सुरक्षित ठेवण्यासाठी तिला पुन्हा बंधनात जपून ठेवण्याकडे त्याची (घरातील पुरुषांची) मानसिकता झुकायला लागली आहे. काय चुकत आहे त्याचं, तोही बरोबर आहेच की, कारण समाजातील काही नजरांपासून तो तिला वाचवू पाहत आहे. म्हणूनच घरातील पुरुष 'म्हणतोय सातच्या आत घरात ये...'
-दादासाहेब येंधे
सातच्या आत घरात हा तसा जुना आणि अडगळीत गेलेला विचार. पण, काही घटना आठवल्या की मनात पुन्हा विचारचक्र चालू होते. काही महिन्यांपूर्वी एका कॉल सेंटरमधून रात्री अकरा वाजता काम संपल्यानंतर घरी जाणाऱ्या युतीवर तिच्याच सहकाऱ्यांनी तिला पळवून नेऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यावेळी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा जोरदार चर्चेत आला आणि थोड्या दिवसानंतर नेहमीसारखाच कोणतीही कृती न होता तो प्रश्न पुन्हा शांत झाला. आपल्या भारतीय संस्कृतीत पालकांनी व कुटुंबीयांनी समाजातील महिलांचे पुरुष नावाच्या काही निशाचर नराधमांपासून रक्षण करण्याकरिता आखलेली रेषा म्हणजे सातच्या आत घरात...

आताच्या नवीन पिढीने आधुनिकतेच्या नावाखाली बऱ्याच जुन्या विचारांना व चालीरीतींना छेद देऊन स्वतःचे असे नियम आखले आहेत. यातील काही बदल त्यांना विनाशाकडे घेऊन जात आहेत. मुलींना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. यासाठी अडगळीत फेकलेली संकल्पना म्हणजेच सातच्या आत घरात. स्त्री शिकली, कर्तुत्वान झाली, स्त्री-पुरुष समानता आणि समाजही बदलला. पण, समाजाची मानसिकता अजूनही सुरक्षित आहे का? तिला सर्वांकडून मनापासून सन्मानाची वागणूक मिळते का? हा प्रश्न आजही आपल्यासमोर आ... असून उभा आहे.
आरक्षण आले, समानता आली, सर्व क्षेत्रात स्त्रियांनी आपला ठसा उमटवला असे काही असले तरी दिवसेंदिवस स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होतच आहे. कामाच्या ठिकाणी होणारी कुचंबणा, कुचेष्टा, गर्दीचा फायदा घेणारे नराधम हे सर्व स्पष्ट करतात की, भारतीय समाज आजही स्त्रियांकडे फक्त चूल आणि मूल व भोगाची वस्तू याच दृष्टिकोनातून पाहत आहे. भीती, लाज, संकोच, बदनामी यामुळे स्त्रिया तक्रार करीत नाहीत अन याचाच गैरफायदा अनेकजण घेतात.
घराबाहेर पडलेली ती घरात व्यवस्थित येईपर्यंत भीती काळजी आणि त्यातून निर्माण झालेले दडपण आणि त्यावर काहीच उपाय न मिळाल्यामुळे आलेली हतबलता हे प्रत्येक मुलीचे पालक थोड्याफार फरकाने आज अनुभवत आहेत. काय केलं म्हणजे माझी मुलगी, बहीण सुरक्षित राहील...? तिचं घराबाहेर पडणं बंद करू? मित्रांशी बोलणे बंद करू? की नोकरी सोडायला लावू तिला? तिचं व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया बंद करू? तिला जीन्स घालणं बंद करू...नक्की काय करू?या सर्व उपायांमधील अव्यवहार्यता माहीत असूनही हे प्रश्न नवऱ्यांना, घरातील भावांना, आणि तिच्या पालकांना भेडसावत आहेत. या सगळ्यामागे कारण एकच म्हणजे देशात महिलांविरोधी घडत असलेल्या विविध घटना!
बाहेर पडणाऱ्या प्रत्येक मुलीवर, महिलेवर अत्याचार होत नाहीत, अशी बुद्धीला पडणारी समजूत घातली असली तरी ती मनाला पटत नाही. दिल्लीत झालेली घटना असो, हैदराबाद मध्ये घडलेली घटना असो की, मुंबईत मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना असो... या घटना घडण्यापूर्वीही मुलींवरील अत्याचाराच्या बातम्या येतच होत्या. या जगात असंही काहीसं घडतं याची जाणीवही याआधी होती. अत्याचार झालेल्या स्त्रियांसाठी वाईटही वाटत होतं. अत्याचार करणाऱ्यांबाबत रागही येत होता. मात्र, तरीही हे आपल्यापर्यंत पोहोचू शकतं... उद्या कदाचित अत्याचाराची बळी ठरलेल्या स्त्रीच्या जागी माझी मुलगी, बहीण, बायको असू शकेल असा विचार कुणाच्या मनात कधी येत नव्हता. आज बाहेर पडताना महिलांना, मुलींना वाटणारी भीती यापूर्वी कधी वाटली नव्हती. मात्र, आता रिक्षावाला, घरी येणारे सेल्समन, दूधवाला, भाजीवाला, बसमध्ये शेजारी बसलेल्या माणसाबद्दलही तिच्या मनात नकळत संशय येत आहे. की, याच्या मनात माझ्याविषयी काय चालले असेल तर... अशा विचारांनी तिला आणखी असुरक्षित वाटायला लागतं. आता तर तिला तिच्या मित्राचाही आधार पुरेसा वाटत नाही. कारण मित्रच जर गोड बोलून एखाद्या बसमध्ये किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करत असेल तर तिनं कोणावरही विश्वास न ठेवलेलाच बरा.
