Ticker

10/recent/ticker-posts

निरोगी आयुष्यासाठी या सवयी लावून घ्या

दिवसातला अर्धा तास जर व्यायामासाठी दिला तर आयुष्य नक्कीच वाढेल

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmai.com)

प्रत्येक व्यक्तीला आपण निरोगी रहावे असे वाटत असते. पूर्वीच्याकाळी अनेक माणसे वयाची शंभरी झाली तरी तब्येतीने ठणठणीत असायची असे आपल्याला आपले आईवडील सांगतात. नुसते दीर्घायुष्य नाही तर आरोग्यदायी आयुष्य ही आजची गरज बनली आहे. तसं आयुष्य मिळवण्यासाठी आपल्याला काही सवयी अंगी लावून  घ्याव्या लागतील...


नियमित व्यायाम करणे - तंत्रज्ञानामुळे आपले जीवन पूर्वीपेक्षा आता सुखकर झाले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. असे असले तरी सध्याच्या मानव जातीचे जीवन संपूर्णतः आरोग्यपूर्ण आहे असे म्हणता येणार नाही. वैयक्तिक वापराची वेगवेगळी वाहने आल्यामुळे माणसांचा दररोजचा आपोआप होणारा व्यायाम कमी झाला आहे. सध्या शेतावर काम करणारा मजूरही मोटरसायकलवर कामाला येतो. आता तर अशी परिस्थिती आहे की, कोणत्याही कॉलेजमध्ये सायकल आणणारी मुले आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकी सापडतात. खेडेगावातील तालमी ओस पडू लागल्या आहेत. शहरी भागातील लोकांना व्यायामअभावी पाठ, कंबर, मानेच्या अनेक व्याधींना तोंड द्यावे लागत आहे. ब्लडप्रेशर, डायबिटीस रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. हृदयविकार झालेल्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. पस्तिशी-चाळीशीतच हार्ट अटॅक येऊ लागले आहेत. या स्थिततून जायचं नसेल तर नियमित व्यायाम करणे हाच एकमेव उपाय आहे. दिवसातला अर्धा तास जरी व्यायामासाठी दिला तर आयुष्य नक्कीच वाढेल.


सकाळी भरपूर नाश्ता करणे - सकाळी नाश्ता करणे ही आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक बाब बनली आहे. जेवणात तीनऐवजी दिडच चपाती खा. पण पोटभर नाश्ता करून सकाळी करून घराबाहेर पडावे असे डॉक्टर मंडळींचे म्हणणे आहे.  सकाळी नाश्ता करणारे लोक लठ्ठ होत नाहीत असे संशोधकांना प्रदीर्घ अभ्यासांती दिसून आले आहे. पूर्वी खेडेगावातली माणसे सकाळी उठले की सकाळचे विधी आटोपून चक्क भाजी, भाकरी, दूध असे एक प्रकारचे जेवण करूनच शेतावर कामाला जात असत. मग दुपारी परत शेतावर थोडं जेवण घेत असत. सकाळी केलेली न्याहारी ही शेतातील कामामुळे पासून जात असे. नोकरदार लोकांनीही या पद्धतीचा अवलंब करण्यास काहीच नोकरदार लोकांनीही बाहेर मिळणारे वडापाव, समोसे असले अरबट चरबट खाण्याऐवजी घरात पोहे, उपीट, ब्रेड- आमलेट असा नाश्ता करणे अत्यंत आरोग्यदायी आहे.


मित्रमैत्रिणींच्या सहवासात राहा - कोणत्याही वैद्यकीय उपचारापेक्षा एक चांगला मित्र नेहमी स्वस्त असतो अशा अर्थाची इंग्रजी मध्ये म्हण आहे. या म्हणीचा अर्थ शब्दशः घेऊ नका. तुम्हाला जर चांगले मित्र असतील तर तुमचे आरोग्यही चांगले राहते असा या म्हणीचा अर्थ आहे. अगदी मित्रच नाही तर तुम्ही स्वतःला सतत कोणत्या ना कोणत्या कामात मग ते सामाजिक असो किंवा अन्य प्रकारचे त्यात गुंतवून ठेवा असे वैद्यकीय संशोधकांचे म्हणणे आहे. चांगले मित्र तुम्हाला संकटात मानसिक आधार देऊ शकतात. तुमच्या आर्थिक अडचणीतही मित्र मदतीचा हात पुढे करतात. तुम्हाला एखाद्या कारणाने नैराश्य आले तर तुम्ही मित्रांजवळ आपले मन मोकळे करू शकता. मन मोकळे झाल्यामुळे तुमच्या मनावरचा ताण आपोआप कमी होतो.


भरपूर पाणी प्या आणि पुरेशी झोप घ्या - आपल्या शरीराला ७० टक्के पाणी हवे असते. त्यामुळे आपले आरोग्य टिकवायचे असेल तर भरपूर पाणी पिणे हा चांगला मार्ग आहे. या पाण्यातून शरीरातील पेशींना आपण प्राणवायू पुरवतो. याची तुम्हाला कदाचित कल्पनाही नसेल. आपण अनेकदा पाणी पिण्याचा आळस करतो. पण, तसे करू नका. कारण जेव्हा तुम्हाला तहान लागल्यासारखे वाटेल तेव्हा पाणी प्यायचे चुकवू नका. दररोज आठ ग्लास पाणी प्या. या सल्ल्यावर अनेकजणांनी मतभेद व्यक्त केले आहेत पण पाणी प्यायचेच हे कायम लक्षात असू द्या. 


गेल्या दहा वर्षात दीर्घायुष्याबाबत जी वैद्यकीय संशोधने झाली त्यात शरीराला आवश्यक असणारी आणि झोप न मिळाल्यामुळे माणसाचे आयुष्य कमी होते, असे दिसून आले आहे. किमान सात तास झोप माणसाला आवश्यक असते असे वैद्यकीय संशोधकांचे म्हणणे आहे. तुमच्या शरीराला आवश्यक तेवढी झोप मिळाली नाही तर तुम्हाला डायबेटिस, हृदयविकार, रक्तदाब अशा जीवघेण्या व्याधी होऊ शकतात. काही लोकांना रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघत बसण्याची सवय असते तर काही जण वारंवार रात्री उशिरापर्यंत चालणा-या पार्ट्यांमध्ये व्यस्त असतात. उशिरापर्यंत पार्ट्या करायच्या आणि मग सकाळी उठवत नाही अशा प्रकाराने आपल्याला कमी झोप मिळते. तसेच काहीजण सतत मोबाईलवर सोशल मीडियावर गुंतून असतात. परिणामी, आपल्या डोळ्यांची जळजळ होते. 


आपले शरीर आपल्याला झोप आवश्यक आहे हे सांगत असते. पण, आपण हे लक्षातच घेत नाही. तुम्ही सतत काम करत असतात. तुमच्या शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. हे तुम्ही कधी बघतच नाही. शरीरावर येणारा ताण दूर करण्यासाठी पुरेशी झोप घेणे हा उत्तम उपाय आहे.

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

Please do not enter any spam link in the comment box.