Ticker

10/recent/ticker-posts

गौराई माझी आली सोनपावलांनी...

कोकणात गौरी पूजनाच्या दिवशी गौरीचा ओसा भरण्याची पद्धत आहे. ओसा हा वसा या शब्दाचा अपभ्रम आहे. वसा म्हणजे व्रत. खास या ओवसासाठी माहेरवाशिणी एका वेगळ्याच ओढीने माहेरी येतात. समृद्धीचे प्रतीक असलेल्या गौरीचा फळाफुलांनी भरलेला हा सुपांचा ओसा कोकणात मोठ्या आनंदात साजरा केला जातो.

-दादासाहेब येंधे

महाराष्ट्रातील विविध जाती पोटजातींमध्ये गौरी पूजेची विविधता असली तरी सर्वांच्याच मनातील भक्ती भावाची श्रद्धेची भावना मात्र सारखीच असते. तीन दिवसांच्या उत्सवात गौराईचा थाटमाट तिची पूजा नैवेद्यला असलेली गोडधोडाची रेलचेल, नाचगाणे, झिम्मा-फुगडी, कुमारीका पूजन, हळदीकुंकू यांनी घर गजबजून जाते. माहेरपणाला आलेल्या गौरीला विविध पदार्थांचा नैवेद्य खाऊ घालून तिचे लाड पुरवले जातात. त्यामुळे हा सर्वात समस्त महिला वर्गाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. म्हणजे आपल्या लाडक्या गौराईच्या नैवेद्याचा थाट. कोकण पट्ट्यात आगमनादिवशी गौरी स्थापन झाल्यावर तिची पूजा करून भाजी भाकरी तसेच कोणताही गोड नैवेद्य केला जातो.

गौरी पूजनाच्या दिवशी पाच प्रकारच्या भाज्या, वडे, काळे वाटण्याचे सांभार तसेच लापशीचा नैवेद्य देखील अर्पण केला जातो. ग्रामीण भागात एकत्र कुटुंब एकाच घरात अनेक कुटुंब असतात. या प्रत्येक बिऱ्हाडाकडून वेगवेगळ्या परंतु एकत्रितपणे नैवेद्य दाखवला जातो. प्रत्येक बिऱ्हाडातून आलेल्या या नैवेद्यात गुळ खोबऱ्याच्या करंजा किंवा कान्हेले, लापशी, तांदळाची खीर, पुरणपोळी, पातोळ्या, मोदक असा वेगवेगळा गोड पदार्थ असतोच असतो.

कोकणात गौरी पूजनाच्या दिवशी गौरीचा ओसा भरण्याची पद्धत आहे. ओसा हा वसा या शब्दाचा अपभ्रम आहे. वसा म्हणजे व्रत. खास या ओवसासाठी माहेरवाशिणी एका वेगळ्याच ओढीने बाहेर येतात. समृद्धीचे प्रतीक असलेल्या गौरीचा फळाफुलांनी भरलेला हा सुपांचा ओसा कोकणात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. गौरीचा हा सण म्हणजे जणू कौटुंबिक उत्सवच असतो. त्याच दिवशी रात्री गौरीला फळांचा नैवेद्य दाखवला जातो तसेच कोकणातच काही ठिकाणी अस्सल मालवणी घरात गौरीला तिखटाच्या म्हणजे वडे संगोटी, अळूवडीचा नैवेद्य दाखवण्याची देखील प्रथा आहे. तर विसर्जनाच्या दिवशी भाकरी आणि विसर्जनाच्या दिवशी गौरीला दहिभाताचा नैवेद्य दाखविला जातो. महाराष्ट्रात दर बारा कोसावर फक्त भाषाच नाही तर रितिभाती बदलतात त्याचप्रमाणे पदार्थ बनवायच्या तसेच खाण्यापिण्याच्या पद्धती देखील बदलतात. तसेच वेगवेगळ्या प्रदेशानुसार, प्रांतानुसार प्रथा, परंपरा तसेच गौरीच्या पूजेच्या पद्धतीदेखील बदललेल्या दिसतात. शहरी आणि ग्रामीण भागातही आपापल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या प्रथा परंपरेनुसार गौरीची पूजा केली जाते.

कानडी प्रांतात गौरीला पाच प्रकारची पक्वान्ने दाखवलली जातात. त्यात भाताचे खास असे पदार्थ असतात. याविषयी कर्नाटकातील माहेरवाशीण घरी आल्यामुळे चैतन्यमय वातावरण असते. तिच्या आवडीचे पदार्थ करण्याचा एक वेगळाच आनंद असतो. 

तर सीकेपी न्यातीमध्ये गौरी आगमनादिवशी लाल माठाची भाजी भाकरी, आंबट वरण, तांदळाची खीर हे पदार्थ नैवेद्यला दाखवले जातात. दुसऱ्या दिवशी पुरणपोळी किंवा इतर कोणताही गोडाचा पदार्थ दाखविला जातो. तर विसर्जना दिवशी गुळ खोबऱ्याचे कान्हेले आणि मोदकही केले जातात. गौरीबरोबर दहीभाताची शिदोरी दिली जाते. एवढेच काय दिवाळीत केले जाणारे बेसन लाडू रव्याच्या करंज्या देखील गौराईसाठी आवडीने केल्या जातात. 

कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाडा, विदर्भ अशा प्रत्येक ठिकाणचे गौरी गणपती उत्सवाच्या प्रथा, नैवेद्याच्या पद्धती वेगवेगळ्या पाहायला मिळतात. मात्र, प्रत्येक स्त्रीच्या मनात गौरीच्या सणाचं सारखच आणि एक वेगळं स्थान दिसून येतं. सोनपावली आलेली गौरी विश्व-समृद्धीचा आशीर्वाद देऊन वर्षभराचा आनंद पदरात घालून तीन दिवसांनी पुन्हा माघारी फिरते.

विसर्जनाच्या दिवशी भाजी पोळी, दही भात, कानोल्याचा नैवेद्य दाखवला जातो. विसर्जनाच्या वेळी गौरीला काही खायचे पदार्थ शिदोरी म्हणून देतात. गौरीची आरती करून पुढील वर्षी येण्याचे तिला आमंत्रण दिले जाते आणि निरोप घेतला जातो. गौरी उठताना त्यांच्या गळ्यात २१ पानांची माळ घातली जाते. अशा प्रकारे तीन दिवस राहून त्या परत सासरी जातात.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या