जे भक्त गणेशाची उपासना करतात, त्यांच्या कार्यात कधीही विघ्न येत नाही, असे स्कंद पुराणात म्हटले आहे. विघ्नांचा नाश करणाऱ्या गणेशाला वंदन करताना वेदांमध्ये नमो गणेभ्यो गणपतिभ्वयश्रवो नमो नमः असे म्हटले आहे. गण आणि गणांचा स्वामी श्रीगणेशाला वंदन, असा याचा अर्थ आहे.
-दादासाहेब येंधे
भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून आपण दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतो. गणेशाचा उत्सव साजरा करण्यामागे गणेशाचे गुण श्रद्धेने आणि शुद्ध भावना ठेवून आत्मसात करणे, हेच कारण आहे. 'वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा अशा शब्दांत धर्मशास्त्रात गणेशाचे वर्णन केले आहे. याचा अर्थ, ज्याची सोंड वक्र आहे, ज्याचे शरीर महाकाय आहे, जो कोटी कोटी सूर्याइतकातेजस्वी आहे, अशा सर्वकाही प्रदान करण्यास सक्षम असणाऱ्या गणेशाने माझ्या सर्व विघ्नांचा नाश करावा. गणेशाचे पूजन म्हणजेच गणेशाचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न होय. मातापित्याच्या आज्ञा शिरसावंद्य मानणे, प्रामाणिकपणे सत्कार्य करीत राहणे, उपलब्ध वस्तूंचा सावधगिरीने वापर करणे, हे गणेशाचे गुण आत्मसात केल्यास नोकरीव्यवसायात व्यक्ती यशस्वी होते. तसेच क्षेम म्हणजे मिळालेल्या लाभाचे रक्षण करण्याची शक्तीही गणेशाच्या उपासनेमुळे लाभते, असे शास्त्रांत म्हटले आहे. गणेशाचे गुण आत्मसात करणाऱ्या व्यक्तीची बुद्धी शुद्ध राहते आणि त्यामुळेच ज्ञान, सुख, धन, वैभव, ऐश्वर्य यांची प्राप्ती होते. कार्यारंभी गणेशाचे पूजन करण्यामागेही सद्भावना आणि श्रद्धा याच गोष्टी महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. कोणतेही काम श्रद्धेने केल्यास ते तडीस जाते, अशी भावना त्यामागे आहे. श्री रामचरितमानसात पार्वतीला श्रद्धेचे आणि महादेवाला विश्वासाचे रूप मानले गेले आहे. हे दोघे गणेशाचे माता-पिता आहेत. अर्थात, श्रद्धा आणि विश्वास यांचा संगम म्हणजे श्री गणेश होय. कोणतेही कार्य करताना शुद्ध भाव आणि प्रामाणिकपणा मनात सातत्याने असावा, यासाठीच गणेशाचे स्मरण करून कार्यारंभ केला जातो. प्रत्येक मंत्राची सुरुवात ओमकाराने होते, तद्वत प्रत्येक कार्याचा आरंभ श्री गणेशाच्या स्मरणाने होतो.

जे भक्त गणेशाची उपासना करतात, त्यांच्या कार्यात कधीही विघ्न येत नाही, असे स्कंद पुराणात म्हटले आहे. विघ्नांचा नाश करणाऱ्या गणेशाला वंदन करताना वेदांमध्ये नमोगणेभ्योगणपतिभ्वयश्रवो नमो नमः असे म्हटले आहे. गण आणि गणांचा स्वामी श्रीगणेशाला वंदन, असा याचा अर्थ आहे. हिंदू धर्मशास्त्रात गणेशाच्या विविध रूपांचे वर्णन आढळते. परंतु ही सर्व रूपे विघ्नविनाशक असल्याचे सर्वांनीच म्हटले आहे. वराह पुराणात आणि लिंग पुराणात म्हटले आहे की, एकदा अस्री शक्तींमुळे त्रस्त झालेल्या ऋषिमुनींनी भगवान शंकराकडे मदतीची याचना केली. भगवान आशुतोषाने विनायक रूपातील गणेशाला प्रकट केले तसेच आपले शरीर कंपित करून अनेक गणांची सृष्टी निर्मिली आणि त्यांचा अधिपती म्हणून श्रीगणेशाची नियुक्ती केली.
श्री गणेशाचे रूप पाहून आपण त्यातून कोणता बोध घ्यावा, हेही सांगितले गेले आहे. श्री गणेशाचे शिर हत्तीचे आहे. घरातील कर्त्या व्यक्तीने हत्ती प्रमाणे गंभीर आणि दूरदर्शी असणे अपेक्षित आहे. हत्तीप्रमाणेच कोणतीही कृती खूप विचारपूर्वक करणे अपेक्षित आहे. जबाबदार व्यक्तीने हत्तीसारखेच शांत आणि संयमी राहायला हवे. अर्थात, क्रोधावर नियंत्रण मिळवायला हवे. धैर्य असल्याखेरीज कोणतेही कार्य तडीस जाऊ शकत नाही. धैर्य आणि संयमाची शिकवण मंगलमूर्ती आपल्याला देतो. उंदीर हे गणेशाचे वाहन आहे. उंदीर बिळात राहतो आणि विशिष्ट हेतूनेच बाहेर पडतो. त्याप्रमाणे आपल्या योजना गुप्त ठेवून कार्यसिद्धी झाल्यावरच त्या प्रकट कराव्या, अशी शिकवण मूषकाच्या माध्यमातून आपल्याला मिळते. अशा प्रकारे कार्यरत राहिल्यास कुटुंबाची प्रगती होते. गण या शब्दाचा अर्थ राज्य असाही होतो. गणेश हा सर्व गणांचा स्वामी आहे. गणेशाने जन्मानंतर सर्व गणांना एकत्र केले आणि त्यांचे यशस्वीरीत्या नेतृत्व केले. अनेक दानवांचा अंत केला. सर्वांना सोबत घेऊन कार्यरत राहणे हेच गणेशाचे लक्ष्य होते. कार्तिकस्वामी हा सेनापती होता, तर गणेश बुद्धिमत्ता आणि युक्तीच्या आधारे देवशक्तींना संघटित करण्याचे कार्य करीत असे. बुद्धिचातुर्य आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे जे कार्य गणेशाने केले, ते अद्वितीय असून, गणेशापासून हे गुण आपण घेतले पाहिजेत.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.