Ticker

10/recent/ticker-posts

निरोगी शरीर हाच खरा दागिना

 निरोगी शरीर, हाच सुखी आयुष्याचा मंत्र

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

आजकाल प्रत्येकजण आरोग्य आणि सामाजिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी धनप्राप्तीच्या मागे अधिक लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. धन प्राप्तीसाठी आरोग्याची हेळसांड करणे आणि तेच धन पुन्हा निरोगी आयुष्य करण्याकरिता खर्च करणे, असे एकूणच चित्र सध्या पहावयास मिळत आहे. खरेतर गरजेपेक्षा अधिक द्रव्याचा संचय करणे म्हणजे विविध प्रकारच्या व्याधी लावून घेणे. त्यातूनच पुढे मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार आपल्यावर आरूढ होतात.


कुटुंबवत्सलता आणि सुसंस्कृतपणा हरवण्याला पाश्चात्त्य संस्कृतीचा वाढता प्रभाव कारणीभूत ठरत असल्याचे समोर येत आहे. जीवनात शिस्त महत्त्वाची असून दैनंदिन नियोजनही आवश्यक आहे. अधिक प्रमाणावर धनप्राप्ती चिंतेचे मूळ आहे, तर चिंता सर्व विकारांचे मूळ आहे. त्यामुळे गरजेपुरते कमवा आणि चिंताविरहित जीवन जगा. मानवी दैनंदिन आयुष्य खूप ताणतणावांनी भरलेले आहे. दिवसभरात आपण वेगवेगळ्या भावनांच्या कटाक्षातून जात असतो. भीती, द्वेष, राग, मत्सर या भावनांच्या अंमलाखाली जगताना मनाला सतत टोचणी देणारे विचार येत राहतात. ते येऊ नये अशी आपली कितीही इच्छा असली तरी अशा वेळेस मन आपले ऐकत नाही आणि आपण भरकटत जातो. विद्वानांनी म्हटलं आहे की मन हे एक माकड आहे, जे सतत अस्वस्थ असते आणि त्यात ते भावनेच्या आहारी गेले की व्यसनी माकडसारखे वागते. त्यामुळे एकाग्रता, साधना विचलित मनाला संयमित ठेवण्यासाठी आवश्यक आहे. 


आधुनिक संशोधनानुसार साधारणतः ९५ टक्के विचार असे असतात जे पुन्हा पुन्हा येत असतात आणि हाच मनाचा तो स्वभाव आहे. भूतकाळातील आठवणी बद्दलचे विचार भविष्याबद्दल चिंता आणि लोकांना आपल्याबद्दल काय वाटते. अशा प्रकारचे विचार निर्माण करतात. काही विशिष्ट ध्यानधारणा आणि श्रद्धा मनामध्ये एक विशिष्ट ऊर्जा  निर्माण करते आणि ऊर्जा सकारात्मक विचारांना प्रोत्साहित करते.


परदेशात 'ट्रान्सडेनटल मेडिटेशन' नावाचा प्रकार खूप लोकप्रिय झाला असून ट्रान्सडेनटल मेडिटेशन दुसरे काही नसून जप साधनाच आहे. कित्येक सिने कलावंत मंडळी ट्रान्सडेनटल मेडिटेशनने त्यांच्या आयुष्यात घडलेल्या बदलाबद्दल अनुभव संपन्न आहेत. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी ध्यान आणि जप साधना अत्यंत आवश्यक आहे.


स्पर्धा प्रत्येक ठिकाणी आहे. प्रत्येक गोष्टीत आहे. स्वसामर्थ्याने खिलाडूवृत्तीने स्पर्धेला तोंड देणं हे आपलं कामच आहे किंबहुना ते आपल्यासाठी अविभाज्य भाग बनलं आहे. पण, त्यातूनही अपयश आलंच तर इतर वाटाही ध्येयापर्यंत पोहोचू शकतात याचं भान आपल्याला असेल तर टेन्शनचा प्रश्नच येत नाही. पर्यायाने आपलं मानसिक आरोग्य योग्य प्रकारे जपलं जाते. या जगात पाऊल ठेवतानाही आपल्याकडे काहीही नव्हते आणि निरोपाच्याक्षणी देखील काही नसणार आहे, याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार केला तर या ताणाला, टेन्शनला आपण आपल्या जवळपासही फिरकू देणार नाही. आयुष्य जगण्यासाठी असून वस्तूंचा संचय करण्यासाठी नाही ही गोष्ट मुळात ध्यानात घेतली पाहिजे, आणि हे सर्वकाही केवळ मनःशांतीने लाभू शकतं. 


मनःशांतीसाठी प्रत्येकाने ध्यानधारणा करण्याची आवश्यकता आहे. 'ध्यान' म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करणे. थोडावेळ शांतपणे बसल्यास रागावर नियंत्रण मिळवता येते. बऱ्या वाईटाचा साधक-बाधक विचार करता येतो आणि आपलं अंतर्मन आपली कधीच फसवणूक करत नाही, अगदी निष्पक्षपणे ते आपल्याला आपल्याच बरोबर आणि चुकीच्या गोष्टींचा न्यायनिवाडा करण्यास मदत करतं. त्यामुळे स्वतःची निर्णय क्षमता वाढते. सकारात्मक उर्जेचा शरीराच्या कणाकणात संचार होतो आणि समाधानाची शांततेची अनुभूती मिळते. असा सर्व शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या कारणीमीमांसेचा भरभक्कम पाया असताना सुद्धा टेन्शन आपल्या भोवती घुटमळतं, कारण आपण स्वतःला अंतर्मुख होण्यासाठी लागणारा वेळच देत नाही. 


मनाच्या बेलगाम घोड्याला काबूत ठेवण्यासाठी आपल्याला काय करायला हवं..? तर सर्वप्रथम एक कुंपण घालायला हवं. म्हणजे हे उधळलेलेले अश्व कुंपणाची सीमारेषा, त्याची मर्यादा पार करू शकणार नाहीत. पण, आपली चूक कोठे होते.? की आपण हे कुंपण घालण्याऐवजी या बेफाम धावणाऱ्या घोड्यांचा पाठलाग करीत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि ते आपल्याला साध्य करता येत नाही. याला कारण आहे ते म्हणजे आपली बदलेली जीवनशैली, आपला सेल्फ टाईम पेक्षा स्क्रीन टाईम वाढला आहे. मोकळा वेळ मिळाला की, टीव्ही, मोबाइल फोन, ईमेल, फेसबुक, व्हाट्सप चेक करतो. ही आकर्षणे आपल्यावर आरूढ झाली आहेत. त्यातच कामाचे वाढलेले तास, उरलेल्या वेळेत कायमच उपलब्ध असलेली ही साधने त्यामुळे स्वतःला स्वतःशी संवाद करायला वेळच मिळत नाही. नव्हे आपण तो देतच नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये.


आपण स्वतः ला इतरांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहोत हे भासविण्यासाठी आपली होत असलेली दमछाक खरेच आपल्याला निरोगी, चिंतामुक्त आयुष्याची खात्री देईल का याचा फिरून प्रत्येकाने विचार करावा. रोज प्रत्येकाने स्वतःसाठी थोडा वेळ द्यावा. चालणे, फिरणे, ध्यानधारणा, प्राणायाम करून मनःशांती साधावी.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या