Ticker

10/recent/ticker-posts

ज्येष्ठ ठरताहेत सायबर गुन्हेगारीचे बळी

सायबर गुन्हेगारीमध्ये देश, भाषा वयोगट, लिंग कशाचाच अडसर राहिलेला नाही. तंत्रज्ञानस्नेही असलेल्या तरुण पिढीच्या बाबतीत किंवा तरुण स्त्रिया आणि अल्पवयीन मुलींच्या बाबतीत हे गुन्हे अधिक घडताहेत असं समजून इतरांनी गाफील राहण्याची चूक करू नये.

-दादासाहेब येंधे

एकाकी वृद्धांचं 'हनी ट्रॅप' मध्ये अडकण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिक यात अडकण्यामागच्या सामाजिक, भावनिक, वैयक्तिक, मनोसामाजिक असे विविध पैलू आहेत. मुख्य म्हणजे ही संघटित गुन्हेगारी असल्याने कुटुंब आणि समाजाने याविषयी जागरूक असणे गरजेचे आहे.


नोकरीतून दोन वर्षे आधीच रिटायरमेंट घेतलेली एक विधवा महिला सोशल मीडियावर असलेल्या 'फ्रेंड रिक्वेस्ट' मधून एका अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात येते. डिजिटल दोघेही कनेक्ट होतात. आधी चॅटिंग, मेसेजेस मग फोन नंबर शेअर केला जातो आणि फोनवर त्यांचं बोलणं सुरू होतं. वरकरणी हे सर्व सामान्य वाटत असलं तरी ते बोलणं टप्प्याटप्प्याने वाढत जातं. समोरच्या माणसाचा आवाज आपुलकीचा भासू लागतो. तो ज्याविषयी माहिती देत असो ती माहिती सुद्धा खरी वाटू लागते. पाच- सहा महिने हे रोज चालू असतं. समोरून बोलणारा माणूस अगदी विश्वासातला बनून जातो. घर खरेदी, गुंतवणुक सर्वात फायदेशीर मार्ग कसा आहे हे तो तिला पटवून देतो आणि तीही विश्वासाने तिची सगळी वैयक्तिक माहिती त्याच्याशी रोज शेअर करते. घर घेण्याची तयारी दर्शवते. अल्पावधीच्या त्या स्त्रीच्या नावानं कागदपत्र तयार होतात. बघता बघता नव्या घरासाठी थोडे थोडे करून ती २० लाख रुपये त्या व्यक्तीच्या खात्यावर ट्रान्सफर करते. पण, काही दिवसातच समोरून फोन करणारा तो व्यक्ती बोलणं टाळू लागतो. उडवाउडवीची उत्तरे देऊ लागतो आणि नंतर काही दिवसात तो नंबरच बंद होतो. फोन लागत नाही. आणि घरही मिळत नाही. सगळी कागदपत्र खोटी बनवून दिल्याचे समोर येते. फोन नंबर शिवाय त्या व्यक्तीची कुठलीच माहिती त्या महिलेकडे नसते. फसवणूक झाल्याचा तिला संशय येतो आणि तोच खरा ठरतो. 


दोन वर्षे रिटायरमेंटला शिल्लक असतानाही तब्येतीच्या कारणामुळे दोन वर्ष आधीच निवृत्ती घेतल्याने थोडी थोडकी नव्हे तर तब्बल २० लाख रुपयांची रक्कम तिच्या हातातून निसटलेली असते. दोन पैसे वृद्धत्वाला कामी येणार होते; पण तेही गेले. परदेशात राहणारे तिच्या मुलाला आईच्या बँक खात्यातून डेबिट झालेल्या पैशांची माहिती कळते. तो आईकडे त्याविषयी माहिती मागू लागतो. पण, त्याला खरं कसं सांगायचं. आपले नातेवाईक काय म्हणतील. पोलिसांना आपण काय सांगायचं. तो माणूस आपल्याला फसवू शकतो यावर सुरुवातीला विश्वास ठेवायला ती तयार नसते. पण, आर्थिक पुंजी मात्र कमी झालेली असते आणि मानसिक धक्का तो निराळाच. एकूणच पदरी निराशाच पडलेली असते.

