Ticker

10/recent/ticker-posts

रंगपंचमी खेळा, पण सावधगिरी बाळगा

 रंगपंचमी खेळताना कोणती काळजी घ्याल...

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीचे दुसरे नाव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्यापाड्यातून मोठ्या आनंदाने उत्साहात साजरा केला जातो. होळी आली की होळीसाठी लाकडे, गोवऱ्या गोळा करणारी पोरं गल्ली-बोळातून दिसून येतात. होळी रे होळी पुरणाची पोळी... किंवा होळीला गोवऱ्या पाच पाच... डोक्यावर नाच.. नाच... अशी गाणी गात असतात.

लाकडं, गोवऱ्या गोळा केल्या जातात, मग घराच्या अंगणात किंवा चौकात एक मोठी एरंडाचे फांदी उभी करतात. त्याच्याभोवती लाकडे, गोवऱ्या ठेवतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सवासणी, मुलं-मुली, मोठी माणसं सर्वजण होळीची पूजा करतात. होळीला नैवेद्य दाखवतात. जे जुणें आहे, कालबद्ध आहे, अमंगल आहे. त्या सर्वांचा जाळून नष्ट होऊ दे, नव्या चांगल्याचा, उदात्ततेचा स्वीकार करायचा. हाच होळीचा खरा संदेश आहे. होळी आपल्याला त्याग आणि समर्पण करायला शिकवते. या उत्सवाला होलिकादहन किंवा होळी शिमगा, हुताशनी महोत्सव अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत.

खरं म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी त्या शांत झालेल्या होळीची राख अंगाला लावायची ती का..? तर पुढे होणारा कडक उन्हाळा सहन व्हावा यासाठी. पण, हा चांगला विचार अंगाला चिखल लावायचा, घाण पाणी एकमेकांच्या अंगावर टाकायचं या आणि अशा अमंगल कृतीमुळे मागे पडला. नैसर्गिक रंग वापरले जायचे पण हल्ली झालेल्या बाजारीकरणामुळे तेही मागे पडले आणि समोर आले ते रासायनिक रंग. या रंगामुळे दरवर्षी कुठे ना कुठे अपघात झालेले दिसून येतात. असे अपघात होऊ नयेत म्हणून आपण नैसर्गिक रंगांचा वापर करणे गरजेचे आहे.


रंगांनी नव्हे तर फुलांनी रंगपंचमी खेळा- बरेच जण असे म्हणतात की होळीच्या रंगपंचमीचा सण रंगांशिवाय अपूर्ण आहे परंतु यावर्षी आपण रंगांच्या ऐवजी फुलांनी खेळू शकता. यामुळे रासायनिक रंगाचा त्रास देखील होणार नाही. आपण नैसर्गिक फुलांचा वापर करून होळी आनंद द्विगुणीत करू शकता.

ऑरगॅनिक रंगांचा वापर करा - जर आपल्याला वाटत असेल की, रंगपंचमी रंगांशिवाय अपूर्ण आहे. तर यासाठी आपण ऑरगॅनिक रंगांचा वापर करू शकतो. आपल्या स्वयंपाक घरात असे अनेक पदार्थ आहेत त्यांचा वापर आपण रंग बनवण्यासाठी करू शकतो. हे रंग हानिकारक देखील नसतात. रंग रंगवण्यासाठी आपण हळद, मेहंदी पावडर आणि चंदन पावडरचा यांचा वापर हमखास करू शकतो.


एकमेकांना टिळा लावा- यंदाच्या रंगपंचमीला आपण एखाद्याला कलर लावण्यापेक्षा टिळा लावून रंगपंचमी साजरी करू शकतो. 

होळीच्या गाण्यांवर नाचा - होळीच्या रंगपंचमीच्या सणाची धमाल गाणी इंटरनेटवर युट्युबवर सर्रासपणे सापडतात. 'रंग बरसे ते 'अंग से अंग लगाना' पर्यंतच्या सगळ्या गाण्यांची आपण एक लिस्ट तयार करून होळीच्या आणि रंगपंचमीच्या खास गाण्यांवर आपल्या परिवारासह मस्त डान्स करू शकता.

रंगपंचमी खेळताना कोणती काळजी घ्याल...

१) अलीकडे बाजारात आलेल्या कृत्रिम आणि पक्क्या रंगामुळे त्वचेची हानी होईल ही भीती प्रत्येकाच्या मनात असते. कधीकधी तर हे रंगीत केमिकल तासनतास रगडून काढले तरी त्वचेवर डाग उरतातच.

२) जर पक्क्या रंगाचा वापर केला असेल तर थेट पाणी लावण्याऐवजी खोबरेल तेलाचा वापर करून चेहरा स्वच्छ धुवावा.

३) गुलाल किंवा कोरडे रंग असतील तर केवळ पाण्याने धुऊन काढा आणि मगच साबण आणि अन्य प्रसाधनांचा वापर करा.

४) चेहऱ्यावर दाब देऊन किंवा जोरात न पुसता लिंबू किंवा टोमाटोचा रस चेहऱ्यावर लावून थोडावेळ चेहरा सुकु द्या अगदी गरम किंवा थंड पाण्याने चेहरा धुऊन नका, त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा.

५) केमिकलयुक्त रंग होळीसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जातात. त्याचा आपल्या चेहऱ्यावर त्वरित परिणाम होतो. त्यामुळे रंग खेळून झाल्यानंतर तो लगेच धुवून टाका. रंग जास्त वेळ राहिल्यास त्याचे साईड इफेक्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

६) कपडे तसेच डोक्यावरील कोरडा रंग आधी चांगला झटकून घ्या. नंतर एका मुलायम कपड्याने आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील रंग काढावा.

७) बेसन पिठात लिंबाचा रस होळी रंग काढावा. खोबरेल तेल अथवा दही त्वचेवर लावून रंग हळुवारपणे काढता येतो.

८) रंग काढण्यासाठी रॉकेल, केमिकल, डिटर्जंट पावडर अथवा कपडे धुण्याचा साबण उपयोगात आणू नका.

९) केसांमध्ये असलेला कोरडा रंग अधिक चांगल्या प्रकारे झटकून घ्या. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवावेत. बेसन, दही अथवा आवळा पावडरने डोके धुतल्यास रंग लवकर निघतो. आवळा पावडर रात्री पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर केसांना शाम्पू करावा.

१०) डोळ्यात रंग गेल्यास आधी पाण्याने ते स्वच्छ करावेत. डोळ्यांची आग थांबत नसेल तर एका वाटीत पाणी घेऊन त्यात डोळ्यांची उघडझाप करावी. थोड्या वेळानंतर डोळ्यांमध्ये गुलाबजल टाकावे याशिवाय ड्रॉपचाही आपण वापर करू शकतो.

११) रंगामुळे त्वचेवर परिणाम झाल्याचे जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित ठरेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या