Ticker

10/recent/ticker-posts

बनावट ट्रॅफिक चलनाद्वारे नागरिकांची फसवणूक

बँक खाते रिकामं करणारा नवा सायबर ट्रॅप


सध्या वाहतूक शाखेकडूनच वाहतूक नियमभंगाच्या दंडाचे चलन असल्याची भासवणारी एपीके फाईल सायबर चोरांकडून पाठवली जात आहे. मोबाईल धारकांनी हा मेसेज पाहण्यासाठी त्यावर क्लिक केले असता तुमचा मोबाईल हॅक होतो. तुमच्या मोबाईल मधील डाटा सायबर चोरटे वापरून बँक खात्यातील पैसे काढून घेतात....

-दादासाहेब येंधे

अलीकडच्या काळात डिजिटल फसवणुक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या आयडिया काढून नागरिकांना लाखो रुपयांना फसवत आहेत. उच्च शिक्षित लोकही त्यांच्या फसवणूकला सहज बळी पडताना दिसून येत आहेत.


रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक पोलिसांकडून दंड आकारणी केली जाते. या वाहतूक नियमभंगाची पावती रजिस्टर असलेल्या मोबाईलवर मेसेजद्वारे जाते. पण, सध्या वाहतूक शाखेकडूनच वाहतूक नियमभंगाच्या दंडाचे चलन असल्याची भासवणारी एपीके फाईल सायबर चोरांकडून पाठवली जात आहे. मोबाईल धारकांनी हा मेसेज पाहण्यासाठी त्यावर क्लिक केले असता तुमचा मोबाईल हॅक होतो. तुमच्या मोबाईल मधील डाटा सायबर चोरटे वापरून बँक खात्यातील पैसे काढून घेऊन तुमची फसवणूक करत आहेत.


नुकतीच पुणे येथील जांभुळवाडी येथे राहणाऱ्या एका ३३ वर्षाच्या महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिला तिच्या मोबाईलवर व्हाट्सअपद्वारे 'आरटीओ ट्राफिक चलन ५०० एपीके' अश्या नावाची फाईल पाठवण्यात आली होती. आपल्याकडून वाहतूक नियमभंग झाल्याचे तिला वाटले असता तिने त्या फाईलवर क्लिक करताच तिचे व्हाट्सअप अनइन्स्टॉल झाले व ताबडतोब सायबर चोरट्यांनी तिच्या मोबाईलचा ताबा घेऊन तिच्या खात्यातून सात लाख रुपये काढून घेतले.


बेंगळुरू मधील हरिकृष्ण नावाच्या व्यक्तीला व्हाट्सअपवर एक ट्रॅफिक चलन मेसेज आला. त्या मेसेजमध्ये एक फेक लिंक होती. जी अधिकृत सरकारी पोर्टल सारखी दिसत होती. जेव्हा त्याने त्या लिंक वर क्लिक करून ॲप डाऊनलोड केले, तेव्हा काही वेळाने त्यांना त्यांच्या बँक खात्यातून ७० हजार रुपयांचे व्यवहार झाल्याचा मेसेज आला. गंभीर गोष्ट म्हणजे त्यांना कुठलाही ओटीपी टाकावा लागला नाही. फक्त ॲप डाऊनलोड करून त्याने दिलेल्या परवानग्या दिल्या आणि त्यांच्या खात्यातील पैसे गायब झाले. फसवणूक करणाऱ्यांनी त्यांच्या पत्नीच्या खात्यातही घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. पण, वेळेत सावध झाल्यामुळे ते रोखले गेले.


जर तुम्हालाही वाहतूक नियम मोडल्याबद्दल ऑनलाईन ट्रॅफिक चलन मिळाल्याचा मेसेज आला असेल तर लगेचच घाई गडबडीने पैसे भरू नका. सध्या सायबर गुन्हेगार नवंनवीन पद्धतीने लोकांना फसवत आहेत. ज्यामुळे नागरिकांचे बँक खाते काही सेकंदातच रिकामे होत आहे. सायबर गुन्हेगार तुमच्या whatsapp व्हाट्सअप्प नंबर वर एक मेसेज पाठवतात. ज्यामध्ये लिहिलेले असते की, तुमच्या गाडीने वाहतूक नियम मोडला आहे. त्यामुळे तुम्हाला चलन भरावे लागेल. या मेसेज बरोबर एक फसवी लिंक दिलेली असते. जेव्हा तुम्ही त्या लिंकवर क्लिक करता तेव्हा तुमच्या फोनमध्ये धोकादायक ॲप डाऊनलोड होते. एकदा का हे इन्स्टॉल झाले की, हॅकर्सला तुमच्या फोनचा पूर्ण एक्सेस मिळतो. तुमच्या बँक खात्याची माहिती ओटीपी आणि पासवर्ड ते सहजपणे मिळवतात. यानंतर काही मिनिटांत तुमच्या खात्यातील रक्कम काढून घेतली जाते.


सध्या सायबर गुन्हेगार अत्यंत हुशारीने नागरिकांना फसवण्याच्या आयडिया काढत आहेत. म्हणूनच कुठलाही संशयास्पद मेसेज आला तर त्यावर लगेचच विश्वास ठेवू नका. सरकार आणि ट्रॅफिक पोलीस कधीही व्हाट्सअपद्वारे ट्रॅफिक चलन भरण्यासाठी लिंक पाठवत नाहीत. त्यामुळे अधिकृत वेबसाईटशिवाय कुठेही चलन भरू नका.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या