भामटे लावताहेत एटीएम सेंटरमध्ये छुपे कॅमेरे
-दादासाहेब येंधे
एटीएम मधून पैसे काढत असताना सावध रहा. कारण तुमच्या अज्ञानाचा आणि साधेपणाचा फायदा घेऊन काही भामटे तुमची फसवणूक करून लुबाडणूक करू शकतात. मागील काही महिन्यांत देशभरात अशा अनेक घटना उघडकीस आलेल्या आहेत.
ज्येष्ठ नागरिक, डोळ्याने कमी दिसणारे, कमी शिक्षण झालेल्या व्यक्ती मोठ्या प्रमाणात या भामट्यांच्या जाळ्यात अडकू लागल्या आहेत. कळत-नकळत आपल्या खात्यातून लाखो रुपये काढले जात आहेत. काही घटना लगेच उघड होतात, तर काही घटना उघडकीस यायला वेळ लागतो. विशेष म्हणजे अशा घटना घडल्यानंतर संशयित अद्यापपर्यंत निष्पन्न झालेले नाहीत. कधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज मध्ये कैद झालेल्या असतील तरीही त्यांच्यापर्यंत पोलिस पोहोचण्यास वेळ लागू शकतो किंवा पोहोचू शकत नाही. त्यामुळे एटीएम मधून पैसे काढताना अतिशय सतर्कता बाळगा. चोरी, दरोडा व घरफोडी नंतर हा नवा फंडा उदयास येत आहे. बँकेकडूनही आपणास मदत मिळण्याची शक्यता नसते. त्यामुळे एटीएम कार्ड धारकाने स्वतः जागरूक राहावे असे सांगावेसे वाटते.
बऱ्याच घटनांमध्ये काही भामटे एटीएम मशीन मध्ये बारीक स्वरूपाचा कॅमेरा बसवतात. त्यातून ग्राहकांचे गुप्त कोड हेरले जातात. त्यानंतर कार्ड क्लोन किंवा तांत्रिक माहितीचा उपयोग करून त्यातून कोडच्या माध्यमातून ग्राहकांचे पैसे काढून घेतले जातात. असे गुन्हे करणारे भामटे या तंत्रात अतिशय तज्ञ असतात. तुम्हाला काही कळायच्या आत तुमच्या अकाऊंट मधून पैसे काढून घेतलेले असतात. सायबर गुन्ह्यात अशी पद्धत मोडली जाते. आता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती झालेली आहे. फसवणूक झालेले ग्राहक तेथे जाऊन तक्रार नोंदवू शकतात.
कधीकधी एटीएम मध्ये ज्येष्ठ व्यक्ती किंवा कमी शिक्षण असलेले नागरिक मशीन मधून पैसे काढायला गेले असता काही भामटे लोक अशा नागरिकांवर पाळत ठेवून आधीच एटीएमच्या आजूबाजूला उभे असतात. पैसे काढणाऱ्या व्यक्तीच्या मागे थांबून, 'आजोबा, मामा, भाऊ, काका, ताई' असे म्हणत मी तुम्हाला मी मदत करू का? अशी केविलवाणी विचारणा करतात. तंत्रज्ञान फारसे अवगत नसलेल्या व्यक्ती पटकन मदत घ्यायला तयार होतात आणि तेथेच त्यांची प्रथम फसवणूक झालेली असते.
पैसे काढण्यास गेलेल्या व्यक्तींजवळील एटीएम कार्ड आपल्या हातात घेऊन मशीन मध्ये टाकले जाते. तेथे गोपनीय असलेल्या पिन कोड संबंधित व्यक्तीला टाकायला सांगितला जातो किंवा आपल्याच हाताने टाकला जातो. विशिष्ट रक्कम काढल्यानंतर ती रक्कम त्या व्यक्तीच्या हातात दिली जाते. नंतर हात चलाखी करून ज्येष्ठ नागरिकांजवळील एटीएम कार्ड स्वतःजवळ ठेवून भामट्या त्याच्याजवळील एटीएम कार्ड ज्येष्ठ नागरिकाच्या हातात सोपवतो. अशा भामट्यांकडे अनेक बँकांचे कार्ड असतात. एटीएम मध्ये प्रवेश करताना खिशातच अशी अनेक कार्डे त्यांनी ठेवलेली असतात. मदत करणाऱ्या व्यक्तीजवळ ज्या बँकेचे कार्ड असते त्याच बँकेचे कार्ड लुबाडणूक केलेल्या नागरिकाच्या हातात दिले जाते. ही व्यक्ती काही अंतर गेल्यानंतर काही क्षणात दुसऱ्या किंवा त्याच एटीएम मधून त्यांच्या कार्डाच्या माध्यमातून रक्कम काढून घेतली जाते.
एटीएम मधून पैसे काढताना आपले कार्ड कोणाच्याही हातात देऊ नका. चुकून कार्ड दिले गेले तर काही संशय असल्याने तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा. तसेच आपल्या बँकेत त्याची माहिती द्या. जेणेकरून कार्ड ब्लॉक करता येईल व आपले पैसे वाचतील. तसेच एटीएम सेंटरमध्ये गेल्यानंतर आपल्या मागे कोणी थांबले आहे का? याची माहिती ठेवा. शक्यतो अनोळखी व्यक्तीच्या हातात आपले एटीएम कार्ड देऊ नका. एटीएमची पूर्ण माहिती नसेल तर जवळच्या नातेवाईकाला सोबत घेऊन जा व कार्ड तुमच्याच हातात. ठेवा गोपनीय कोडही आपण स्वतःच टाकावा तसेच मशीनमध्ये कुठे गुप्त कॅमेरा नाही ना याची खात्री करा. कारण भामटे या कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग करून आपल्या कार्ड सारखेच सेम क्लोनिंग केलेले कार्ड बनवून आपल्या खात्यातून पैसे काढू शकतात.


0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.