Ticker

10/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग

श्रावणात महादेवांची पूजा भक्त मोठ्या भक्तीभावाने करतात. श्रावण महिना हा भगवान शिवांच्या पूजेसाठी सर्वात शुभ असा मानला जातो. आपल्या देशात एकूण बारा ज्योतिर्लिंगे आहेत. सोमनाथ-गुजरात, मल्लिकार्जुन;आंध्र प्रदेश, महाकालेश्वर-मध्य प्रदेश, ओंकारेश्वर- मध्य प्रदेश, वैजनाथ-महाराष्ट्र, भीमाशंकर-महाराष्ट्र, रामेश्वर-तामिळनाडू, औंढा नागनाथ-महाराष्ट्र विश्वेश्वर-उत्तर प्रदेश, त्रंबकेश्वर-नाशिक, केदारनाथ-उत्तराखंड, घृष्णेश्वर-महाराष्ट्र अशी बारा ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी पाच ज्योतिर्लिंग ही महाराष्ट्रात आहेत.

-दादासाहेब येंधे

भीमाशंकर, पुणे- भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे या ज्योतिर्लिंगांमधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेलेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. या जंगलात रानडुक्कर, सांबर,  भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक प्रकारचे पक्षी आढळून येतात. येथील शेकरू तांबूस रंगाचा असून ती फक्त याच जंगलात आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वन विभागाने विविध योजना अवलंबलेल्या आहेत. घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे भीमाशंकर.

भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे. हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही. मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही. शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत, पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता.


त्रंबकेश्वर, नाशिक- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वपूर्ण म्हणून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्राचे स्थान महत्त्वपूर्ण असे आहे. श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी १७५५ ते १७८६ या कालखंडात मंदिराची उभारणी केली. त्या काळात मंदिर बांधणीसाठी १६ लाख रुपये खर्च करण्यात आल्याच्या नोंदी सापडतात. ३१ वर्ष मंदिर निर्माण चे काम सुरू होते. गोदाकाठी वसलेले त्रंबकेश्वर मंदिर काळ्या भक्कम पाषाणापासून निर्मित असून, येथील शिल्प, वास्तुकाला अप्रतिम अशा आहेत. श्रावणात येथे दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी असते. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो.

श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे. येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक हजेरी लावत असतात. 


घृष्णेश्वर, छत्रपती संभाजी नगर - छत्रपती संभाजी नगर पासून ३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वेरूळच्या घृषनेश्वर मंदिराचा उल्लेख शिवपुराण, रामायण, महाभारतात आढळतो. १६ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराव यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार प्रथम केला होता.

त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांनी पुन्हा मंदिराची पुनर्बांधणी केली होती. लाल रंगाच्या दगडांचा वापर, शिखरावर नक्षीकाम हे या मंदिराचे वैशिष्ट्य असून शिवलिंगांची स्वयंभू पिंड ही गर्भगृहात आहे. मंदिराजवळ शिवायल तीर्थ असून, ५६ पायऱ्या आहेत. येथे राज्यभरातून भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात.


परळी वैजनाथ, बीड- यादवांच्या काळात हेमाद्री याने मंदिराची उभारणी केल्यानंतर अहिल्यादेवींनी आपल्या कार्यकाळात मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. आकर्षक लांब पायऱ्या, आकर्षक प्रवेशद्वार, सभामंडप व गाभारा समपातळीवर असल्याने दर्शनास सोपे असणारे वैजनाथ मंदिर आहे.

हेमाडपंथी आणि आकर्षक शैलीकाम असणाऱ्या मंदिराचा परिसर प्रशस्त आहे. परभणी-लातूर रेल्वे मार्गावर परळी वैजनाथ आहे. वैद्यांचा स्वामी अशी भावना असल्यामुळे परळीच्या महादेव पिंडीला स्पर्श केल्यास रोग बरे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.



औंढा नागनाथ, हिंगोली- हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचा संदर्भ थेट पांडवकालीन आहे.  पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासाच्या काळात मंदिर बांधल्याचे म्हटले जाते. अर्थात पुढे यादवकाळात मंदिराची बांधणी झाली. चुना न वापरता केवळ खाचा करून मंदिर बांधले असून हेमंडपंती शैलीचे हे बांधकाम आहे.


मंदिरावर आकर्षक असे कोरीव काम असून महादेवाची पिंड गाभाऱ्यात आहे. इतर दोन ज्योतिर्लिंगांप्रमाणेच या मंदिराचीही नव्याने उभारणी अहिल्यादेवींनी केल्याचे मानले जाते. संत नामदेव महाराज कीर्तन करत असताना तत्कालीन पुजाऱ्याने त्यांना अडवले व मंदिराच्या मागील बाजूस ढकलले. नामदेवांनी अत्यंत भक्तीभावाने पांडुरंगाचा धावा केला तेव्हा संपूर्ण मंदिर फिरले आणि महाद्वार नामदेवांच्या दिशेने आले, अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या सभोवतालच्या निसर्गरम्य पर्वतरांगा, औंढा तलाव आणि ऐतिहासिक कुंड व बारव यांसारख्या गोष्टी या स्थानाच्या वैभवात भर घालतात. महाशिवरात्रीला होणारा भव्य रथोत्सव इथल्या जिवंत परंपरेची साक्ष देतो. 





Photo:google

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या