खरंच ती सबला झाली आहे का.? गेल्या काही वर्षांमध्ये ती सबला झालीही होती. जगाने तिला सबला झाल्याचं सर्टिफिकेटही दिलं होतं. तिच्या सबलीकरणाचे महत्त्व ऐकतच 'ती' मोठी झाली. घरातही तिला समान वागणूक मिळत होती... आणि खरंच ती स्वतःला सबला समजायला लागली. बिंदास बनली; पण आता स्वतः 'सबला' असण्यावर तिच्या विश्वासाला धक्का बसत आहे. तिचा बिनधास्तपणा तिला पोकळ वाटायला लागला आहे. माझ्या आजूबाजूच्या कुणाच्या डोक्यात माझ्याबद्दल वाईट आलं, तर क्षणार्धात माझं विश्व होत्याचं नव्हतं होऊ शकत. काय केलं म्हणजे मी सुरक्षित राहीन? तिच्या या प्रश्नाला रोज होणाऱ्या चर्चांमधून, गप्पांमधून उत्तर मिळत आहेत. कराटे शिका, चाकू बाळगा, सेफ्टी पिन जवळ बाळगा, जवळ तिखट मिरची पावडर ठेवा, असुरक्षित वाटलं की जवळच्या माणसाला फोन करा...इत्यादी. 'खरंच चार-पाच लोक अनपेक्षितपणे तिच्यासमोर उभे राहिले, तर पर्समधून चाकू काढण्याइतकं बळ तिच्या अंगी असेल.' असादेखील प्रश्न समोर उभा राहत आहे. तिच्यासमोर अचानक उभा राहणाऱ्या संकटामुपुढे हे सगळं निष्क्रिय ठरतं. विकृत मानसिकतेपुढे ती खरच हातबल झाली आहे. आपली कर्तबदारी, पद या सगळ्याचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या तिचा स्वतः वरचा विश्वास यामुळे कमी होत चालला आहे.
हा लेख लिहीत असतानाच पुण्यातून एक घटना समोर आली. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एका तरूणीवर अतिप्रसंग घडला. ही तरूणी आपल्या घरी पुण्याहून फलटणला जात होती. पहाटेला ती स्वारगेट बस डेपोमध्ये पोहोचली. बसची वाट पाहत असताना, त्या ठिकाणी आरोपी आला. आरोपीचं नाव दत्तात्रय गाडे आहे. तो एक सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्याच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहे.

दत्ता गाडेनं तरूणीला बस दुसरीकडे उभी असल्याचं सांगितलं. माझी बस इथेच येईल, मी तिकडे जाणार नाही. असं त्या तरूणीनं त्याला सांगितलं. एकटी तरूणी असल्याचं पाहताच त्याच्या डोक्यात सैतान घुसला. त्याने तरूणीला खडसावले आणि कोपऱ्यात उभी असलेल्या शिवशाही बसमध्ये तिला जायला सांगितलं. आत कोणीच प्रवासी दिसत नाहीत. असे ती त्याला म्हणाली. नाही, प्रवाशी झोपले आहेत म्हणून ड्रायव्हरने लाईट बंद केल्या आहेत. असे त्याने तिला सांगितले. 'तु मोबाईलची टॉर्च लावून आतमध्ये जा, हीच बस फलटणला जाईल, असं त्या नराधमानं तिला सांगितलं.' तरूणी टॉर्च लावून आत गेली, आणि तिच्या पाठोपाठ नराधम गेला आणि बसचा दरवाजा बंद करून घेतला. तिला आवाज केल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. लैंगिक अत्याचार करून आरोपी तेथून पसार झाला.
पालकांनी अशा मुलींना असहाय स्थिती सोडण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या मुलींशी पूर्वीपेक्षाही विश्वासाने संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले पाहिजे. शेवटी चाकू, सेफ्टी पिन जवळ असला तरी त्याचा वापर करण्यासाठी अंगात बळ लागतं, धाडस लागतं. ते तिच्यात निर्माण केलं गेलं पाहिजे. त्याही पेक्षा पुरुषांच्या मानसिक सक्षमीकरणाची खरी गरज निर्माण झाली आहे असे वाटते. स्त्रीचा माणूस म्हणून आदर निर्माण करण्याचे मूल्य शालेय स्तरापासून मुलांमध्ये रुजवणे गरजेचे आहे. हल्ला करणे, अत्याचार करणे, संपविणे, चेहऱ्यावर ऍसिड फेकणे यात कुठला आला पुरुषार्थ ही भावना मुलांच्या मनामध्ये रुजवावी लागेल.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.