१२/६/२१

सायकल चालवा, आरोग्य मिळवा

 सायकल  चालती फिरती व्यायामशाळाच 

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

सायकल हे एक पुरातन, सुपरिचित, सुलभ, स्वस्त, आरोग्यवर्धक व समाजोपयोगी वाहन आहे. तसेच बिनखर्चिक, सोपे, सुरक्षित आणि व्यायामाचे उत्तम साधन आहे. 

स्वयंचलित वाहनांचा वाढता वापर हा संपर्ण भारतासाठीचा चिंतेचा विषय ठरतो आहे. पेट्रोल-डिझेल हे पदार्थ भारताला मोठया प्रमाणात आयात करावे लागतात. परिणामी, वायूप्रदुषणही मोठया प्रमाणात होते. त्यामुळे सध्याच्या पिढीने पुढील काळात नव्या पिढीवर सायकल वापराचे संस्कार घडवावेत. सायकलींचा भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात जितक्या वेगाने प्रचार होईल तितक्याच वेगात भारताची इंधनाची गरज कमी होत जाईल. 

जगात मोठया पदावरील व्यक्तीही ठराविक दिवशी स्वतः सायकलवर आपल्या कार्यालयांत येण्याचे धाडस दाखवतात. परिणामी, तेथील जनतेवरही सायकल वापराची उपयुक्तता ठसते. चीनसारख्या देशातही सायकलींचा प्रचार व प्रसार मोठया वेगाने झाला आहे. भारतातही तसे घडणे सहज शक्य आहे. परंतु आपल्या देशात स्वयंचलित वाहने मालकीची असणे हेच मुळी सामाजिक प्रतिष्ठा मानली जाते. त्याउलट सायकल बाळगणे, वापरणे कमीपणाचे समजले जाते. ही मानसिकता बदलल्याषिवाय सायकलींचा प्रसार होणार नाही. 

मोटारींमधून निघणारे कार्बन मोनाक्साईड, नायट्रोजन आॅक्साईड, ओझोन, हायड्रोकार्बन या दूषित वायूंनी धोक्याची पातळी केव्हाच ओलांडली आहे. त्यामुळे आपले जीवनच धोक्यात आले आहे. पर्यावरण संतुलित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. सायकलींने हे शक्य आहे.

सायकल हे एक चालती फिरती व्यायामशाळाच आहे. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. हृदयाची क्षमता वाढते, पायाचे स्नायू बळकट होतात. फुफुसांची क्षमता वाढते. प्रसन्नता वाढून मनावरचा ताण कमी होतो. भूक आणि झोप सुधारते. गुडघेदुखीत लाभकारी आहे. वजनावर नियंत्रण येते. 

शासन-महानगरपालिका या सर्वांनी सायकलीचा वापर वाढविण्यासाठी नागरिक संस्थांना, मंडळांना प्रोत्साहन दिले पाहिजे. पुनश्च सायकलीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सर्व स्तरावरून सुनियोजित प्रयत्न व्हावेत. प्रदूषण व तत्सम समस्या नियंत्रित ठेवणारा सायकलस्वार, खऱ्या अर्थी समाजसेवक आहे. त्यांना योग्य प्रोत्साहन मिळाले पाहिजे. शाळा-काॅलेज, आस्थापनांसह रेल्वे, बस स्थानकांवर सायकलींसाठी विनाशुल्क पार्किंग असणे गरजेचे आहे. 

वाॅकिंग प्लाझाप्रमाणे ठराविक दिवशी, वेळी गर्दीच्या निवडक रस्त्यांवर फक्त सायकली व पादचारी यांनाच प्रवेश असणारे ‘सायकल प्लाझा’ उपक्रम राबवावेत.

