Ticker

10/recent/ticker-posts

पाऊस...मनातल्या आठवणींचा!

पहिल्या पावसाने भिजलेल्या मातीचा गंध आला की आम्ही सारं विसरून मन प्रफुल्लित आनंदी होऊन जात होतो. आम्ही भावंडे पावसात मनसोक्त भिजायचो. कपडे ओले व्हायचे. पाय चिखल्याने माखायचे. घरात प्रवेश करताना एक आमचा वेगळाच अवतार अनुभवायला मिळायचा.

-दादासाहेब येंधे

वैशाखवणव्यात धरतीमाता तप्त झाली होती. सूर्य आग ओकत होता. कमाल तापमान म्हणजे काय, हे आता सर्वांना चांगलं कळून आलं होतं. पृथ्वीवरील जीवांचे  मन घामाच्या धारांमुळे कोमेजून गेले होते आणि तेव्हाच आकाशात काळ्या गडद ढगांची चाहूल लागली. वारा घोंघावू लागला आणि वादळ सुरू होऊन विजांचा कडकडाट सुरू झाला. पहिला पाऊस... तहानलेली धारणीमाता पहिल्या पावसाने शांत झाली. मातीचा सुगंध धरणीमातेच्या उदरातून प्रसवू लागला. अशा पहिल्या पावसाचा आनंद घेताना आमचे मन सुखावून गेले. पावसाची अनेक रूपे बालपणी गावाला अनुभवलेली आहेत. 

पहिल्या पावसाने भिजलेल्या मातीचा गंध आला की आम्ही सारं विसरून मन प्रफुल्लित आनंदी होऊन जात होतो. आम्ही भावंडे पावसात मनसोक्त भिजायचो. कपडे ओले व्हायचे. पाय चिखल्याने माखायचे. घरात प्रवेश करताना एक आमचा वेगळाच अवतार अनुभवायला मिळायचा. मग आजीच्या ओरडा खावा लागायचा. मला आजही आठवते लहान असताना मुसळधार पाऊस आला. सोबत वादळही होते. आमचे शेतकरी कुटुंबातील कौलारू घर असल्यामुळे घरात पावसाचे प्रचंड तुषार उडायचे. कुठे लपावे कळायचे नाही. फुटलेल्या कौलांमधून ठीक ठिकाणी पाणी गळायचं. मग घरातली भांडी त्या ठिकाणी आम्ही ठेवत जायचो. वादळी वाऱ्यासह पाऊस असल्याने दरवाजातून पाणी आत मध्ये यायचे. घरातल्या मोठ्या माणसांसोबत आम्हा लहनांचीही पाणी भरण्यासाठी कसरत व्हायची. थेंब थेंब गळून भरलेल्या भांड्यातील पाणी टाकण्यासाठी धांदल उडायची. असं असलं तरी पाऊस उघडून गेला की बाहेरच्या वातावरणाने मन प्रफुल्लित व्हायचे. मग आम्ही सगळेजण कागदाच्या लहान लहान होड्या करून साठलेल्या पाण्यात सोडायचो.

लहानपणी आकाशात पाऊस येण्यापूर्वी ढगांचा गडगडाट आणि विजेचा लखलखाट  सुरू झाला की, मला खूप भीती वाटायची. आजी म्हणायची, अरे घाबरू नकोस... आकाशात म्हातारी दळण दळत आहे. पावसाला सुरुवात झाली की, आजी कैरीचे लोणचे बनवायची. पिवळे धमक लोणचे. वाफाळलेली मुगडाळ खिचडी त्यावर साजूक तुपाची धार. बाजूला चुलीवर भाजलेला कुरकुरीत पापड आणि ताकाची वाटी. सुगरण आजीच्या हातचे अप्रतिम पदार्थ खाताना वेगळीच मज्जा यायची. कधी-कधी तर चुलीवर भाजलेले कणीस, त्यावर हलकीशी मिरची पावडर व त्यावर पिळलेले लिबू.... आजही आठवणीने तोंडाला अक्षरशः पाणी येते. पहिल्या पावसाच्या आठवणींने माझ्या मनाला पुन्हा एकदा भिजवून टाकलं. 

पश्चिम घाटातील पावसाचे सौंदर्य अनुभवत आम्ही लहानाचे मोठे झालो. गवताच्या पात्यांवर पाऊस उघडून गेल्यावर साठलेले थेंबांचे फार आकर्षण असायचे. त्याचे सौंदर्य विलोभनीय असे होते. काळ्याभोर ढगांनी आभाळ भरून आलं की, पावसाची बरसात व्हायची. मनसोक्त आम्ही भिजायचो. पावसात गारवा असला तरी तो हवाहवासा वाटायचा. मन आनंदी होऊन जायचं. निसर्ग सगळीकडे सारखा वाटत असला, पाऊसही सगळीकडे सारखा दिसत असला तरी प्रत्येकाच्या मनात आठवणींचा पाऊस वेगळा असतो असे वाटते. पुण्यातील गाव सोडून मुंबईत आल्यानंतर चारही बाजूने आच्छादलेल्या कंपनीत लॅपटॉप वर काम करताना काचेच्या खिडकीतून बाहेरचं वातावरण पाहिलं की, गावाकडचा पाऊस आठवतो. वाट बघायला लावणारा, कधी कधी पिकांचे नुकसान करणारा, कधी मुसळधार कोसळून दुथडी भरून वाहणाऱ्या ओढया-नदीतला तो पाऊस आपल्याला बोलावतोय असं वाटतं.

आपल्या आठवणींच्या कुपीमध्ये बालपणीच्या अनेक आठवणी जपून ठेवलेल्या असतात. त्यामध्ये एका सवंगड्याचीही आठवण असते. तो सवंगडी म्हणजे पाऊस! आपण कितीही वाढलो तरिही, आठवणींमधला हा ओलावा कधी कमी होत नाही. वाढत्या वयासोबत आठवणीतला पाऊस मनाला नेहमी सुखावत राहतो.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या