Ticker

10/recent/ticker-posts

दिवाळी म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी

दिवाळीला देव आपल्या घरी येतात म्हणून त्यांच्या स्वागतासाठी सडा रांगोळी, पणती, तोरणाने दरवाजा अंगण सजवले जाते आणि अभ्यंग स्नानाने आपणही आंघोळ करतो. या सगळ्या गोष्टींमुळे वातावरणामध्ये पवित्र ऊर्जा, वास निर्माण होतो. जी ऊर्जा आपल्याला तेज प्रदान करते. चैतन्य देते.

-दादासाहेब येंधे

भारतातील प्रत्येकजण दरवर्षी मोठ्या आतुरतेने दिवाळीची वाट पाहत असतो. लहान-थोर अशा सर्वांची सर्व स्तरातील व्यक्तींची दिवाळीला आपण हे करू, आपण ते करू असे मनातल्या मनात सतत उजळणी चालू असते. लहानांची, तरुणाईची, कर्त्यांची, महिलांची जवळपास कुटुंबातील सर्वांचीच दिवाळीसाठीची वेगवेगळी खरेदीची यादी तयारच असते. एव्हाना तयार झालीही असेल. दिवाळीच्या तयारीसाठीची ही यादी टेक्नोसॅव्ही युगातही वेगळाच भाव खात आहे. कारण, दिवाळीच्या तयारीची सुरुवात यादी केल्याशिवाय होतच नाही. यात कर्त्या माणसाची यादी जराशी समंजस तर महिलांची यादी सर्वसमावेशक असते. नुसत्या दिवाळीच्या कल्पनेनेच सर्व कुटुंब आपोआपच उत्साही होऊन जाते.

दिवाळीच्या मुहूर्तावर बऱ्याच घरांमध्ये विविध वस्तूंची उपकरणांची नवीन खरेदी होत असते. त्यातच दिवाळीनिमित्त पदपथावर पणती, रांगोळी, केरसुणी, तोरणे, पूजा साहित्य असे विकणारे छोटे छोटे विक्रेते आपणास दिसून येतात. त्यांच्याकडून आपण या वस्तू खरेदी केल्यानंतर त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसून येतो. तुमच्यामुळे त्यांचेही घर उजळून निघते. त्यामुळेच या दिवाळीला तेजाचा आनंदाचा उत्सव असे म्हणतात.

खरेदी ही दोन्ही बाजूच्या व्यक्तींना आनंद देणारी बाब असून घेणाऱ्याला आवडती व हवी असलेली गोष्ट मिळाली याचा आनंद होतो तर विकणाऱ्याला स्वतःच्या मेहनतीचे फळ मिळते याचा आनंद मिळतो. दिवाळीसाठी प्रामुख्याने वाण सामान, कपडे खरेदी, दागिने खरेदी, सौंदरप्रसाधने, किचन फ्रेंडली उपकरणे, वाहने त्याचबरोबर पूजा साहित्य, आकाश कंदील, पणती, रांगोळी याची हमखास खरेदी केली जाते. फ्रेंडशिप ताईच्या जमान्यात देखील वर्षभर दुर्लक्षित राहिलेल्या केरसुणीची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आजही विधिवत प्रत्येक घरात पूजा केली जाते ही गोष्ट मनाला सुखावणारी आहे. दिवाळी म्हणजे भक्तीचा तेजाच्या काळोखावर मात करण्याचा चैतन्यदायी उत्सव. जनाबाईंनी म्हटलेच आहे...

सण दिवाळीचा आला| नामा राऊळासी गेला|

हातीं धरुनी देवासी| चला आमुच्या घरासी|

याचा अर्थ केरसुणीच्या रूपात साक्षात लक्ष्मी माताच आपल्या घरी येते. आपली पणजी-आजी नेहमी सांगायची अनावधानाने जरी केरसुणीला पाय लागला असला तरी तिला पुन्हा आपण वाकून नमस्कार करावा. कारण केरसुणी ही लक्ष्मी आहे. तिला चुकूनही पाय लावू नये. आपल्याकडे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नव्या केरसुणीला पाणी, हळद-कुंकू लावून तिचे पूजन केले जाते. त्यानंतरच तिचा वापर केला जातो. घरातली ही लक्ष्मी कुलक्ष्मीला म्हणजेच वाईट गोष्टींना घराबाहेर काढते आणि आपले रक्षण करते अशी पूर्वापार चालत आलेली एक प्रथा आहे. आजच्या काळात हे ऐकायला जरा वेगळं वाटत असले तरी या मागचे लॉजिक पाहता आपणास कारण नक्कीच पटेल. आपण ईश्वराच्या चरणी रोज नतमस्तक होत असतो. जिथे आपला अधिवास असतो ते ठिकाण स्वच्छ करण्याचे काम ही लक्ष्मी करते त्यामुळे ती पूजनीय आहे.

देव तेथुनी चालिले| नामयाच्या घरा आले| 

गोणाईनें उटणें केलें | दामाशेटीनें स्नान केलें|

वरील ओळी रुपकात्मक दृष्टीने वाचल्या असता त्यातून असे दिसते की, दिवाळीला देव आपल्या घरी येतात म्हणून त्यांच्या स्वागतासाठी सडा रांगोळी, पणती, तोरणाने दरवाजा अंगण सजवले जाते आणि अभ्यंग स्नानाने आपणही आंघोळ करतो. या सगळ्या गोष्टींमुळे वातावरणामध्ये पवित्र ऊर्जा, वास निर्माण होतो. जी ऊर्जा आपल्याला तेज प्रदान करते. चैतन्य देते. आयुष्य भरभराटीचे जावो असा आशीर्वादही देते. आजच्या भाषेत पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला दिवाळीमुळेच मिळते असे म्हटल्यास वावगे ठरू नये.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या