारं कसं सुखावणारं असतं. त्यापुढं संसार दु:खाचा विसर पडतो. मीपणा गळून पडतो.

 


मराठी मन आणि खरा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल, तर वारीला चला. कितंनकार सांगतात की, जे लोक वारी करतात, ते वर्षभर आजारी पडत नाहीत. कारण वर्षभर पुरेल एवढा मनाला आणि शरीराला व्यायाम होतो... 'वारी म्हणजे जीवन आनंदानं जगण्याचा अखंड उत्सव... तो उत्सव अजूनही संपूर्ण महाराष्ट्राला कळलेला नाही. त्यासाठी पंढरीच्या वारीला चला, आणिआनंदाचे डोही, आनंद तरंग" म्हणजे काय ते साक्षात अनुभवा...









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या