अशीच एकटी आयुष्य जगणाऱ्या आणखी एका महिलेची एका व्यक्तीबरोबर ऑनलाईन ओळख झाली. फोन, मेसेज व्हाट्सअपच्या माध्यमातून मैत्री फुलत गेली. मैत्री करून फसवणूक करायची हा माणसाचा हातखंडा असल्याचे थोड्याच दिवसात समोर आलं. कारण त्या बाईच्या समोरच्याच्या गोड बोलण्यावर पुरता विश्वास बसलेला होता. प्रेमाचे शब्द एकटे पडलेल्या महिलेला भुरळ घालू लागतात आणि तेच झालं. रोजच्या गप्पा हव्याहव्याश्या वाटू लागल्या. बोलणं झालं नाही तर ती महिला अस्वस्थ होत होती. भावनिक गुंतागुत वाढत होती. काही महिने हा प्रकार चालू होता. एके दिवशी ती समोरील पुरुष व्यक्ती त्या बाईकडे त्या एकटीची विशिष्ट प्रकारचे फोटो काढून ते त्याला पाठवण्याची मागणी करतो. त्या महिलेचा त्याने एवढा विश्वास संपादन केला असतो की, ती यात काहीतरी वावगं आहे अशी साधीशी कल्पनाही तिला येत नाही. शिवाय आपण ज्येष्ठ आहोत तरी आपलं आकर्षण वाटतेय असा भाबडा समज झाल्याने त्या महिला त्याच्या सांगण्याप्रमाणे वागते. स्वतःचे अर्धनग्न फोटो ती त्याला शेअर करते. फोटो हाती जाताच त्यांचे  मोर्फिंग केलं जातं आणि तिला धमक्या यायला सुरुवात होते. मला पाच लाख रुपये दे जर दिले नाहीस तर तुझ्या नातेवाईकांना, ओळखीच्या लोकांना हे तुझे अश्लील फोटो पाठवून देईन. सोशल मीडियावर असे फोटो टाकून तुझी बदनामी करू असा विश्वासघात झाल्याच्या त्या महिलेच्या लक्षात येतं.  मनावर झालेला आघात आणि या घटनेचे दडपण प्रचंड असह्य होतं. ही गोष्ट कोणाला आणि कशी सांगायची याची भीती तिच्या मनात दडलेली. वरील दोन्ही घटना वाचल्यास त्या दोन्हीही महिला 'हनी ट्रॅप' मधाळ बोलण्याच्या शिकार ठरलेल्या आहेत हे सिद्ध होतं. 


सध्या सायबर गुन्ह्याच्या विविध पद्धती ज्येष्ठ नागरिकांना लक्ष करू लागल्या आहेत. कधी पॉलिसीच्या पैशांचे आमिष, कधी गिफ्ट लागण्याचे आमिष, कधी तुम्हाला स्वस्तात फ्लॅट मिळवून देण्याचं आमिष तर कधी धमकीचे मेसेजेस, तर कधी केवायसी अपडेट करा नाहीतर दोन तासांत फोन बंद करू अशा धमक्या येतात. कधी गोड बोलून रोज फोनवर गप्पा मारून 'हनी ट्रॅप' ची नवीन पद्धत. आतापर्यंत आपण म्हणायचं की बाहेरच्या देशांमध्ये असे गुन्हे घडत आहेत.  आपल्याकडे नाही. पण, आता या गैरसमजातून प्रत्येकाने बाहेर पडण्याची वेळ आली आहे. कारण सायबर गुन्हेगारी मध्ये देश, भाषा वयोगट, लिंग कशाचाच अडसर राहिलेला नाही. तंत्रज्ञानस्नेही असलेल्या तरुण पिढीच्या बाबतीत किंवा तरुण स्त्रिया आणि अल्पवयीन मुलींच्या बाबतीत हे गुन्हे अधिक घडताहेत असं समजून इतरांनी गाफील राहण्याची चूक करू नये. कारण ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. याबाबत आपल्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येकाने सावध करणे गरजेचे आहे.(लेखक क्राईम रिपोर्टर आहेत.)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या