३०/५/२१

समजून घेणं महत्त्वाचं

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

चांगला जोडीदार मिळाला की आयुष्याची नौका सुरळीत चालते. त्यामुळे जोडीदार निवडीचा निर्णय हा आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो.  घाईघाईत घेतलेला  किंवा इतरांच्या सल्ल्याने घेतलेला निर्णय अनेकदा पश्चाताप करायला लावणारा ठरू शकतो. अशावेळी भविष्यात या निर्णयावरून इतरांना दोष देण्यापेक्षा जोडीदार निवडताना नेहमी प्रत्येकाने सावध राहणे गरजेचे आहे. यासाठी विवाहापूर्वी काही गोष्टी ध्यानात ठेवणे आवश्यक ठरते.

जबाबदाऱ्यांची जाणीव : सर्वप्रथम लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी मुलगा-मुलगी दोघांनाही जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक आहे. कधी-कधी लग्नाचे वय झाल्यामुळे किंवा घरच्यांच्या आग्रहाखातर लग्नाचा निर्णय घेतला जातो. परिणामी, जबाबदाऱ्यांची जाणीव नसल्यामुळे लग्नानंतर अडचणींना सामोरे जावे लागते.

स्पष्टपणा : जोडीदार निवडताना सर्वात महत्त्वाचा असतो तो परस्परांतील सुसंवाद. स्पष्टपणा आणि समजूतदारपणा. जोडीदारांची ओळख झाल्यानंतर एकमेकांशी मोकळेपणाने बोलल्यामुळे परस्परांच्या स्वभावाची आवडीनिवडीची ओळख होण्यास मदत होते. या गोष्टी कळल्या की परस्परांना समजून घेणे सोपे जाते. अनेकदा जोडीदार म्हणून एकमेकांना पसंती दर्शवल्यानंतर होणाऱ्या भेटीगाठी, गप्पा- गोष्टींमध्ये केवळ समोरच्याची स्तुती करण्यासाठी किंवा मन जिंकण्यासाठी लग्नानंतर त्याच गोष्टी नकोशा वाटतात. त्यातूनच मग वादविवादाचे प्रसंग उद्धभवतात. त्यामुळे विवाहापूर्वीच जे सत्य आहे ते स्पष्ट करणे आवश्यक आहे.

कमी लेखू नका : आपल्या स्टेटसबद्दल वारंवार बोलून जोडीदाराला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये. दोघांनाही आयुष्याचा पुढचा प्रवास एकत्रितपणे करायचा आहे हे लक्षात ठेवून स्वाभिमान बाजूला ठेवून सामंजस्य दाखवलं तर एकमेकांचे स्वभाव पटकन समजतील आणि निर्णय घेणे सोपे जाईल.

अर्थकारण : लग्नानंतरचं आयुष्य सुखकर होण्यासाठी उत्पन्न हा महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे जोडीदाराच्या उत्पन्नाबाबत संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपत्कालीन प्रसंगांना तोंड देण्याची वेळ आल्यास आवश्यक असणाऱ्या आर्थिक तरतुदींबाबतही माहिती घेणे गरजेचे आहे.

आरोग्य : एकमेकांच्या इतर आवडी-निवडी प्रमाणे एकमेकांच्या आरोग्याविषयी जाणून घ्यावे. बरेचदा मुलगा किंवा मुलीला गंभीर आजार आहे. हे लग्नानंतर समजते. अशा वेळी नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यामुळे लग्नापूर्वीच एकमेकांच्या आरोग्याबाबत मनमोकळी चर्चा होणे गरजेचे आहे. अलीकडे, लग्न करण्यापूर्वी रक्त तपासणी केली जाते. अनेकजण ही गोष्ट अपमानास्पद मानतात. पण, भविष्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आपल्याकडे विवाहापूर्वी पत्रिका बघून 'गुणमिलन' पाहिलं जातं आणि ते झाले की, लग्नाची बोलणी पुढे केली जातात. मात्र बरेचदा पत्रिकेतील गुण जुळुनही वैवाहिक जीवन  सुखकर होतं असं नाही.  त्यामुळे त्या गुणांसोबत मनोमिलन होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे परस्परांना एकमेकांना जाणून घेणे.

