स्त्रिया समाजाच्या अलंकार असतात...
भारतीय समाजातील स्त्रियांचे संपूर्ण जीवन बलिदान, त्याग आणि समर्पणावर आधारलेले आहे. स्त्री अनेक उत्तरदायित्वाला पूर्ण करतच ती स्वत: एक पर्याय बनलेली आहे. क्षमा, शील, करुणा हे महत्त्वाचे गुण स्त्रियांत आहेत, पण औदार्याची किंमत स्त्रियांना मोठ्या प्रमाणात चुकवावी लागते. या औदार्याचे बक्षीस म्हणून स्त्रियांना पुरुषसत्ताक समाजाने आपली 'दासी' बनवले आहे. अपमान, अत्याचार, शोषण यांच्या दलदलीत स्त्री फसत गेली. म्हणून भारतीय समाजातील 'स्त्री' अभागी प्राणी म्हणून मानली जात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. स्त्रिया एवढ्या अभागी असतात की, त्यांना जन्मापासून मृत्यूपर्यंत स्वत:चे घर असतच नाही. आपल्या पित्याच्या छत्राखाली दुसऱ्याचे धन म्हणून पतीच्या घरी सेविका वृद्धावस्थेत मुलांच्या अधिपत्याखाली जीवनाच्या अखेरच्या क्षणाची वाट त्या पाहत असतात.
त्याकाळी भारतीय परंपरा आणि धर्मग्रंथात स्त्रियांना अतिशय कनिष्ठ दर्जा देण्यात आला होता. तिला नरकाचे द्वार, पतनाचे कारण मानले होते. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना न्याय नव्हता, पण हिंदू धर्मातील स्थायी अंधविश्वास, रूढी, संकुचित विचार आणि शोषण, कुप्रथा स्त्रीला सन्मान मिळू देत नव्हते. समाजात हिंदू धमंग्रथ आणि ब्राह्मणवादी स्त्रियांसबंधी असे नियम व कायदे बनविले की, स्त्रीला दासी, गुलाम, अबला असे अनेक नावांचे किताब मिळाले होते. स्त्रियांना सर्वात जास्त अपमानित व तिरस्कृत करण्यात मनूच्या धूर्त व संकुचित विचारांचे फार मोठे योगदान राहिले आहे. खऱ्या अर्थाने पाहिले तर स्त्रियांचे स्वातंत्र्य, अधिकार, हक्क हिसकावून घेण्याचे अतिशय वाईट कृत्य मनूने केले आहे. स्त्रियांचे होणारे शोषण, दमन व अत्याचारांनी उच्चबिंदू ओलांडला होता, तेव्हा अशा काळात क्वांतिसूर्य महामानव, युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि त्यांनी स्त्रियांना नव्या रूपाने जीवन जगण्याचा रस्ता आपल्या विचारांतून व प्रत्यक्ष कृतीतून समाजाला दाखवून दिला. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात स्त्रियांना आत्मसन्मान मिळावा, यासाठी कार्य केले आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेब स्त्रियांचे सर्वश्रेष्ठ उद्धारक बनले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जागृतीसाठी अनेक आंदोलने केली, या आंदोलनाचा मूळ उद्देश स्त्रियांना पुरुषप्रधान स्वातंत्र्य समान अधिकार मिळाले पाहिजेत असा होता. डॉ. आंबेडकर स्त्रियांच्या जीवनात सर्वतः परिवर्तन करण्याच्या बाजूने होते. त्यांनी १६ जून १९३६ रोजी मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये महिलांच्या सभेला उद्देशून भाषण करताना म्हटले होते की, (त्यात मोठ्या संख्येने वेश्या व्यवसाय करणाऱ्या व जोगिनी होत्या) ''स्त्रिया समाजाच्या अलंकार असतात, म्हणून त्यांना सन्मान प्राप्त करून देणे आवश्यक आहे.''
