Ticker

10/recent/ticker-posts

नायलॉन मांजा ठरतोय जीवघेणा

नायलॉन किंवा चायनीज मांजा सर्वसाधारण मांजाच्या तुलनेत धारदार असतो. या मांज्यातून करंट येण्याचा धोका असतो. नायलॉन मांजा  सहजपणे तुटूही शकत नाही. याच कारणास्तव या मांजात अडकल्यानंतर अनेक पक्षी आणि माणसांचा मृत्यू झालेला आहे. 

-दादासाहेब येंधे

जानेवारी महिना उजाडला की सर्वांना वेध लागतात ते मकर संक्रातीचे. संक्रातीनिमित्त पतंग उडवण्याची आपल्याकडे जुनी पद्धत आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद घेतात. पण, अलीकडे हा खेळ जीवघेणा ठरत आहे. पूर्वी पतंग उडवण्यासाठी दोऱ्याचा किंवा घरगुती मांजाचा वापर केला जात असे. आता मात्र, पतंग उडवण्यासाठी नायलॉनच्या मांजाचा वापर केला जात असल्याने मानवाबरोबरच पक्षांच्याही जीवावर संक्रात येत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पतंग काटाकाटीच्या खेळात दरवर्षी शेकडो पक्षी बळी पडत असून नागरिक देखील गंभीर जखमी किंवा काही ठिकाणी बळी  जात असल्याच्या घटना समोर येत आहेत.

पतंग उडवताना तुटलेला मांजा बऱ्याच वेळेस झाडावर व विजेच्या तारांवर जसाच्या तसाच राहिल्याने पक्षांना मोठी दुखापत होते.  पक्षांप्रमाणेच हा नायलॉनचा मांजा मानवाला देखील अपायकारक ठरत असून आजपर्यंत अशा प्रकारच्या मांजामुळे अनेकांचे गळे, हात, पायांना ईजा झाली असून बरेचजण या मांजामुळे मृत्यू देखील पडले आहेत. नायलॉन मांजाचे पक्षी व मानवाला असणारे धोका लक्षात घेता शासनाने त्याच्या विक्रीवर बंदी घातली असून राज्य सरकारनेही अधिसूचना पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नुसार जाही केली आहे. पेटा या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या मांजाच्या बंदीसाठी याचिका देखील दाखल केली होती. पेटा ने सरकारच्या प्राणी कल्याण मंडळाला मांजावर बंदीसाठी देखील आवाहन केले होते. तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला देखील यावर बंदीसाठी आवाहन केल्याने त्या नंतर राज्य सरकारने आदेश पारित करून नायलॉन मांजावर बंदी टाकली आहे. आकाशात उडत असलेल्या पक्षांवर त्या मांजामुळे मोठी संक्रांत आली असून पक्षांना हा मांजा दिसून येत नसल्याने त्यांच्या पंखांनाव पायांना गंभीर दुखापत होते. या नायलॉन मांजामुळे अनेक पक्षांचा जीव देखील गेलेला आहे. दरम्यान नायलॉन मांजा खरेदी व विक्री करण्यावर कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येते. नायलॉन मांजा निर्मिती व विक्री यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.


दरवर्षी घुबड, पांढऱ्या मानेचा करकोचा, राखाडी पाण कोंबडी, चिमणी, कबूतर, कावळे आदी पक्षी नायलॉन मांजाच्या जाळ्यात अडकून बळी पडताना दिसून येत आहेत. नायलॉन मांजामुळे जखमी पक्षांवर उपचार करणे देखील अवघड बनत चालले आहे. बऱ्याच पक्षांना कायमस्वरूपी अपंगत्व देखील येते. त्यामुळे त्यांना आयुष्यभर पिंजऱ्यात राहावे लागते. तर मानवाला देखील या नायलॉन मांजाचा त्रास होत आहे. २०२१ साली जानेवारी महिन्यात कामानिमित्त कोर्टात जात असताना पोलीस अधिकारी राकेश गवळी हे  मुंबईतील जे.जे. उड्डाणपूलावर नायलॉन मांजा गळ्यात अडकल्यामुळे जखमी झाले होते. त्यावेळी वरळी पोलीस ठाण्यात ते कार्यालय होते. राकेश गवळी यांचा गळा कापला गेला होता. शस्त्रक्रिया करून त्यांना दहा टक्के पडले होते. गळा कापला गेला आहे हे त्यांना त्यावेळी कळालेच नव्हते. मात्र, आजूबाजूच्या लोकांनी त्यांना निदर्शनास आणून दिले. त्यानंतर ट्राफिक पोलिसांच्या मदतीने राकेश गवळी हे जे. जे. रुग्णालयात दाखल झाले व नंतर त्यांच्यावर  व्होकार्ड रुग्णालयात एक तास शस्त्रक्रिया करण्यात आली. थोडक्यात त्यांचा जीव वाचला. तर २०२३ साली मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाणेतील समीर जाधव हे आपली ड्युटी संपवून घरी जात असताना मांजाने त्यांचा गळा कापला जाऊन त्यांचा बळी गेला होता. तर १४ जानेवारी २०२५ रोजी नाशिकमध्ये दुचाकीवरुन जाणाऱ्या व्यक्तीचा नायलॉनच्या मांजाने गळा कापला गेला. यात त्याचा मृत्यू झाला होता. मध्यप्रदेशातील बैतूलमध्ये नायलॉन मांजामुळे एका डॉक्टरचं नाक कापलं गेलं. त्यांच्या नाकावर १० टाके पडले. गुजरातमध्ये नायलॉन मांजामुळे गळा कापल्याने  तीन ते चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नायलॉन मांजा विक्रेते व साठवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

पतंग उडवण्यासाठी बऱ्याचदा नायलॉन मांजाचा वापर केला जातो. हा मांजा प्लास्टिक आणि धातूच्या मिश्रणापासून तयार केला जातो. नायलॉन किंवा चायनीज मांजा सर्वसाधारण मांजाच्या तुलनेत धारदार असतो. या मांज्यातून करंट येण्याचा धोका असतो. नायलॉन मांजा  सहजपणे तुटूही शकत नाही. याच कारणास्तव या मांजात अडकल्यानंतर अनेक पक्षी आणि माणसांचा मृत्यू झालेला आहे. या मांजामध्ये नायलॉन, मेटॉलिक पावडर, ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि लेडचा समावेश असतो. यानंतर या मांजावर काच किंवा लोखंडेच्या चुऱ्याने धार केली जाते. ज्यामुळेच हा मांजा अधिकच घातक होतो. हा मांजा प्लास्टिक प्रमाणे दिसतो आणि ताणलाही जातो. मात्र,  हा मांजा खेचला तर तुटण्याऐवजी अधिकच मोठा होतो. हा मांजा वापरून पतंग उडवताना त्यात एक कंपन तयार होते. त्यामुळे दुचाकीस्वरांनी रस्त्यावरून जाताना हेल्मेट वापरावे. गळ्याभोवती मफलर गुंडाळावी. तसेच नायलॉन मांजा लहान मुलांपासून दूर ठेवावा. बऱ्याच वेळेस मांजामुळेच गळा कापला जातो. त्यामुळे मान सुरक्षित राहील याकडे रस्त्याने जाताना लक्ष देणे गरजेचे आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या