१६/५/२१

दूध उत्पादकांचा रोजगार वाढावा

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणाऱ्या दुग्धव्यवसायाची तर कोरोनामुळे वाटच लागली आहे. दुधाचे दर प्रतिलिटर १० ते १२ रुपयांनी कोसळले असून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. योग्य भाव मिळत नसल्याने दुग्ध व्यवसाय पुरता मोडकळीस होण्याच्या मार्गावर आहे. दुधाला किमान ३२ ते ३५ रुपये इतका भाव मिळावा या प्रश्नासाठी आंदोलने पेटत आहेत.

महाराष्ट्रातील सहकारी चळवळ जोमात असली, तरी ६५ टक्के दूध खासगी डेअऱ्या व दुध प्रक्रिया उद्योगामार्फत शेतकऱ्यांडून खरेदी केले जाते. मुंबई-पुण्यासारख्या शहरांतून ग्राहकांना जरी एक लिटरला  ४० ते ५० रुपये मोजावे लागत असले, तरी दूध उत्पादक शेतकऱ्याच्या हाती मात्र, २५ ते ३० रुपयांपेक्षा कमीच दर पडतो. दुधाचा उत्पादन खर्च लक्षात घेतला तर, तो २६-२८ रुपयांपर्यंत येतो. परिणामी, बऱ्याचदा शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. शेतकऱ्याच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या आणि मोठया प्रमाणात नफा कमावणाऱ्या दूध संघावर सरकारचे नियंत्रण असणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरते. 

दुग्ध व्यवसायात कार्यरत असलेल्या अल्प भूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना पशुखाद्य आणि चारा खरेदीच्या क्षमतेअभावी जनावरांना पुरेसा आहार देता येत नाही. तसेच पौष्टीक चारा उपलब्ध नसणे, साठवणुकीची कमकुवत सुविधा आणि तांत्रिक साहाय्य नसणे, यासारख्या अडचणींमुळे दूध उत्पादनावर मर्यादा येते. हे अडथळे विचारात घेतले, तर सुरक्षित डेअरी शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे उत्पादन तसेच सक्षम अशा स्वरूपाच्या विपणन सुविधा उपलब्ध कराव्या लागतील. म्हणजेच, दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीबरोबरच ग्रामीण भागातील प्रक्रिया उद्योगांमध्ये दूध उत्पादकांचा सहभाग वाढवावा लागेल. 

दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने तातडीने सकारात्मक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने बहुतांश शेतकरीवर्गाच्या घरासमोर संकरीत गायीचा गोठा आहे. पतसंस्था सोसायट्या बँकांच्या माध्यमातून तरुण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले आहे ते कर्ज आता कशा पद्धतीने फेडायचे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विवंचनेत दूध उत्पादक शेतकरी पुरता अडकलेला आहे.राज्य सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा.


२०/४/२१

सोशल मीडियातील वाढत्या धोक्यांपासून सावध राहा

 प्रत्येकाने सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने  करणे गरजेचे

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

भारतात स्वस्त झालेल्या इंटरनेट सुविधेमुळे तरुण-तरुणींमध्ये समाज माध्यमांच्या वापराची क्रेझ सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फेसबुक आणि व्हॉट्सऍप जणू तरुणाईचा श्वास झाला आहे. फेसबुक, व्हाट्सअप, मेसेजेस, ट्विटर यासारख्या मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी होत असेल तर तो उत्तमच आहे. पण सर्वजण या मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी करतातच असे दिसत नाही. समाजातील विकृत आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या माध्यमांचा वापर तरुणी आणि महिलांची फसवणूक करण्याकरताच अधिक वापरत असल्याचे मोठ्या प्रमाणात उघड होत आहे. फेसबुकवर तर अल्पवयीन मुलींशी मैत्री करून ओळख वाढवून त्यांचे अश्लील फोटो तयार करून बाहेर काढण्याची धमकी देत तिला भेटायला बोलावले जाण्याच्या घटना उघडकीस येत आहेत.

