Ticker

10/recent/ticker-posts

फसव्या लिंकवरील एक क्लिक करू शकते तुमचे बँक खाते रिकामे

एपीके फाईलमुळे मोबाईल होईल हॅक

-दादासाहेब येंधे

सध्या नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक केल्यामुळे बँक खात्यातील पैसे गायब झाल्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. तसेच सध्या व्हाट्सअप वर प्रामुख्याने पीएम किसान लिस्ट एपीके फाईल, बँक केवायसी अपडेट एपीके फाईल, आधार कार्ड अपडेट एपीके फाईल अश्या विविध लिंक चा मेसेज प्रसारीत होत आहेत. ज्या मोबाईल धारकाचे व्हॉट्सअप अकाउंट हॅक झाले आहे त्या मोबाईल धारकाच्या नंबर वरून ते मेसेज व्हायरल होत आहेत. तो नंबरच्या ज्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट आहे त्या ग्रुपमध्ये तो मेसेज, लिंक जात आहे. आपल्या ओळखीच्याच माणसाने लिंक पाठवली म्हणून त्या एपीके फाईलवर जर कोणी क्लिक करून ती लिंक उघडली व त्यावर असलेली माहिती भरली तर व्हाट्सअप व मोबाईल देखीलहॅक केला जात आहे. हा सर्व प्रकार हॅकर कडून केला जात असून ती एपीके फाईल डाऊनलोड करणाऱ्याच्या मोबाईल मधील बँकिंग ॲप, ऑनलाईन पेमेंट ॲप ची माहिती संबंधित हॅकर कडे जाऊन आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी अशा फसव्या लिंकवर क्लिक करणे टाळा. कोणतीही एपीके फाईल मोबाईल मध्ये डाउनलोड करू नका, ज्यामुळे तुमच्या मोबाईलचा संपूर्ण ताबा हॅकरकडे जाईल. सोबतच ओटीपी शेअर करू नये. व्हाट्सअपवर येणारे क्यू आर कोड स्कॅन करू नयेत. अलीकडे ऑनलाईन फसवणुकीचे विविध प्रकार वाढले आहेत. मुंबई पोलिसांकडून जनजागृती, मार्गदर्शन शिबिरे देखील राबविली जात आहेत.

फसव्या लिंक, ॲप डाऊनलोड केले असता आपल्या मोबाईल मधील संपूर्ण माहिती कॉपी होऊन ती हॅकर कडे जाते. त्याचा दुरुपयोग ते करू शकतात. एकूणच आपले एक चुकीचा क्लिक मोठे आर्थिक नुकसान करू शकते.  त्यामुळे आजच्या या इंटरनेट, ऑनलाईन जगामध्ये प्रत्येक मोबाईल धारकाने सावध राहणे गरजेचे आहे.

सध्या बँक खाते, मोबाईल नंबर, आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल आयडी या गोष्टी एकमेकांना जोडलेल्या आहेत. या बाबी एकमेकांशी संलग्न असल्यामुळे नेमकी काय प्रक्रिया घडत आहे याबाबत अनेक जण अशिक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन प्रक्रियेतून आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही जर सायबर फसवणुकीला बळी पडला असाल तर सायबर पोलीस हेल्पलाईन १९३० या क्रमांकावर ताबडतोब संपर्क साधून पोलिसांची मदत घेऊ शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या