Ticker

10/recent/ticker-posts

गुढीपाडवा म्हणजे नववर्ष, चैतन्य

 गुढी म्हणजे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)


चैत्रपालवीच्या आगमनाने निसर्ग बहरून येतो. आम्रतरुवर मोहोर फुलून येतो. वटवृक्ष मोहोरून येतात. निसर्गाच्या कणाकणात चैतन्य फुलतं. आणि अशा या समृद्धीला घेऊन येतो, गुढीपाडवा!


गुढीपाडवा म्हणजे नववर्ष, चैतन्य. उत्साह आणि विविध प्रांतांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणारा हा सण आहे. वेगवेगळ्या प्रांतात दिंड्या, पालख्या, खेळ खेळणे, सामूहिक पद्धतीने देवाची पूजा करणे अशा पद्धतीने गुढीपाडवा साजरा केला जातो. भारतीय संस्कृती चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचे किंवा पितळेचा तांब्या बसवून  गुढी उभारली जाते. ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतीक मानली जाते. ती विजयाचा संदेशही देत असते.

ब्रह्मदेवाने या शुभमुहूर्तावर सृष्टी निर्माण केली, तर मत्स्यरूप धारण करून भगवान विष्णूंनी शंकासुराचा वध केल्याचे सांगितले जाते. त्या मत्सरुपी विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच झाला आहे.


तसेच श्री शालिवाहन राजाने चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून शके गणनेला सुरुवात केली असून मातीचे सैन्य तयार केले. सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यावर पाणी शिंपडून प्राण फुंकले. सैन्याच्या मदतीने याच दिवशी शकांचा पराभव केला या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन शके सुरू होते आणि नववर्षाची सुरुवात होते असे म्हटले जाते.


तसेच महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राकडून प्राप्त कळकाची काठी जमिनीत रोवून त्याची पूजा केली. नववर्ष प्रारंभीच्या दिवशी या परंपरेचा आदर म्हणून अन्य राज्येही काठीला रेशमी वस्त्र घालून शृंगार करून पूजा करू लागले. तेव्हापासून विजय, धैर्य, त्याग, आनंद, आरोग्यदायी असे सूचित करणारा हा सण साजरा केला जाऊ लागला. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. दारी उभारलेली गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. तसेच या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवउपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी मुहूर्त न बघतात खरेदी केल्या जातात.


असा साजरा करा गुढीपाडवा...

गुढीपाडव्याचे अनुष्ठान सूर्योदयापूर्वी केले जाते. या दिवशी सकाळी उठून तेल लावून स्नान केले जाते. नंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पाने आणि फुलांचे तोरण लावून सजविले जाते. यानंतर घराच्या एका भागात गुढी उभारली जाते. संत एकनाथ यांनी त्यांच्या धार्मिक काव्यात गुढी हा शब्द असंख्य वेळा वापरला आहे. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यांतून संत एकनाथ हर्षाची उभारावी गुडी, ज्ञातेपणाची, भक्तीसाम्राज्य, यशाची रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची,  निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपके वापरताना आढळतात. यावरून कळते की, आपल्या परंपरेत आणि संस्कृतीत गुढीचे महत्त्व अलौकिक आहे.


गुढीला कडुनिंबाच्या पानांच्या लहान डहाळीचा जुडगा बांधलेला आपण पाहतो. कडुनिंब जंतुनाशक असल्याने गुढीवर लावले जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाली ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर चाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचारोग बरे करणे, धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण कडुनिंबाच्या अंगी आहेत. शरीराला थंडावा देणाऱ्या कडुनिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घालावीत. ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले समजले जाते.

या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. उंच बांबूच्या काठीला कडुलिंबाची डहाळी काठीच्या वरच्या टोकाला रेशीम वस्त्र अथवा साडी गुंडाळतात. फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्याचयस धातूचे भांडे ठेवले जाते. गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो. गुढीच्या वरती तांब्या ठेवतात त्या तांब्यातून त्यातून पाणी प्यायल्याने ते औषधाप्रमाणे असते असे मानले जाते. गुढीला गंध, फुले, अक्षता वाहिल्या जातात. निरंजन दाखवून दुपारी गोडाचा नैवेद्य आणि संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा दिल्या जातात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या