Ticker

10/recent/ticker-posts

सकारात्मक मानसिकतेची गरज

 निरोगी आरोग्य हाच खरा माणसाचा जीवन जगण्याचा मंत्र

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)


टेन्शन, डिप्रेशन आणि त्यातून क्वचितप्रसंगी उचलला जाणारे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल... अशा अनेक घटना आपल्याला आजूबाजूला सतत घडताना दिसतात. मानसिक आरोग्य हा खूप महत्त्वाचा विषय बनला आहे. हल्लीच्या धकाधकीच्या जमान्यात एकूणच ताण खूप वाढलाय. पण, यातून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पालकांशी, मित्रमैत्रिणींशी संवाद, आवडता छंद जोपासणे असू असे खूप काही... ज्यामुळे आपण ताण तणावातून बाहेर पडू शकू. 

 


कोणत्याही व्यक्तीच्या विकासात जेवढं शारीरिक आरोग्य महत्त्वाचे असतं तेवढीच मानसिक आरोग्याची भूमिकाही महत्त्वाची असते. सध्याचे जग हे धावपळीचे, स्पर्धेचं आहे. या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला आपली स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आवड निर्माण झाली आहे. ह्या अशा धकाधकीच्या जीवनात तग धरून राहण्यासाठी व्यक्तीला त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची निगा राखावी लागते. परंतु, हल्लीच्या तरुणाईचं मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे. अपयश, निराशा, प्रेमभंग इत्यादी कारणांमुळे खचून जाऊन तरुणाई आत्महत्येसारख्या टोकाच्या पावलाकडे वळत आहे. या घटना वेळीच थांबायला हव्यात. यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. तरुणाईचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. तरुणाईत आत्मविश्वास निर्माण करून त्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. शाळा-कॉलेजांत शिबिरांच्या माध्यमातून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाणे गरजेचे आहे.


सध्याच्या धावपळीच्या जीवनामुळे मानसिक ताण तणाव वाढत चालले आहेत. हा तणाव मर्यादेत असेपर्यंत घाबरण्याचं कारण नाही. परंतु तो अधिक गंभीर स्वरूप धारण करायला लागला की त्याचे परिणाम नोकरी, नातेसंबंध, व्यवसाय आणि विशेषतः शारीरिक स्वास्थ्य यांच्यावर झाल्याशिवाय राहत नाही. असं झालं तर मानसोपचारतज्ञाची मदत घ्यायला हवी. त्याचबरोबर आपल्या वर्तनात, दिनचर्येत आणि विचार करण्याच्या पद्धतीत काही साधे बदल केले तर मानसिक ताण तणावावर नकीच मात करता येईल. मानसिक तणाव वाढायला लागेल तेव्हा आपल्या कुटुंबीयांकडे आणि मित्रांकडे जा, त्यांना आपल्या मनातील दुःख सांगा. मन मोकळे झाल्यामुळे ताण-तणाव कमी होतो. सकारात्मक विचार करण्याऱ्या आशावादी लोकांच्या सतत संपर्कात राहा. त्यामुळे आपल्या मनावरचा ताण कमी होईल. दररोज व्यायाम करणं, सकाळ-संध्याकाळ भरपूर झोप घेणं हे उपायही मानसिक तणाव कमी करण्यास उपयुक्त ठरतील.


आरोग्य हाच खरा माणसाच्या जीवन जगण्याचा मंत्र आहे. परंतु आजकालच्या शर्यतीच्या आणि स्पर्धेच्या जगात माणसाला स्वतःचे आरोग्य राखण्यासाठी वेळच मिळत नाही. नोकरी, शिक्षण, राहणीमान, प्रेम, सोशल साईटवर प्रसिद्धी या सर्व बाबतीत स्पर्धा सुरू आहे आणि या सर्व गोष्टींचा माणसाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे हे चित्र बदलणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी स्वतःच्या शरीराची काळजी घ्यावी. व्यायाम करावा. नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. या सर्वांमुळे आपलं मानसिक आरोग्य मजबूत होईल.


समाजाने नातेवाईकांनी घालून दिलेली बंधनं पाळण्यात अपयश येणे किंवा एखाद्या गोष्टी विषयी मर्यादेपलीकडे जाऊन विचार करणे. स्वतःवर दडपण ओढवून  घेणे ही प्रमुख कारणे  टोकाच्या विचाराकडे आपल्याला घेऊन जातात. आयुष्यात समोर आलेले अपयश पचवण्याची मानसिकता आजकालच्या तरुण पिढीत कमी असल्याचे जाणवते म्हणूनच असं टोकाचं पाऊल उचलणे इतपत हिम्मत करण्याची इच्छा तरुणवर्गात दिसते. शैक्षणिक संस्था तसेच सरकारी पातळीवर याविषयी जागरूकता निर्माण करण्यात म्हणावं तेवढं यश आलेले नाही याचाच परिणाम म्हणजे आत्महत्येचं प्रमाण भारतात जास्त आहे. आपल्या प्रियजनांशी संवाद साधणे आणि त्यांची मनस्थिती समजून घेणे गरजेचे झाले आहे. अशा तणावपूर्ण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मानसोपचार तज्ञांची मदत घेणे हा देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो.


टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

Please do not enter any spam link in the comment box.