एका घटनेत तर फेसबुकवर मैत्री करून आपण मोठा व्यापारी व पैसेवाला असल्याचे भासवून एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून लग्नाला नकार दिला. तरुणीने जेव्हा गावात त्याचा शोध घेतला, तेव्हा तो मोठा व्यापारी- व्यावसायिक नाही, तर एक सलुन दुकानदार होता. याबाबत पोलिसांत तक्रार केल्यानंतर सलून चालक आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले.

समाज माध्यमांच्या अतिवापरामुळे गुन्हेगारही तेवढ्याच गतीने वाढत चालले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणापुढेदेखील माध्यमांतील गुन्हेगारीला रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.  बदनामी, अश्लील व आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या दोषींना तीन ते पाच वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. या कायद्याची जनजागृती समाजात होणे गरजेचे आहे.

फेसबुकवर अनेक खाती बनावट नावाने असतात. त्यामुळे विश्वासार्ह आणि आधीच ओळख, परिचय असलेल्या व्यक्तीच्या खात्यावर माहिती शेअर केली पाहिजे. अनोळखी व्यक्तीकडून आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. अनोळखी व्यक्तींशी झालेल्या मैत्रीतूनच फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. बलात्कार आणि अत्याचारासोबतच आर्थिक फसवणूक होऊ शकते. कार्यालयीन कामाचे ठिकाण असो की ऑफिस कामाचे निमित्त काढून फेसबुक, व्हाट्सअपच्या माध्यमातून महिलांना छळण्याचे प्रकारही होत असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे चॅटींगचा स्क्रीनशॉट काढून ठेवत पोलिसांत तक्रार केल्यास संबंधितांविरुद्ध पुराव्यासह गुन्हा दाखल होऊ शकतो. समाज माध्यम संपर्क, समन्वय आणि संवादासाठी प्रभावी माध्यम असले तरी त्याचा गैरवापर करणारे गुन्हेगारही तेवढेच वाढले आहेत.

किमान आपण कोणाला मानसिक आधार देऊ शकत नसू तर आपल्यामुळे कोणाला मनस्ताप होईल अशी कृत्य टाळणे आवश्यक आहे. कधी कधी जिवंत व्यक्तीलाही श्रद्धांजली वाहण्यात येते. एकाने वाहिलेली पाहून सगळेजण तीच कृती करतात. कुणी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही.  सोशल मीडियावरील काहीजणांचा क्रोध संताप व्यक्त करण्यासाठी केलेल्या पोस्टमधून विकृत मानसिकतेचे दर्शन होत असतं आपल्या प्रसारित होत असलेल्या संदेशमुळे नकळतपणे आपण विकृतीचा भाग बनतो याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे, तरच अशा प्रकाराला आळा बसेल. यापूर्वीसुद्धा जातीय धार्मिक भावना भडकविण्याचा, समाजमन कलुषित करणाऱ्या,  तत्सम अफवा पेरण्याचं काम समाज माध्यमांवर झालं आहे. आपल्या संदेशामुळे नकळत कुणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जाऊ नये याचे किमान भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.

सोशल मीडियामुळे प्रत्येक सामान्य माणूसही  पत्रकारांची भूमिका बजावू लागला आहे; पण त्याचवेळी सोशल मीडियामुळे आणि फेक न्युजचे आवाहनही संपूर्ण जगासमोर उभे ठाकले आहे. सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात प्रबोधनात्मक संदेश येत असतात. सर्वत्र नवे प्रबोधन पर्व उतरल्यासारखे वाटते. आपण शहाणे झालो आहोत आणि अवघ्या जगाला शहाणे करून सोडविणे आपलेच कर्तव्य आहे. या भावनेतून बरेच महानुभव आलेला प्रत्येक मेसेज शक्य तेवढ्या मित्रांना आणि ग्रुपवर अग्रघोषित करत असतात. त्यात पुन्हा सबसे तेज फक्त असल्याचे मिळवायचे असते. त्यातून आपण फेक न्युजचा फैलाव करत आहोत याचे त्यांना पुसटशीही कल्पना नसते. असा साधा विचारही त्यांना शिवत नाही. आपण साऱ्या जगाची चिंता वाहत असल्याच्या भ्रमात हे चिंतातूर असतात. 

