लिव्ह इन रिलेशनशिप एक काटेरी मुकुट! - माझी समृद्धी https://mazisamruddhi.blogspot.com

नवीन लेख

मंगळवार, १३ डिसेंबर, २०२२

लिव्ह इन रिलेशनशिप एक काटेरी मुकुट!

डेटिंग ॲप म्हणा किंवा इतर सोशल मीडियावर भेटलेल्या व्यक्तींशी मैत्री करताना किती सावधानता बाळगावी याचे भान प्रत्येक मुलींनी, महिलांनी ठेवणे गरजेचे आहे....


-दादासाहेब येंधे


एकेक घटना ऐकून जीवाचा थरकाप व्हावा, मन भीतीने व्यापून जावं अशा घटना रोजच्या रोज ऐकायला, वाचायला मिळत आहेत. विशेष करून स्त्रियांच्या शोषणाच्या त्यांच्या हत्या आणि विकृतीच्या. देशभर गाजत असलेला आफताब आणि श्रद्धाची केस ऐकत असतानाच अशा अजून दोन-तीन केसेस समोर आल्या. एकात लिव्ह इन जोडीदार पुरुषाने जोडीदार स्त्रीचा गळा चिरला... त्याचा ऑनलाईन व्हिडिओ व्हायरल केला आणि प्रतारणा केली, तर अशीच शिक्षा मिळेल असेही छाती ठोकपणे सांगितलं. तर दुसऱ्या केसमध्ये आधीच्या प्रियसीने दुसऱ्या कुणाशी तरी लग्न केल्यामुळे घरच्या माणसांना हाताशी धरून तिचा खून करून देहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. तर अजून एक धक्कादायक प्रकार म्हणजे मुलगी न सांगता घराबाहेर गेल्याच्या वडिलांना इतका राग आला की, त्यांनी मुलीला गोळी झाडून ठार मारून टाकलं आणि तिचा मृतदेह बॅगेत भरून ती बॅग फेकून दिली. एकूणच माणुसकी हरवत चालल्याचीच ही लक्षणे म्हणावी लागतील.

  


सध्या देशात अफताब आणि श्रद्धाची प्रेम कहानी व शेवट याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या घटनेत एका पुरुषाने लिव्ह इन नात्यातील जोडीदाराने लग्नाचा आग्रह केल्यामुळे तिचा खून केला आणि तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले आणि त्यांची एक एक करून विल्हेवाट लावली. या घटनेत पुरुष क्रूरकर्मा आहे. जी मुलगी सारे काही सोडून, घराचा समाजाचा विरोध पत्करून त्याच्यासोबत पळून आली. त्याच्यासोबत राहत होती. तिचा त्याने अतिशय शांतपणे, क्रूरपणे खून केला आणि त्यानंतरचे त्याचे वर्तन तर महाभयंकर होते. 


आपल्याकडे उघडपणे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचे प्रमाण कमी आहे. कारण बदलत्या काळात शहरी भागामध्ये ही प्रथा प्रचलित होत असली तरी तिला समाज मान्यता मिळालेली नाही. लिव्ह इन रिलेशनशिप हा जबाबदारी आणि वचनबद्धता टाळण्याचा मार्ग आहे. शिवाय, त्यामुळे नात्यात बेजबाबदारपणा येऊ शकतो असे सांगितले जाते. लिव्ह इन रिलेशन मधील महिलांच्या घरगुती हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. वास्तवात असे संरक्षण व याहून अधिक हक्क विवाहित स्त्रियांना कायद्याने बहाल केलेले असले तरी त्यायोग्य विवाहित स्त्रिया हिंसामुक्त मुक्त झाल्या का याचे उत्तर नकारार्थीच येते. स्त्रीच्या वाट्याला कोणतीही नाते आले तरी हिंसा चुकलेली नाही. हे वास्तव नाकारून चालणारे नाही.


ज्या डेटिंग ॲप वरून श्रद्धाची ओळख आफताफबरोबर झाली त्या ॲपवर अनेक तरुण तरुणी स्वतःचे फेक पोर्टल बनवून एकमेकांना डेटिंग करत असतात. मग हे ठाऊक असूनही श्रद्धाने आफताफबरोबर थेट लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय कसा काय घेतला असावा याचे उत्तर शोधावे लागेल. केवळ बाह्य सौंदर्य, आकर्षण, गोड बोलणं याला भुलून श्रद्धासारख्या आज अनेक तरुणी अशा संबंधात फसत चालल्या आहेत. अय्याश असलेल्या आफताबने आतापर्यंत अशा डेटिंग यावरून आणखीही बऱ्याच मुलींबरोबर संबंध ठेवले होते. त्याआधीही त्यांनी अनेक मुलींबरोबर संबंध ठेवले असल्याची माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. यावरून डेटिंग ॲप म्हणा किंवा इतर सोशल मीडियावर भेटलेल्या व्यक्तींशी मैत्री करताना किती सावधानता बाळगावी याचे भान प्रत्येक मुलींनी, महिलांनी ठेवणे गरजेचे आहे. 


