मकर संक्रात हा सूर्य देवाला समर्पित, शेतीशी निगडीत पौष महिन्यात साजरा होणारा सण आहे. मकर संक्रांतीचा सण म्हणजे समृद्धी, धनधान्याचा उत्सव. यावेळी शेतातील धान्य कापणी होऊन घरात आलेले असते. सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते. दिवस मोठा होतो तर रात्र छोटी छोटी होते. थंडीच्या चाहुलीत आनंदाची उधळण करणारा हा सण विविध राज्यात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. तसाच विविध पद्धतीने देखील साजरा केला जातो.
-दादासाहेब येंधे
मकरसंक्रांत - तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... असा संदेश देत महाराष्ट्रात मकर संक्रातीचा आनंद लुटला जातो. तिळाचे लाडू, तिळगुळ देऊन एकमेकांमधील हेवेदावे विसरायचा सण म्हणजे मकर संक्रात. या दिवशी स्त्रिया हळदीकुंकवाचा कार्यक्रम करतात. महाराष्ट्रात मकर संक्राती रथसप्तमी पर्यंत साजरी केली जाते.
उत्तरायण - या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या दिवसाला उत्तरायण असेही म्हटले जाते. गुजरातमध्ये हा सण उत्तरायण या नावाने ओळखला जातो. या सणाला तिथे उंदियो हा खास पदार्थ बनविला जातो. विविध भाज्यांचे मिश्रण असलेला हा पदार्थ या राज्यातील खाद्य संस्कृतीची विशेष खासियत आहे. या दिवशी सर्व गुजराती बांधव पतंग उडवतात. येथील पतंगांच्या स्पर्धांमध्ये 'कायपो छे', 'ए लपेट', 'फिरकी वेट फिरकी' हे शब्द प्रचलित आहेत.
भोगी- आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात मकर संक्रातीचा सण हा भोगी या नावाने ओळखला जातो. या भागात मकर संक्रांती चार दिवस साजरी केली जाते. प्रत्येक दिवशी रूढी आणि परंपरांसह तामिळ बांधव भोगीचा हा उत्साहात साजरा करतात. भोगीच्या दिवशी इथे घरातील जुन्या वस्तूंची होळी केली जाते. जुन्याचा त्याग करून नव्याचा स्वीकार करणे असा संदेश या परंपरेतून दिला गेला आहे. भोगीच्या दुसऱ्या दिवशी नवीन कपडे परिधान करून पितरांना नैवेद्य दाखवले जातात. यावेळी शेण सारवूण त्यावर खडूंनी रांगोळी काढली जाते. या रांगोळीला मुग्गू असे म्हणतात. तिसऱ्या दिवस हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असून या दिवशी शेतकरी त्यांच्याकडे बैलांची गायींची पूजा करतात. चौथ्या दिवशी सर्व कुटुंब एकत्र येऊन पतंग उडवण्याचा आनंद घेतात. या दिवसांमध्ये घराघरांमध्ये गोड पदार्थ बनवले जातात.
बिहू- संक्रांतीचा सण आसाममध्ये बिहू या नावाने ओळखला जातो. याला भोगली, बिहू असेही म्हटले जाते. आसाममध्ये हा सण सात दिवस साजरा केला जातो. माग महिन्यात कापणी होऊन घरात आलेल्या धान्याची पूजा केली जाते. मेजवान्यांचे आयोजन केले जाते. आसाममध्ये बांबू, सुकलेलले गवत, पाने यांच्यापासून झोपड्या बनवल्या जातात. या झोपड्यांना मेज्जी असे म्हणतात. गावातील तरुण या झोपड्यांमध्ये मेजवानीचा आनंद लुटतात. दुसऱ्या दिवशी सकाळी या झोपड्या जाळून टाकल्या जातात. तसेच या सणादरम्यान येथे रेड्यांची झुंज लावली जाते. मडकी फोडण्याचे खेळ खेळले जातात व खास असे आसामी नृत्य देखील केले जाते.
खिचडी- बिहार आणि झारखंडमध्ये मकर संक्रातीच्या या सणाला खिचडी असे संबोधले जाते. या निमित्ताने येथे डाळ भात, फ्लावर, वाटाणा, बटाटा एकत्र करून खिचडी तयार केली जाते. याशिवाय गुळ, तीळ, दूध, ताक आणि भाज्यांपासून विविध पक्वान्ने आणि मिठाई बनवली जाते.
सुग्गी - कर्नाटक मध्ये हा सण सुग्गी म्हणून साजरा केला जातो. यावेळी घरातील सर्वजण नवीन कपडे परिधान करतात. ताटामध्ये भाजलेले शेंगदाणे, गुळ खोबऱ्याचे काप, तीळ यांचे मिश्रण शेजाऱ्यांना तसेच नातेवाईकांना वाटतात. या सणाच्या दिवशी इथे साखरेच्या विविध आकारांमध्ये मिठाई बनवून ती उसाच्या तुकड्या सोबत देण्याची पद्धत आहे.
माघी किंवा लोहरी- पंजाब मध्ये मकर संक्रातीला माघी असे म्हटले जाते. लोहरीच्या संध्याकाळी येथे शेकोटी पेटवून त्याभोवती नृत्य केले जाते याला लोहरी असे म्हणतात. यावेळी उसाच्या रसासोबत खिचडी, खीर, गूळ खाल्ले जाते. शेकोटी भोवती केल्या जाणाऱ्या पंजाबी नृत्य प्रकाराला भांगडा असे म्हटले जाते.




0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.