Ticker

10/recent/ticker-posts

जो सावध तोच सुरक्षित

ऑनलाईन खरेदी-विक्रीत सायबर चोरांकडून ग्राहकांची फसवणूक

-दादासाहेब येंधे

पूर्वी दुकानात गेल्याशिवाय ग्राहकांना हवी ती वस्तू खरेदी करता येत नव्हती. पण, आता डिजिटल युगात एका क्लिकवर आपल्याला हवी ती वस्तू आपल्या घरात बसून मागवता येते. मुंबईतील मलबार हिल जवळ राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने एकदा ऑनलाईन साईटवरून एक मोबाईल फोन विकत घेण्याचे ठरवले आणि पैसे देखील ऑनलाईन भरले. थोड्याच वेळाने त्यांना एक फोन आला. फोन करणाऱ्याने अगदी नम्रपणे आणि प्रेमाने सांगितले की तुमची ऑर्डर पूर्ण करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे तुमचे पैसे परत पाठवायचे आहेत. एक फॉर्म आम्ही तुम्हाला पाठवत आहे. त्यात तुमच्या बँक अकाउंटची माहिती भरून पाठवा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे केल्याने त्या ज्येष्ठ नागरिकाच्या अकाउंट मधून तब्बल एक लाख ५९ हजार रुपये परस्पर वळते केले गेले होते.
जसा जसा स्मार्टफोनचा वापर वाढत आहे तसतशी फसवेगिरी वाढत असून भामट्यांना जणू नवीन रस्ताच सापडला आहे. स्वतःची गोपनीय माहिती जबरदस्ती किंवा आवश्यक नसताना ग्राहक आपण होऊन देऊन फसवगिरीला मदत करत असतो हे प्रत्येक ग्राहकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

कधी-कधी मोबाईल कंपनी किंवा बँकेतून बोलतोय असे फोनवर सांगितले जाते. केवायसी अपडेट करावी लागेल, नाहीतर मोबाईल बंद होईल किंवा खाते वापरता येणार नाही असा प्रेमाने दम दिला जातो. गडबडल्यामुळे ग्राहक मागितलेली गोपनीय माहिती देऊन टाकतो आणि इथेच खरी आपली फसगत होते. फोनवरून जर कोणी वैयक्तिक माहिती किंवा ओटीपी किंवा पिन नंबर विचारत असेल तर तो कॉल सरळ कट करून टाकला पाहिजे. बँकेतील किंवा विमा कंपनीतील कोणीही कर्मचारी अशी माहिती खातेधारकाला कधीही विचारत नाहीत.

फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, स्नॅपचॅट यासारख्या सोशल मीडिया व्यासपीठावर बोगस अकाउंट प्रोफाइल तयार केले जाते. वेगवेगळ्या कंपन्यांच्या ऑनलाइन जाहिराती कॉपी करून त्या या बोगस अकाउंटवर जाहीर केल्या जातात. सोबत बनावट लिंक दिली जाते. हे पाहून कोणी संपर्क केल्यास वेगवेगळी कारणे पुढे करून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. खरेदी केलेली वस्तू ऑनलाईन मिळत नाही.

अशी टाळा ऑनलाईन फसवणूक : -

  • खरेदी साइटवर कोणतीही वैयक्तिक किंवा क्रेडिट कार्ड माहिती प्रविष्ट करण्यापूर्वी, पेजवरील वेब पत्ता "https:" ने सुरू होत असल्याचे तपासा, "http:" नाही. तर हा छोटासा 's' तुम्हाला सांगतो की वेबसाइट तुमच्यासाठी सुरक्षित आणि एनक्रिप्टेड आहे. हे तपासूनच तुम्ही वेबसाईटवरुन खरेदी करा.

  • ऑनलाइन वस्तू मागवताना 'कॅश ऑन डिलिव्हरी' या पर्यायाला प्राधान्य द्या.

  • कॉल ची खात्री पटत नाही तोपर्यंत गुगल पे अथवा अन्य मार्गाने पैसे त्यांच्या ॲपवर पाठवू नका.

  • बँक खात्याचा तपशील व ओटीपी क्रमांक कधीही शेअर करू नका.

  • अनोळखी व्यक्तीने पाठवलेला क्यू आर स्कॅन करू नका.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. खरोखर विचार करायला लावणारा लेख आहे. उत्तम आणि छान असा हा लेख.

    उत्तर द्याहटवा

Please do not enter any spam link in the comment box.