मुख्य प्रवाहातील पत्रकारिता म्हणजे 'द्वारपाल' सिद्धांतावर चालते. वार्ताहर बातमी देतो, उपसंपादक वृत्तसंपादक आणि संपादक द्वारपाल यांची भूमिका निभावतात. सोशल मीडियात द्वारपाल नावाची संकल्पनाच नाही. आणि शक्यही दिसत नाही. म्हणूनच काहीही पुढे ढकलले जाते यावर कुठेतरी अंकुश असणे गरजेचे आहे. समाज माध्यम जेवढे प्रभावी तेवढेच ते धोक्याचेही आहे. हे ओळखून प्रत्येकाने सोशल मीडियाचा वापर करणे आवश्यक आहे.  
३१/३/२१

स्वतःच्या सुरक्षेविषयी कुठेही तडजोड नकोच

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

सध्या काही लंपट मुलांकडून, पुरुषांकडून बस स्टॉपवर, मॉलमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी तरुणींचे, महिलांचे त्यांच्या नकळत फोटो काढले जातात. व्हिडिओ शूटिंग केले जाते. गर्लफ्रेंड बरोबरच्या इंटिमेट क्षणांना मोबाईलने 'शूट' करण्याचा मोह अनेकांना होतो. पण अगदी खासगी क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण आपल्या मित्रांना 'फॉरवर्ड' करून केवळ गंमत म्हणून ह्याचा आनंद लुटला जातो. 'जस्ट फॉर फन'. पण, काही विकृत वृत्तींचे तरुण त्यापुढचीही पायरी गाठतात. मुलींना किंवा विवाहित महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी ते सर्रास अशा क्लिप वापरतात. तेव्हा अशा समाजकंटकांच्या जाळ्यात तरुणी  फसतात व त्यातच गुरफटून जातात.

हल्ली इलेक्ट्रॉनिक वस्तू इतक्या फॉरवर्ड निघाल्या आहेत की साध्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने स्त्रीलंपट तरुण जीन्स पॅन्ट व शर्ट घालणाऱ्या तरुणींची चालताना त्यांच्या शरीराच्या हालचाली आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपत असतात.  

समीक्षा (काल्पनिक नाव) एका खाजगी कंपनीत टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करते. कामावरून सुटल्यानंतर ती दादर मार्केटमध्ये शॉपिंग करत असताना एक तरुण तिचा पाठलाग करत असल्याचा तिला संशय येतो. ती सावधपणे पुढे सरकते. काही वस्तू खरेदी न करता त्या तरुणाला चुकवण्याचा प्रयत्न ती करते. तेव्हा तिच्या लक्षात आले की हा तरुण माझे चित्रीकरण करत आहे. गर्दी असल्यामुळे त्या तरुणाला कसे पकडावे हा विचार ती करत होती. तो तरुण मात्र समीक्षाचा पिच्छा सोडण्यास तयार नव्हता. त्याचे धाडस पाहून समीक्षा संतापली. आता मात्र या तरुणाला सोडायचे नाही त्याचा मोबाईल काढून घेऊन त्याच्या मुस्कटात ठेऊन द्यायचे ठरवून ती मागे फिरली आणि तिने त्याला स्पष्ट विचारले, 'तू माझा पाठलाग का करतोस? माझे मोबाईल मधून शूटिंग का करत आहेस? तुझा मोबाईल दाखव? समीक्षाने धाडस करून त्या तरुणाकडे मोबाइलची मागणी केली. तेव्हा त्या तरुणाने चक्क नकार दिला. त्या तरुणानेही समीक्षावर आक्रमक पवित्रा घेत तिचा आरोप धुडकवीत तिला मोबाईल देण्यास चक्क नकार दिला. त्यांची शाब्दिक बाचाबाची सुरू असतानाच समोर बघ्यांची गर्दी जमली. गर्दीमध्ये पुरुषांची संख्या सर्वाधिक असल्याने समीक्षाने माघार घेतली. याचाच फायदा घेत तो तरुण समीक्षालाच बडबड करीत गर्दीत गायब झाला. पुढे समीक्षाही तेथून निघून गेली. पण, पुढे अनेक दिवस त्या तरुणाने आपले पाठीमागून चित्रीकरण केले असेल तर? त्या चित्रिकरणाचं तो काय करेल? त्याची क्लिप्स बनवून मित्रांना फॉरवर्ड तर करणार नाही ना? या भीतीने तिला झोप लागत नव्हती. त्या दिवसापासून  समीक्षा ने टंच जीन्स पॅन्ट व शॉर्ट -टॉप वापरायचे सोडून दिले. फॅशनच्या नावाखाली मी जर तंग कपडे घातले नसते तर कदाचित दादरच्या मार्केटमध्ये जो प्रकार माझ्याबरोबर घडला तो कदाचित घडलाच नसता असे समीक्षाचे म्हणणे आहे. खरेतर अशा लंपट व्यक्तीला तेथेच पकडून पोलिसांच्या स्वाधीन करणे गरजेचे आहे. तरच असे प्रकार थांबतील.

