Ticker

10/recent/ticker-posts

हाय रे हाय तेरा घुंगटा...

गरबा खेळताना तीन टाळ्या वाजवल्या जातात. वास्तविक या तीन टाळ्या त्रिदेवाला समर्पित आहे असे मानले जाते. पहिली टाळी ब्रह्मदेवाला, दुसरी टाळी भगवान विष्णूला आणि तिसरी टाळी महादेवाला प्रतीक आहे. तीन टाळ्यांच्या कडकडाटात तिन्ही देवतांचे आवाहन केले जाते.

-दादासाहेब येंधे

गरबा हे पारंपारिक लोकनृत्य आहे. जे भाग्य आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. शास्त्रात नृत्याला अध्यात्मिक साधनेचा मार्ग म्हटले आहे गेले आहे. गरब्याचा शाब्दिक अर्थ गर्भ दिवा असा होतो. गर्भदीप हे खरेतर महिलांच्या सर्जनशक्ती म्हणजेच नवनिर्मितीच्या क्षमतेची संबंधित असा उत्सव आहे आणि या शक्तीची पूजा गरब्याच्या माध्यमातून केली जाते. गरबा सादर करताना नर्तक गोल वर्तुळात नृत्य करतात. वर्तुळात सादर केलेला गरबा जीवनाच्या वर्तुळाचे प्रतीक आहे असे म्हटले जाते. यामध्ये पुरुष महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश असतो. शारदीय नवरात्रात गरबा नृत्यात मध्यभागी घडा ठेवला जातो आणि मातीच्या घड्याला छिद्रे पाडली जातात आणि त्यामध्ये दिवा प्रज्वलित केला जातो. या घड्याभोवती महिला मुली फेर धरतात आणि देवीची स्तुतीपर गीते म्हणून पारंपरिक नृत्य करतात. हा घट अथवा कुंभ हा स्त्रीच्या सर्जनशक्तीचे प्रतीक मानला जातो. गरबा खेळताना तीन टाळ्या वाजवल्या जातात. वास्तविक या तीन टाळ्या त्रिदेवाला समर्पित आहे असे मानले जाते. पहिली टाळी ब्रह्मदेवाला, दुसरी टाळी भगवान विष्णूला आणि तिसरी टाळी महादेवाला प्रतीक आहे. तीन टाळ्यांच्या कडकडाटात तिन्ही देवतांचे आवाहन केले जाते. गरब्याच्या नृत्यात उमटणाऱ्या आवाजाने आणि तरंगाने आई अंबे जागरूक होते असे म्हटले जाते. नवरात्रीच्या नऊ रात्री गरबा आणि दांडिया खेळला जातो.

गरबा - सध्याच्या काळातील गरबा हा मोठ्या प्रमाणावर रास नृत्याने प्रभावित झाला असून पारंपारिक दृष्ट्या रास हे नृत्य पुरुष करतात. रास आणि गरबा यांचे मिश्रण होऊन नृत्याचा एक जलदगती प्रकार तयार झाला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. गरबा नृत्य करताना पुरुष आणि स्त्रिया पारंपारिक रंगबेरंगी पोशाख परिधान करतात. मुली आणि स्त्रिया यावेळी घागरा चोली परिधान करतात. त्यावर मोती, शिंपले, आरसे लावलेले असतात आणि नक्षीकाम देखील केलेले असते. हातभर बांगड्या, कमरबंद आणि पायात पैंजण घालतात. गुजराती पद्धतीने डोक्यावरून ओढणी किंवा मोजरी घेतात. तर पुरुष कफनी, पायजमा, गुडघ्याच्या वर आखूड कुर्ता, पगडी त्यावर बांधणी दुपट्टा फेट्यासारखा बांधतात. हातात कडे आणि पायात मोजरी परिधान करतात.

