Ticker

10/recent/ticker-posts

रेल्वेने आत्मपरिक्षण करावे!


आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे जाळे पसरल्याचे बिरूद मिरवणारी भारतीय रेल्वे, तसेच मुंबईची  जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या रेल्वेचा तकलादूपणा नेहमीच समोर येत आहे. सकाळी चतकोर भाकरीसाठी बाहेर पडलेला चाकरमानी वेळेवर कामावर पाहोचेलच असे नाही. वर्षाची सुरुवात आपण अनेकांनी मरगळ झटकून, नव्या आशेने केली असली तरी कुठल्याही क्षणी रखडणारी मध्य रेल्वेची मरगळ गेलेली नसल्याने प्रवाशांच्या उत्साहावर विरजण पडलेले आहे यात शंकाच नाही. नेहमी मेगाब्लॉक घेऊन अभियांत्रिकी कामाचे निमित्त सांगितले जात असले तरी, उरलेल्या कामाच्या दिवशीही रेल्वे मुडदाडपणे चालणार नाही याची कोणतीही हमी नाही. याचे रेल्वे प्रशासनाला ना सोयर ना सुतक अशी अवस्था आहे. मग कुठे रेल्वे प्रवाशांचा उद्रेक झाला की, त्यांच्या नावाने खडे फोडायचे आणि आम्ही काय करत होतो याचे पाढे वाचायचे.


पण तत्पूर्वीज काळजी घेतली आणि योग्य नियोजन केले तर ते सगळ्यांनाच सोयीचे होईल, पण इथे काळजी कुणाला आहे? नेहमीच उशिराने धावणाऱ्या लोकल गाड्या, सिग्नल यंत्रणेमधील बिघाड, इंजिन फेल, ओव्हरहेड वायर तुटणे अशा एकना अनेक कारणांनी जर्जर झालेली मध्य रेल्वेची सध्याची स्थिती आहे. त्यामुळे आवश्यक सुविधा पुरवून, प्रवाशांची काळजी घेणारे, मानवता जपणारे रेल्वे प्रशासन हे सर्वसांमान्यांचे स्वप्न केवळ दिवास्वप्नच  आहे. पावसाळ्यात थोडे कुठे पावसाचे प्रमाण वाढले की, रेल्वे रूळावर पाणी आणि रेल्वेचे तीनतेरा वाजलेच म्हणून समजा. 'मुंगीला मुताचा पूर', ही म्हण सार्थ ठरवणारी रेल्वे मग खरोखरीच मुंगीच्या गतीने चालते. अशी अवस्था असेल तर आपली काय अवस्था होईल याची कल्पनाही न केलेली बरी. एखादी गाडी रखडल्यानंतर त्यातील प्रवाशांना त्याची माहिती देण्याचे सौजन्यही दाखवले जात नाही. 


मग त्या लोकलमध्ये लावलेली ध्वनियंत्रणा ही केवळ शोभेसाठी की, आहे काय असा प्रश्‍न पडतो. जनावरांप्रमाणे कोंबून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना नेहमीच रेल्वे अपघात पाहायला मिळतात. अशावेळी रेल्वे प्रशासनाने घ्यावयाची दक्षता अगदीच मुरदाड  असते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्याविरोधात प्रवाशांनी आंदोलने आंदोलने करूनही, न्यायालयाने आदेश देऊनही रेल्वे प्रशासन डुंबत बसलेल्या म्हैशीप्रमाणे हलायला तयार नसते, हेच आमचे दुर्दैव. 


रेल्वेच्या या अवस्थेची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला, तर त्यातील भयाण वास्तव पुढे येईल. आधुनिक तंत्रज्ञानाशी तेवढ्या वेगाने जुळवून घेता येत नसल्याचा हा परिणाम आहे. मुंबई महानगराची दैनंदिन प्रवासाची आवश्यकता आणि प्रचंड गर्दीचा रेटा याचा नीट अंदाज राज्यकर्त्यांना आणि रेल्वे प्रशासनाला अजूनही आलेला दिसत नाही. सध्या अस्तित्वात असलेले रेल्वे कॉरिडॉर म्हणजेच आहे त्याच रेल्वे मार्गावर पूल बांधून मार्ग टाकणे आणि रेल्वे स्थानके उभारणे, नव्या मार्गाची निर्मिती करणे ही कामे युद्धपातळीवर हाती घेतली तरच मुंबईच्या उपनगरीय सेवेची परिस्थिती थोडीफार सुधारू शकेल. अन्यथा या महानगरीचा उपनगरी प्रवास परमेश्वराच्या भरवशावर सोडून द्यावा लागेल. सरकारची विकासाबाबतची ध्येयधोरणे ही अत्यंत दिरंगाईची आणि टाळाटाळ करणारी असल्याचे स्पष्टपणे दिसते. या सगळ्या नाकर्तेपणाचा फटका सामान्य माणसाला सोसावा लागतो. त्याच्या जीवनमानावर या गोष्टींचा गंभीर परिणाम होतो आणि मग भयंकर गर्दीमुळे अनेक निष्पापांना आपले प्राण गमवावे लागतात. सुविधा देताना जर प्रवाशांना त्रास होत असेल तर त्याची सगळी जबाबदारी सरकारच्या या नकारात्मक दिरंगाईवरचं येऊन पडते. नुसत्या दुरुस्त्या करून भागणार, नाही तर कायमस्वरूपी सुविधा निर्माण केल्या पाहिजेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या