आपले नाव न छापण्याच्या अटीवर एका महिला पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, काही तरुणी तर पैशांच्या हव्यासापोटी किंवा चुकीच्या व्यक्तीबरोबर असलेल्या संबंधांतून नको त्या मोहजाळ्यात फसतात. आपल्या अत्यंत खाजगी क्षणांना कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करण्याची मुभा त्या त्यांच्यासोबत असणाऱ्या पुरुषांना देतात. नात्यावरच्या विश्वासाच्या शपथा देत इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्यात येते. कित्येकजणी या प्रकारांना बळी पडतात. समोरच्या व्यक्तीची नियत चांगली नसेल तर अशाप्रकारे कॅमेऱ्यात टिपलेल्या क्षणांचा सर्रास दुरुपयोग होतो. ब्लॅकमेल करण्यापासून ते शरीरविक्री करणाऱ्यांसाठी बळजबरी करण्यापर्यंत विविध संदर्भात या व्हिडिओचे क्लिप्स वापरून मुलींना किंवा महिलांना यात गोवण्यात येते. 

बॉयफ्रेंड बरोबर फोटो काढतानाही ते फोटो तुमच्या खाजगी क्षणांबद्दल नसतील याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तुमच्या बॉयफ्रेंडवर तुमचा कितीही विश्वास असला आणि आपलं नातं कधीच तुटणार नाही अशी तुमची पक्की खात्री असली तरी भविष्यात काय घडेल हे सांगणे फार कठीण. आणि जर दुर्दैवाने तुमचे नाते तुटले तर तुमचा मित्र त्या क्षणांचा त्या फोटोचा दुरुपयोग करणार नाही याची खात्री कोण देणार? प्रेमभंग झाल्यावर तो माणूस कसा वागेल हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे त्यांना कुठल्याही परिस्थितीत फोटो आणि व्हिडिओ स्वरूपात बंदिस्त करणे टाळलेलंच बरं. 

तुमच्या अपरोक्ष तुमचे मित्र तुमच्या घरी येत असतील तर वेळीच सावध व्हा. बऱ्याच घटनांमध्ये विश्वासू अन नेहमीच्या मित्रांनीच धोका दिल्याचे उघडकीस आले आहे. तेव्हा तुमच्या रूममधील आडोसे, कोपरे वेळोवेळी तपासात जा. जेणेकरून कुठे छुपा कॅमेरा नाही ना याची खात्री होऊ शकेल. स्वतःच्या सुरक्षेविषयी कुठेही तडजोड करू नका.सदर लेख महिलांचे आवडते मासिक माझी सहेली यांनी (मार्च २०२१) प्रसिद्ध केला आहे.


