Ticker

10/recent/ticker-posts

गुढीपाडवा सण म्हणजे मराठी नूतनवर्ष

हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी गुढीपाडवा सण देखील एक शुभ मुहूर्त आहे. 

-दादासाहेब येंधे


गुढीपाडवा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वपूर्ण उत्सव आहे. गुढीपाडवा सण म्हणजे मराठी नूतनवर्ष. या दिवशी घरासमोर गुढी उभारुन तिची पूजा करुन नैवेद्य अर्पण केला जातो. याच दिवसापासून वसंत ऋतूचीही सुरुवात होते. मराठी नवीन वर्षाचे स्वागत महाराष्ट्रासह अन्य काही प्रदेशांमध्येही मोठ्या थाटामाटात केले जाते.


हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी गुढीपाडवा सण देखील एक शुभ मुहूर्त आहे. या दिवशी नवीन कार्यांची सुरुवात करणे शुभ मानले जाते. तसेच प्रभू श्रीराम चौदा वर्षे वनवास करुन माता सीतासह आपल्या नगरीमध्ये परतले होते, तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता, म्हणूनच या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो. दुसरीकडे ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेस सृष्टी निर्माण केली होती, या कारणामुळे हा दिवस संवत्सराचा पहिला दिवस ठरला. अशा अनेक कारणांमुळे गुढीपाडवा सण साजरा करण्याची परंपरा आजही जपली जातेय.

भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस 'महापर्व' म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण 'गुढीपाडवा' म्हणून साजरा करतो. गुढीपाडव्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा दिल्या जातात. या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. ही गुढी का उभारली जाते? गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात? गुढी उभारण्यापूर्वी ब्रम्हदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णू देवाची पूजा करतात.


शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. शक सुरु करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरु होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी पंचाग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे.


गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते. यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा आहे.

ब्रम्हदेवाने केली विश्वनिर्मिती - ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रम्हदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे "सत्य-युगाची" सुरुवात झाली आणि म्हणुनच नुतन वर्षारंभ म्हणुन चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात. या दिवशी विश्वातिल तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जीत होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधीक संचित करायचा प्रयत्न करतो.


​मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म- भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला, त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र-शुद्ध प्रतिपदेचाच. शंखासुर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. मग देवदेवता, ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याकरिता सांगितले. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा ठावठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासुर म्हणाला की, भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले. आपण माझा वध अवश्य करावा; परंतु माझी एक इच्छा अशी की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणांस स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा.’’ भगवान विष्णूंनी ‘तथास्तु’ म्हटले आणि शंखासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूने हातात शंखास धारण केले.

गुढी विजयध्वजाचे प्रतिक​- गुढी म्हणजे फक्त ब्रम्हध्वजच नाहि तर तो विजयध्वज देखिल आहे. जेव्हा "श्री राम" लंकेवर विजय मिळवुन अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारुन मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुध्द प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते.


तसेच, असे ही सांगितले जाते की, चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले; तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे.


गुढी कशी उभारावी?
गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जाते.  बांबूच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे किंवा पितळेच्या धातूचे कलश पालथे घालावे. त्यावर कडुलिंबाची डहाळी, फुलांची माळ आणि साखरेची माळ बांधावी. सजवलेली गुढी दारासमोर उभारावी आणि गुढीची पूजा करावी. कलश आणि पताकायुक्त गुढी हे आनंदोत्सवाचे प्रतीक मानले जाते. घरासमोर सुंदर रांगोळी काढून दिवा लावला जातो. गुढीची मनोभावे पूजा केली आणि पारंपरिक पदार्थांचा नैवेद्यही अर्पण केला जातो.

गुढीपाडवा सणाला कोणते गोड पदार्थ तयार करावे?

पुरणपोळी  - गुढीपाडव्याला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. पुरणपोळी हा महाराष्ट्रातील मुख्य पारंपरिक गोड पदार्थांपैकी एक आहे. विशेषतः सणांच्या दिवशी घराघरात पुरणपोळी हमखास तयार केली जाते. गूळ आणि चण्याच्या डाळीपासून पुरण तर मैदा-रव्याच्या मिश्रणाने पोळीचे पीठ तयार केले जाते. साजूक तुपासह पुरणपोळीचा आस्वाद घेतला जातो.


श्रीखंड- पुरी - गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड-पुरीचाही नैवेद्य अर्पण केला जातो. दह्याचे पाणी गाळून चक्का तयार केला जातो. त्यानंतर चक्क्यामध्ये साखर, वेलची पूड, केशर मिक्स केले जाते. मिश्रण योग्य पद्धतीने फेटून घेतले जाते व श्रीखंड बनवले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या