लेख

१६/९/२०

पावसाळ्यात विजेची उपकरणं सावधपणे हाताळा

विजेची उपकरणे हाताळताना काळजी घ्या

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
पाऊस आता महाराष्ट्रात चांगलाच पडत आहे. पावसाळ्यात काही वेळेस ठिकठिकाणी पडझड होते, आपत्कालीन घटना घडतात. अनेकदा या आपत्कालीन घटना विजेशी संबंधित असतात. त्यामुळे प्रत्येकाने विजेची उपकरणे हाताळताना विशेष काळजी घ्यावी.

परिसरात वीजपुरवठा करणारे मीटर, कॅबिन हे पाण्यापासून तसेच गळतीपासून योग्य पद्धतीने सुरक्षित करण्यात आले आहे याची खात्री करून घ्या. वायरिंगमध्ये काही बदल केल्यास त्याची पूर्णपणे तपासणी करून घ्या. परवाना प्राप्त इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर कडून चाचणी करुन घ्या. घरात टॉर्च आणि मेणबत्त्या सहज सापडतील अशा ठिकाणी ठेवा.

पाऊस सुरू झाला की अधून मधून वीज पुरवठा खंडित होतो. मुसळधार पाऊस नसताना किंवा वादळ नसताना वीज पुरवठा खंडित का होतो असा प्रश्न सर्वसामान्य नेहमी पडतो. वीज खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पिन किंवा डिस्क इन्सुलेटर (चिमणी) तसेच डीपी स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सुलेटर हे  चिनी मातीचे असतात. वीजप्रवाह वितरण यंत्रणेच्या लोखंडी खांबात उतरू नये यासाठी हे इन्सुलेटर अतिशय महत्त्वाचे असतात. उन्हाळ्यात चिनी मातीचे इन्सुलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे दोन-चार थेंब पडले की इन्सुलेटरला तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते आणि वाहिनीमधील वीजप्रवाह खंडित होतो. याशिवाय भूमिगत वाहिन्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी खोदकाम केले जाते. यात भूमिगत वाहिन्यांना धक्का बसतो. वाहिनीला छिद्रे पडतात. उन्हाळ्यात यावर काही परिणाम होत नाही. परंतु, पावसाला सुरुवात झाली की, पाणी या वाहिन्यांमध्ये शिरते आणि वाहिनी बिघाड होतो. परिणामी, वीज पुरवठा खंडित होतो. प्रामुख्याने या दोन बाबी फार जोराचा नसलेल्या पावसातही वीजपुरवठा खंडित होण्यासाठी कारणीभूत ठरतात.

वीज यंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, पाणी तुंबून ते वाहिनीत शिरणे, वीज कोसळली किंवा तिच्या कडकडाटाने दाब वाढणे आदींमुळे वीज पुरवठा खंडित होतो. या पार्श्वभूमीवर जीवितहानी टाळण्यासाठी सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.

पावसाळ्यात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. त्या दृष्टीने पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी विद्युत उपकरणांना पाणी लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. विशिष्ट मीटर जवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्विच बंद करावे व तात्काळ महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून मीटरची जागा बदलून घ्यावी. पावसाळ्यात घरातील कोळी, कीटक, पाल, झुरळ, चिमण्या उबदार जागा मिळावी म्हणून मीटर तसेच स्वीट बोर्डाच्या आश्रयाला येतात. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊ शकतो त्यादृष्टीनेही खबरदारी घेणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस व अशा विद्युत उपकरणांना हात लावू नये. तसेच ओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे वीज उपकरणे अशा ओलाव्यापासून दूर ठेवावीत. तसेच अशी उपकरणे खिडकी तसेच बालकणी पासून दूर असावीत. जेणेकरून, त्यात पाणी जाणार नाही विद्युत उपकरणावर पाणी पडले अथवा त्यात पाणी शिरले तर ते उपकरण त्वरित बंद करून ते मूळ बोर्ड पासून इतरत्र हलवावे. त्यामुळे त्या उपकरणातून शॉक लागण्याची शक्यता राहणार नाही.

घराच्या किंवा इमारतीच्या मेन स्वीच मध्ये व त्याच्या शेजारी असलेल्या किटकॅट मध्ये फ्यूज तर म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे. अशी फ्यूज वायर वापरल्यास शॉर्टसर्किट झाल्यास वीज पुरवठा आपोआप खंडित होतो. तांब्याची एकेरी, दुहेरी वेढयाची तार वापरल्यास शॉर्टसर्किट झाल्यास वीज खंडित होत नाही व मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते.

वीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या तारांची स्थिती योग्य असल्याबाबतची खात्री अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून करून घ्यावी व घरातील वीज जोडणीसाठी लागणारे साहित्य आय.एस.आय. प्रमाणित असावे.  सर्व वीज उपकरणांचे अर्थींग योग्य असल्याबाबतचा खात्री करून घ्यावी व वीजेपासून होणारे संभाव्य धोके टाळावेत.1 टिप्पणी:

असे करा उकडीचे मोदक

मुंबई, दादासाहेब येंधे : गणेशोत्सव तसेच अंगारकी चतुर्थी म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते उकडीचे मोदक आणि उकडीचे मोदक बनवायचे म्हटलं की, बराच वे...

हा ब्लॉग शोधा