सध्या देशभरात गाजत असलेले हे प्रकरण आता श्रद्धा आफताब पुरते मर्यादित राहिलेले नसून लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या किंवा राहू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हे महत्त्वाचे आहे. कारण या प्रकरणाने अशा तात्पुरत्या नातेसंबंधांवरील विश्वासार्हेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आजच्या पिढीला जरी लिव्ह इन हे सगळ्यात सेफ आणि सोपं वाटत असलं तरी त्यातील अनेक खाचखळगे न भरता येण्यासारखे आहेत. नातेसंबंध हे धर्माने घातलेल्या बंधनातून आलेले असो किंवा मनाने त्यात भावनिक आणि शारीरिक गुंतवणूक ही आलीच. भारतासारख्या सांस्कृतिक पारंपरिक देशात लिव्ह इन मध्ये राहणे हे एक आव्हानच म्हणावे लागेल. कारण आपल्याकडे ते स्वीकार्य नाही. केवळ प्रेमाच्या धुंदीत असे नातेसंबंध ठेवू नये. कारण तुम्ही ज्या जोडीदाराची निवड करता त्याची तुम्हाला असलेली ओळख ही फक्त आभासी असू शकते.
श्रद्धाच्या हत्येचा देशभरातूनच नव्हे तर जगभरातून निषेध होत आहे. अलीकडच्या काळात कोणतेही शहर महिलांसाठी सुरक्षित राहिलेले नाही. दिल्लीत निर्भयावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने देश पेटून उठला होता. जनभावनेची कदर करून दुष्कर्म करणाऱ्या नराधमांना जन्मठेपेऐवजी फाशीची शिक्षा देण्याची तरतूद देशाच्या सर्वोच्च संसदेला करावी लागली. अल्पवयीनांची व्याख्या बदलून त्यांनाही कायद्याच्या कक्षेत आणले गेले. तरीही कायद्याची भीती अशा प्रवृत्तीच्या लोकांना अजूनही बसलेली दिसत नाही. हैदराबादमध्ये एका शिक्षिकेवर अत्याचार करून तिची जाळून हत्या करणाऱ्या राक्षस प्रवृत्तीच्या चौघजणांना ज्या पद्धतीने गोळ्या घालून ठार केले तशीच शिक्षा अफताबला दिली पाहिजे असे सूर जनसामान्यात आता उमटू लागले आहेत. 


लव्ह जिहादच्या नावाखाली तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून धर्मांतर करण्यासाठी भाग पाडणाऱ्या समाजकंटकांना अटकाव करण्याची आवश्यकता आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक व अन्य राज्यांमध्ये धर्मांतराला बंदी करणारा कायदा अस्तित्वात आला आहेत. धर्मांतर ही एक राष्ट्रीय समस्या बनली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात केंद्र सरकारला हस्तक्षेप करून देशव्यापी कायदा करण्याची सूचना देखील केली आहे. लव्ह जिहाद हा धर्मांतराचा भाग असून तो वेळीच रोखला पाहिजे. महिलांवरील अत्याचाराकडे अत्यंत संवेदनशील आणि तितक्याच गांभीर्याने पाहण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे. महिलांनीदेखील आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे बारीक नजरेने पाहून त्याची कल्पना पोलीस यंत्रणेस दिली तर अशा घटना नक्कीच टाळता येतील. एकूणच लिव्ह इन रिलेशनशिपच्या जमान्यात श्रद्धा हरवत चालली आहे. हा एक काटेरी मुकुट आहे. मुलींनी नक्कीच यातून धडा घेतला पाहिजे आणि आफताबासारख्या मनोवृत्ती आपल्या आयुष्यात येऊच नये याची दक्षता, सावधानता बाळगली पाहिजे. सध्याच्या तरुणाईला एकच सांगावेसे वाटते प्रेम करून विवाह करण्यापेक्षा विवाह करून प्रेम करा. भारतीय विवाहसंस्थेत मोठी ताकद आहे. जी आपल्याला आयुष्यभर पुरेल. 

Photo:google

३ टिप्पण्या:

  1. खूप छान माहिती. आजच्या तरुण पिढीने हे वास्तव स्वीकारून. बाहेरच्या जगात सहजपणे दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा अवलंब करताना या सर्व गोष्टींचा जरूर विचार केला पाहिजे नाहीतर अशा घटना पुन्हा पुन्हा घडू शकतात.

    उत्तर द्याहटवा
  2. Very informative article. Good.

    उत्तर द्याहटवा

Please do not enter any spam link in the comment box.

पेज