अलीकडच्या काळात तरुणांमध्ये गरबा नृत्याचे आकर्षण वाढले आहे. गुजरातमध्ये गरबा आणि दांडियाचे खास कार्यक्रम होतात. पण, आता गुजरात बाहेरील राज्यात देखील हे नृत्य रंगताना दिसत आहे. गरबा हा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पोहोचला आहे. अमेरिकेत किमान २० विद्यापीठांत गरबा स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. आणि यात व्यावसायिक नृत्य कलाकारांनी बसवलेले नृत्य देखील साजरी केली जातात. इंग्लंडमध्ये देखील गरबा लोकप्रिय आहे. इंग्लंडमध्ये गुजराती लोका ंची संख्या देखील अधिक आहे. हे लोक आपापल्या प्रांतानुसार गरब्याचे आयोजन करत असतात. इंग्लंडमधील सर्वात लोकप्रिय  चिसविक आणि नॉर्थ ओल्ट या शहरात गरबा खेळला जातो. येथे गरबा बहुतेक वेळा तरुणांकडूनच आयोजित केले जातात. 

गरबा पारंपारिक आणि आधुनिक अशा दोन प्रकारात विभागला गेला आहे. दांडीया, ताली, खंजिरी, मंजिरा, दिवा, टिपरी, तलवार, बेडा थाळी असे गरब्याचे विविध प्रकार आहेत.  

दांडिया रास - दांडिया रास हा वृंदावनचा लोकप्रिय प्रकार आहे. होळी आणि कृष्ण राधाच्या लीला दाखवणारे प्रसंग या नृत्यातून दाखवले जातात. नवरात्रीच्या वेळी गरब्याबरोबर दांडिया रास देखील केली जाते. दांडिया रास हा शब्द संस्कृत शब्द आहे. रासनृत्याचे मूळ हे प्राचीन काळात आले. भगवान कृष्ण रासलीला करत असल्याचे उल्लेख प्राचीन ग्रंथात आढळतात. त्याचे अनेक प्रकार आहेत. पण, त्यातील दांडिया रास हा सर्वात लोकप्रिय असा नृत्य प्रकार आहे. गुजरात मध्ये नवरात्रीच्या वेळी हे नृत्य मोठ्या प्रमाणावर केले जाते. रासनृत्याच्या इतर प्रकारात दंग लीला प्रकार राजस्थानात लोकप्रिय आहे. हा नृत्य प्रकार एकच टिपरी घेऊन केला जातो. उत्तर भारतात रासलीला लोकप्रिय आहे. रासलीला आणि दांडिया हे नृत्य प्रकार सारखेच आहेत. काहीजण तर गरबा नृत्यही रास या प्रकारातीलच मानतात. 

दांडिया रास मध्ये पुरुष आणि स्त्रिया दोन वर्तुळाकार स्थितीत हातात टिपरी घेऊन नृत्य करतात. दांडिया किंवा टिपऱ्या १८ इंचापर्यंत लांब असू शकतात. प्रत्येक नर्तकाकडे दोन टिपऱ्या असतात. तर काही वेळा लहान टिपऱ्या देखील असतात. एका उजव्या हातातच त्या घेतल्या जातात. सर्वसाधारणपणे हे नृत्य चौतालावर आणि टिपऱ्यांनी केले जाते. एकाच वेळी टिपरी वाजवली गेल्याने त्याचा गोड ध्वनी निर्माण होतो. यातील एक वर्तुळ घड्याळाप्रमाणे आणि दुसरे घड्याळाच्या उलट दिशेने फिरत असते. हे नृत्य पाहताना मनमोहक वाटते.

दांडिया नृत्य हे गरबा नृत्यातूनच तयार झालेले आहे. हे नृत्य भक्तीभावाने करण्याचे आहे. दुर्गेच्या सन्मानार्थ ते केले जाते. दांडिया नृत्य प्रकार हा खरे तर देवी दुर्गा आणि महिषासुर यांच्यातील युद्ध प्रसंग दाखवणारा प्रकार आहे आणि त्याला तलवार नृत्य असेही म्हणतात. नृत्याच्या वेळी नर्तक स्वतःभोवती वेगाने गिरकी घेतात आणि आपली पावले आणि हातांची हालचाल करतात. हे नृत्य ढोलक आणि तबला यांच्या तालावर केले जाते. सध्या विशेषकरून, हाय रे हाय तेरा घुंगटा..., हाय रे हाय मुझे निंद ना आये, रमतो रमतो जाय...आज मारो गरबो रमतो जाय, केसरियो रंग तने लाग्यो..., सनेडो, सनेडो लाल सनेडो अशा विविध प्रसिद्ध गाण्यांवर तरुणाईची पावले गरबा-दांडियावर थिरकताना दिसून येतात.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या