ऑनलाईन शिक्षण.. पण, आरोग्याचे काय?
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
ऑनलाइन शिक्षण हे केवळ पालक आणि शिक्षकांच्या मनाचं समाधान म्हणून चालू आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. काही शाळांनी अत्यंत कमी वेळ ऑनलाईनला दिला आहे. याशिवाय अनेक कल्पक उपक्रम मुलांकडून करून घेण्यावर भर देत आहेत. इथे धोका कमी आहे, कारण केवळ स्क्रीन समोर बसावे लागत नाही. विविध उपक्रमांत गुंतून राहील्यामुळे मुलांच्या बुद्धीला चालना मिळते. पण, काही शाळा मात्र तीन ते चार तास मुलांनी स्वतः स्क्रीन समोर बसावे अशा अपेक्षा धरून आहेत. त्यांनी शिस्त राखावी म्हणून गणवेश घालून बसण्याची सक्ती करत आहेत. भरपूर लेखी अभ्यास करून घेत आहे. त्यामुळे पालक त्यातही विशेषतः आई वर्ग मुलांना दामटून स्क्रीन समोर बसवण्यात गुंतलेला दिसून येत आहे.
घरोघरी लॅपटॉप, कॉम्प्युटर नाही. त्यामुळे मोबाईलवर शिक्षण ही एक नवी संकल्पना आपण जन्माला घातली आहे. आजपर्यंत मुलांनी जास्त मोबाईल बघू नये यासाठी सर्वांनी आटोकाट प्रयत्न केले, आणि आता काळ असा आहे की पालक आणि शिक्षक मुलांच्या हातात मोबाईल देत आहेत त्यावर शिकावं म्हणून सतत मुलांवर लक्ष ठेवून असतात. आणि मुलं मात्र व्हिडिओ स्टॉप करून त्यापासून पळ काढत आहेत.
कोरोनाच्या संकट काळात सरकारने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला आहे त्याचे तासन तास चालणारे क्लासही सुरू झालेत मात्र त्याचा मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका वैद्यकीय तज्ञ व्यक्त करीत आहेत. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप या गरजेच्या वस्तू असल्या तरी त्याचा अतिरेक शरीरावर विपरीत परिणाम करू शकतो, शक्यतो, तीन वर्षांपर्यंत मुलांना कोणताही व्हिडिओ किंवा स्क्रीन दाखवणे, लहान मुलांच्या हातात शक्यतो मोबाइल देऊच नये असे केल्याने मुलांना मोबाईलचा अतिवापर किंवा टीव्ही पाण्याचे व्यसन लागू शकते. सतत मोबाइल स्क्रीन पाहिल्यास फुलांच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. एकाच ठिकाणी बसल्याने स्थूलपणा वाढू शकतो. सतत मोबाईल पाहण्याने मुलांना मनका व मानेसंबंधित आजार होण्याचा धोका आहे. तसेच निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो त्यामुळे त्याची चिडचिड वाढू शकते.
अचानक ऑनलाइन क्लास सुरू झाल्याने शिक्षक असो पालक असोत किंवा विद्यार्थी कोणालाही पुर्व तयारी करता आलेली नाही. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना जबरदस्तीने ऑनलाईन क्लासला बसवावे लागत आहे. अशामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आई-वडील जबरदस्ती करतात अशी भावना त्यांच्यात निर्माण होऊ शकते. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्यातील चिडचिड प्रचंड वाढण्याचीही भीती आहे.
विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होण्याची शक्यता अधिक असते अशा वातावरणात विद्यार्थ्यांमध्ये अतिचंचलतेचा आजार बळावण्याचा धोका असतो. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची अद्याप सवय नाही. मात्र, जबरदस्ती केल्यास त्यांच्या मनात पालकांविषयी राग निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारिरीक व मानसिक स्वास्थ्याचाही यानिमित्ताने विचार व्हावा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.