अति घाई संकटात नेई....
-दादासाहेब येंधे(dyendhe1979@gmail.com)
-दादासाहेब येंधे(dyendhe1979@gmail.com)
"तुम्हाला कशाची सवय आहे? तुम्हाला काय आवडते? वाचण्याची आवड आहे?"
वेबसाइटवरून पुण्यातून एक मुलगी अशा प्रश्नांचा भडिमार करीत असताना समोरच्या पक्षाकडून नागपूर येथून येणाऱ्या उत्तरांमुळे ती खुश झाली. मनातच म्हणाली, "मला पाहिजे अगदी तसाच हा मुलगा आहे. मला त्याला स्वतः च भेटले पाहिजे. खरेतर अशावेळी मुलींनी सावध असले पाहिजे. अनोळखी व्यक्तींबरोबर बोलताना मुलींनी आपल्या नातेवाईकांसोबतच डिटेक्टिव्ह एजन्सीचीही मदत घेण्यास हरकत नाही.
मुलगी पुण्याला राहत होती आणि नागपूर कुठे इतके दूर होते? तरी भेट होत नव्हती. पुण्यामधूनच त्याच्याबरोबर ती फोनवर गप्पागोष्टी करीत असे. मुलगा दिसायला सुंदर, चांगले व्यक्तिमत्व, बोलायला खूप चपळ. कुठल्यातरी मोठया कंपनीत वर्षाला जवळजवळ ५०-६० लाख रुपये कमवत असेल. पण, एकच गोष्ट सलत होती की, तो सतत पान खायचा. नंतर तो खोटं बोलायचा. एवढ्याश्या छोटया गोष्टीचा तपास करण्यासाठी तिने डिटेक्टिव्ह कंपनीची महिला गुप्तहेर संगीताला ठेवले. थोड्याच दिवसांत खोटारडा पकडला गेला. मोठया आलिशान फ्लॅटच्या गोष्टी करणारा कुठल्या तरी गेस्ट हाऊसमध्ये खाण्या-पिण्यासहित महिन्याला रु. ४०००/- देऊन तो राहत होता. बियरच्या बाटल्यांवर बाटल्या रिचवत होता. पगार तर महिन्याला त्याने २५ हजारांऐवजी ५ लाख सांगितला होता. डिटेक्टिव्ह संगीताने नागपूरमधील पानवाल्याला विचारले असता तो म्हणाला, "मॅडम, रोजचाच ग्राहक आहे हा. १०ते १२ पाने तो रोज माझ्याकडून घेऊन खातो." एका खाजगी कंपनीत कामाला जातो. एकदम व्यसनी माणूस आहे तो.' असे तो पानवाला म्हणाला.
दुसऱ्या गोष्टीत एका डिटेक्टिव्ह एजन्सीच्या मनीषा या कार्यकर्तीचा अनुभव असा होता की, ती एका संशयास्पद युवकाच्या घरी कामवाली बाई म्हणून राहिली. तो युवक त्याच्याच घरातील दुसऱ्या कामवाली नोकराणीसोबत संबंध ठेवत होता. अशी सर्व माहिती तिने त्या युवकाच्या पत्नीला फोटोसकट दिली.
परदेशातून लग्नासाठी येणाऱ्या वरांनी पसंत केलेल्या भारतीय मुलीच्या मागेही तपास करण्यासाठी तिची माहिती काढण्यासाठी गुप्तहेर मोठ्या प्रमाणात ठेवले जातात. अशा डिटेक्टिव्ह एजन्सी स्त्रियाही चालवतात. मद्रास येथे काही प्रमाणात एजन्सी आहेत. पंधरा ते वीस हजार रुपये घेऊन त्या काम करतात. पुरुषाला शोधण्यासाठी त्या गुप्तहेर पुरुषांच्या रंगरूपावर पाळत ठेवतात. इतर गोष्टी त्यांची कंपनी सांभाळते. गुप्तहेर फक्त पैशांसाठी काम करत नाही तर योग्य मार्गदर्शन करतात. जे लाखो-करोडो रुपये लग्नाच्या वेळी खर्च केले जातात. तेच लग्न करण्याआधी थोडे हजार नवरा मुलगा योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी खर्च केले तर अडले कुठे? लग्नाआधी असा तपास करणे गरजेचे आहे. मोठ्या कंपन्या देखील कोणाला नोकरी देण्याआधी तपास करीत असतात. त्यात चुकीचं काही नाही
एक गुप्तहेर कंपनीला लग्न नक्की झालेल्या पुरुष सजातीय संबंध ठेवतो का नाही त्याच्या तपासासाठी नेमले होते त्यांनी तपास केल्यानंतर सत्य त्याला सांगण्यात आले. खरे तर लग्नाआधी केलेला तपास अविश्वास सुचवत नाही. तर तो सतर्कतेचे पार्क असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सध्या वेगवेगळ्या व्यवसायासारखेच लग्नही जोखमीचे झाले आहे. प्रत्येक वधूने आपण फसण्याआधी योग्य विचारपूस करणे गरजेचे आहे. जर अशा प्रकारची दूर दृष्टी असेल तर भविष्यात येणारी संकटे नक्कीच टाळता येतील. परदेशात राहणाऱ्या मुलाबरोबर देशी मुलगी लग्न करून गेल्यानंतर तिला तेथील परिस्थिती माहिती नसते. त्यावेळेस अशा गुप्तहेर एजन्सी कामाला येतात.
एकोणीस वर्षाची एक मुलगी प्रेमात पडली होती तिची आईदेखील होणाऱ्या जावयावर खुश होती. राजस्थानच्या गर्भश्रीमंत मानल्या जाणाऱ्या राजकीय कुटुंबातील तो मुलगा होता. असे तिला त्याने सांगितले होते. त्यासाठी एका गुप्तहेराला तपास करण्यास सांगितले असता सत्य वेगळेच बाहेर आले. एका गावात हॉटेल आहे. तेथे वेश्याव्यवसाय चालवून तो खूप पैसे कमावत होता. राजकीय कुटुंबियांबरोबर त्याचे काहीही संबंध नाही. फक्त आडनाव सारखे आहे. तो राजेशाही थाटात राहतो म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका.
जाहिरात किंवा लग्न जुळवून देणाऱ्या मंगल कार्यालयांमधील त्यांच्या ग्राहकांची सगळ्यात मोठी तक्रार असते की मुलाला दारूचे व्यसन. येणारा सगळा पैसा तो दारू पिण्यावर उडवतो. तर मुलीने आपल्याबद्दल खोटे सांगितले. अशा दोन्ही बाजू समजून घेणे गरजेचे आहे. लग्नात फसवणूक करणे चुकीचे आहे. अशी एकमेकांची फसवणूक होण्यापासून वेळीच सावध होणे गरजेचे आहे. त्यासाठी एखादया डिटेक्टिव्ह एजन्सीची तुम्ही नक्की मदत घेऊ शकता. त्यामुळे बाबुजी जरा धीरे चलो बडी मुश्किल है, इस राह मे...
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.