त्यांनी स्त्रियांमध्ये आत्मसन्मान जागविण्यासाठी दलित महिलांना आवाहन केले की, “महिलांनो तुम्ही साहसी व्हा, स्वाभिमानाने राहा, तुमच्या पोटात जन्म घेणे हा गुन्हा नाही व ब्राह्मण स्त्रीच्या पोटात जन्म घेणे म्हणजे काही पुण्य नाही. आपण गरीब म्हणून आपल्या स्वाभिमानाचा बळी देऊ नका, स्वाभिमानाशिवाय जगणे म्हणजे प्राण्यासारखे जगणे आहे, तुम्ही माणसासारखे जगले पाहिजे, तेव्हा स्वाभिमानाने मान उंच करून जगायला शिका.'' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांत जाणीव जागृती करण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्यासाठी अनेक आंदोलने केली. १९२७ मध्ये महाडचा सत्याग्रह केला. २५ डिसेंबर १९२७ रोजी मनूंनी स्त्रियांना शोषणाच्या व दमनाच्या मोठ्या खाईत लोटले होते त्या मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी २५०० (अडीच हजार) स्त्रिया उपस्थित होत्या. २८ जुले १९२८ रोजी मुंबई विधानपरिषदेत कारखाना व इतर संस्थांमध्ये कामगार स्त्रियांना प्रसूतीकालीन सुविधा देण्यासंबंधीच्या बिलावर आपले विचार मांडत असताना म्हटले होते की, 'स्त्रियांना प्रसूतीकालीन सुविधा देणे राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. स्त्रियांना शासनाने या काळात वेतनही दिले पाहिजे.' या विचाराने सर्व सभागृह प्रभावित होऊन ते बिल मंजूर केले होते. १९३१ मध्ये गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी अस्पृश्य (स्त्री-पुरुष दोघांनाही) पृथक मतदान देण्याचा अधिकार मागितला होता. मुलं जास्त व उत्पन्न कमी असेल तर कुटुंबात कलह, दु:ख निर्माण होतात, त्यामुळे त्यावेळी त्यांनी जनतेला फक्त दोन मुले जन्माला घालण्याचा सल्ला दिला यावरून लक्षात येते की, बाबासाहेबांकडे फार मोठी दूरदृष्टी होती व महिलांच्या आरोग्याबद्दलही चिंता होती.
पत्नी रमाबाई यांना लिहिण्यासाठी व वाचनासाठी बाबासाहेब सतत प्रोत्साहन देत असत. बाबासाहेब विदेशात असताना रमाबाईंनी अनेक पत्रे त्यांना पाठविली होती. त्यांच्या प्रोत्साहनाचे हे एक फलित होते. महाडच्या ऐतिहासिक भाषणातही बाबासाहेबांनी म्हटले होते की, शिक्षण हे स्त्री आणि पुरुषांना अनिवार्य असून आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याचा उपदेशही बाबासाहेबांनी जनतेला केला होता. बाबासाहेबांचा शिक्षणाच्या बाबतीतील दृष्टिकोन त्यांच्या या वाक्यातून स्पष्ट होतो. “ शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, बालविवाह करू नका. असेही त्यांनी समाजाला त्यावेळी बजावून सांगितले होते. स्त्रियांत अस्तित्वाची जाणीव निर्माण व्हावी यासाठी त्यांनी जो त्याग केला त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे 'हिंदू कोड बिल' आहे. बाबासाहेबांनी मांडलेले 'हिंदू कोड बिल' म्हणजे स्त्रियांसाठी नव्या युगाची पहाट होती. हिंदू कोड बिलाने स्त्री जातीचे कल्याणच नाही तर तिला अधिकार व हक्कही मिळाले. ज्यामुळे स्त्री अनेक कुप्रथा, शोषण, अत्याचारातून मुक्त झाली. ते खऱ्या अर्थाने स्त्री-मुक्तीदाता होते. त्यांनी समस्त स्त्रियांना स्वतंत्रता, समानता, स्वाभिमानाची शिकवण दिली. त्यांनी केवळ विचार मांडले नाहीत तर त्यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून स्त्रियांना समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्यायही प्राप्त करून दिले. आज स्त्री स्वाभिमानाने, समता, स्वातंत्र्य उपभोगत आहे. अनेक क्षेत्रांत ती कार्यरत आहे म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच खऱ्या अर्धाने स्त्री-जागृतीचे जनक, अग्रदूत होते.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.