१५/३/२१

सायबर क्राईम रोखा

पोलिसांना सायबर प्रशिक्षण द्या

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

सध्या गुन्हेगारीच्या पद्धतीप्रमाणे पोलिसांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. आता सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. गुन्हेगार अनेक प्रगत तंत्र वापरत आहेत. त्यामुळे पोलिसांनाही आधुनिक शस्त्रास्त्रे आणि प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. इंटरनेटचा वापर सध्या मोठ्या प्रमावर केला जात असून त्यावरून आर्थिक व्यवहारही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे सायबर क्राईम वाढत चालले आहेत. दिवसाढवळ्या नागरिकांना लुटले जात आहे. महत्त्वाच्या ठिकाणी सायबर युनिट स्थापन देखील करण्यात येत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात असे युनिट स्थापन करण्यात यावेत. त्याद्वारे गुन्हेगारांपर्यंत पोलीस पोहोचत आहे. आता पोलिसांनी सायबर साक्षर होणे गरजेचे असून जनतेनेही याबाबत सतर्क होणे आवश्यक आहे. दहशतवादी, नक्षलवादही महत्त्वाचे आव्हाने आहेत. त्यांची विचारधारा समजून त्यांचे समर्थक, हितचिंतक शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. 

पोलिसांची कठीण परिस्थिती आणि त्यांना प्रतिकूल परिस्थितीत करावी लागणारी मेहनत समजून घ्यावी. पोलिसांचे मनोबल वाढवावे. पोलिसांची उपेक्षा थांबवावी. प्रसारमाध्यमातून पोलिसांची जी प्रतिमा रंगवली जाते. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा ढासळतच आहे. पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी पोलिसांच्या कामाचे तास कमी करून ते आठ तास करण्यात यावेत. त्या प्रमाणात दलात भरती करण्यात यावी. अनेकदा कुचंबनेमुळे,  व्यायामाअभावी, दडपणामुळे, छंद जोपासण्यासाठी वेळ मिळत नसल्यामुळे, कुटुंबाला वेळ देता येत नसल्याने आणि आर्थिक अडचण या कारणांमुळे पोलिसांमध्ये एकाकीपणा येतो त्यावर समुपदेशन यासारखा उपाय शोधावा लागेल.

पोलीस दलात अनेक कर्तबगार महिला आहेत. मात्र, त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार जबाबदारी देण्यात येत नाही. महिला त्यांची जबाबदारी योग्य रीतीने पार पडू शकतील, हा विश्वास पोलिस दलात असणे आवश्यक आहे. त्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. पोलिसांच्या प्रत्येक श्रेणीत मनुष्यबळाची कमतरता आहे. त्याप्रमाणे त्या जागा भरण्यात याव्यात. सध्या पोलीस भरतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, नुसती भरती होणे महत्त्वाचे नसून भरती झालेल्यांना सायबर प्रशिक्षण देणेही गरजेचे आहे. सध्या उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण केंद्राच्या मर्यादेनुसार पोलिस दलात भरती करण्यात येत आहे. पोलीस खात्याला आणखी प्रशिक्षण केंद्राची गरज आहे. दिवसेंदिवस सायबर क्राईम वाढत असल्याने त्याबाबत कायदे करणे गरजेचे आहे. 

१४/३/२१

स्वातंत्र्यासोबत सुरक्षितता महत्त्वाची

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

सध्या महिला घरदार आणि नोकरी नेटाने सांभाळत असून त्या आता मोकळ्या हवेत उंच भरारी घेत आपले स्थान निर्माण करीत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक महिलांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी बलिदान दिले, तर काही महिलांनी जनतेसाठी लढत असलेल्या आपल्या नवऱ्याला त्यांच्या कामगिरीत साथ दिली. त्यापैकी रमाबाई आंबेडकर यांनी त्याग करून नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्याचप्रमाणे सावित्रीबाईंनी अन्याय स्वीकारत महिलांना शिक्षण देण्याचा ध्यास घेत त्या पहिल्या शिक्षिका झाल्या.  तसेच सर्वत्र गाजत असलेला मराठी चित्रपट 'आनंदीबाई जोशी' हा चित्रपट सर्व महिला व पुरुष वर्गाला भावला. डॉक्टर आनंदीबाई पहिल्या डॉक्टर महिला ठरल्या. केवळ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले गोपाळराव यांच्यामुळेच. त्या पहिल्या स्त्री डॉक्टर बनल्या आणि त्याचप्रमाणे संसर्गजन्य कुष्ठरोगावर काम करत प्रकाश आमटे यांना साथ देत त्यांची पत्नी मंदाकिनी आमटे यांनी सुद्धा अनेक आदिवासी भागातील लोकांची आरोग्य सेवा करत त्या सर्वांच्या आई झाल्या. 

सिंधुताई सकपाळ म्हणजे सर्वांच्या 'माई' यांनी अनेक संघर्ष करत निराधार मुलांना आधार देत मोठे केले. त्यांना सांभाळत त्यांच्या त्या आई झाल्या. अशाच अनेक महिला आजही लढत आहेत. प्रत्येकाचे कार्य मोठे आहे आणि या कार्यालाच सर्व महिलांनी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि त्यांचे विचार समजून ते  आत्मसात करण्याची गरज आहे. या सर्व महिला कष्टातून लढत मार्ग काढत सर्वांना दिशा देत एक प्रेरणादायी ठरल्या आहेत. या महिलांप्रमाणे अनेक महिला सामाजिक कार्यकर्ते स्त्री स्वातंत्र्याची बीजे रोवताना दिसून येत आहेत. 

पूर्वी महिला फक्त 'चूल आणि मूल' एवढ्यातच सीमित होत्या. सतीप्रथा, बालविवाह, केशवपन यासारख्या गंभीर अत्याचारांना सामोरे जायच्या. त्यामुळे अनेक वेळा त्यांना शिक्षण घेण्यापासून वंचित राहावे लागत होते. पूर्वी ग्रामीण भागातील महिला साक्षर नव्हत्या. त्या घराचा किंवा घरातील माणसांचाच विचार करत होत्या. त्यामुळे घराचा उंबरठा ओलांडताना त्यांना कित्येकदा विचार करावा लागत होता. परंतु अनेक युवक पुरुषांनी या महिलांना शिक्षित केले. स्त्री स्वातंत्र्याची बीजे रोवत त्यांना स्वबळावर जगण्यासाठी उभं करत घरादाराच्या प्रगतीप्रमाणेच स्वतःचा विचार करण्याचे स्वातंत्र्य मिळवून दिले. बदलत्या काळानुसार महिलांचे राहणीमान जरी बदलत असले तरी आधुनिक जगात वावरताना पूर्वीपेक्षाही कित्येकपट आज महिला प्रत्येक क्षेत्रात मोलाची कामगिरी करताना दिसत आहेत. तरीही आजच्या युगात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहतोय. स्त्रियांवर अत्याचार वाढत आहेत. त्यात कौटुंबिक कलह आणि वाढते अत्याचार यांचे प्रमाण अधिक दिसून येते. या अत्याचारापासून महिलांनी आपले संरक्षण करणे गरजेचे आहे. एकीकडे आपण म्हणतो की, स्त्रीला स्वातंत्र्य मिळाले याच स्वातंत्र्यामुळे तिला आता विविध गोष्टींपासून सुद्धा सावध राहणे ही तिची स्वतःसाठीची  लढाई आहे. तेव्हाच ती तिच्या सुरक्षेमध्ये खऱ्या अर्थाने सक्षम होईल. समाजाने देखील महिलांप्रती मदतीचा हात पुढे केला पाहिजे. 

सायकल चालवा, आरोग्य मिळवा

  सायकल  चालती फिरती व्यायामशाळाच  -दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) सायकल हे एक पुरातन, सुपरिचित, सुलभ, स्वस्त, आरोग्यवर्धक व समाजोप...