प्रखर हिंदुत्ववादी व मराठी जनासाठी आपले देहभान विसरून जगणारा असा नेता पुन्हा होणे नाही
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो... अशी परवलीची साद घालून शिवतीर्थावरून (शिवाजी पार्क) अवघा हिंदू जनसागर उसळवणारा हिंदूंचा सम्राट बाळ केशव ठाकरे नावाचा जागतिक दर्जाचा व्यंगचित्रकार अखेर शनिवार, दि. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी आपल्या ८६ वर्षांचा जीवनप्रवास संपवून, संपूर्ण महाराष्ट्राला शोकसागरात बुडवून निघून गेला आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला.
२३ जानेवारी १९२७ रोजी जन्म झालेल्या बाळासाहेब ठाकर यांनी वगाच्या अवघ्या ४० व्या वर्षी १९ जून १९६६ रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली व 'मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढा' अशी आसमंत दुमदुमून टाकणारी डरकाळी फोडत शिवसेनेचा हा ढाण्या वाघ मोठ्या दिमाखात राज्यभरातल्या रस्त्यावरून भगवा फडकावित फिरू लागला. तेव्हा राज्यकर्त्यांचे धाबे दणाणले. केवळ १३ नेत्यांच्या जीवावर १९९५ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची सत्ता काबीज करून भगवा फडकावित काँग्रेसला चारीमुंड्या चीत तर केले, पण मुंबई- ठाण्यासारख्या महानगरपालिकेच्या सत्तेपासूनही काँग्रेसप्रणीत आघाडीला चार हात दूर ठेवल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढा लढत असताना व त्याचे महत्व समजायलाही त्यावेळी अनेक प्रसंग घडले होते. प्रथम शिवसेनाप्रमुखांनी अन्य दैनिक, साप्ताहिक, मासिक यातून प्रसिद्ध होणारी फटकारे देणारी व्यंगचित्रे मराठी माणूस पाहत होता. त्यावर गंभीर विचार करीत होताच. पण, 'मार्मिक' या सेनाप्रमुख व त्यांचे बंधू श्रीकांतजी ठाकरे यांच्या साप्ताहिकातून तेव्हा मराठी माणसाला हे फटकारे भोवले. ज्यामुळे मराठी माणूस विशेषत: सुशिक्षित वर्ग चवताळून उठला तो शिवसेनाप्रमुखांनी 'मार्मिक' साप्ताहिकातून 'वाचा आणि थंड बसा' हे सुरू केलेले सदर वाचूनच असे म्हटले जाते. या सदरातून शिवसेनाप्रमुख मराठी माणसांच्या दुःख, अन्याय, अत्याचारालाच केवळ वाचा फोडत होते. सरकारी कार्यालये, रेल्वे, बँका येथे विशेष करून खासगी बड्या कंपन्यांत, कारख्यान्यांत मोठया पदावर किती मराठी पोहोचू शकले आणि किती अमराठी पदावर कार्यरत आहेत. याची एक यादीच मार्मिक मध्ये प्रसिद्ध केली जात होती. ती वाचून मराठी तरुण,तरुणी खवळून उठत असत आणि मग शिवसेनेकडे येत होते.
बाळासाहेब हे समाजाची अचूक नाडी ओळखणारे नेते होते. तो माझा आदेश नव्हताच किंवा मी तसे बोललोच नव्हतोच, असा त्यांनी कधी खुलासा केलाच नाही. दगडाला शेंदूर फासून देव बनवतात तसे बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकाला नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री केले. डझनभर महापौर दिले. केंद्रात, राज्यात मंत्रीपदे दिली. आज सत्तेच्या कॅरिडॉरमध्ये व्हीआयपी फिरत असतात, बाळासाहेबांनी शिवसेना काढली नसती तर त्यातले अनेक व्हीआयपी आज दिसले नसते. शेकडो जणांना लाल दिव्यांच्या मोटारी देणारे बाळासाहेब ठाकरे हे आयुष्यभर सत्तेपासून दूर राहिले. ते कधी आमदार, खासदार झाले नाहीत. सत्ता येऊनही मुख्यमंत्रिपदाच्या सिंहासनाला साधा स्पर्शही केला नाही. ४६ वर्षे एका पक्षाचे प्रमुख राहूनही त्यांनी सत्तेचा मोह कधी धरला नाही.
लहानपणापासूनच शिवसेनाप्रमुखांचा अंधश्रद्धेला विरोध होता. अगदी १० वर्षांचे असताना दादर, (भास्करभुवन) येथे राहायला असताना घरासमोरच्या बाजूला केशव भुवनच्या नाक्यावर भात, अगरबत्ती, गुलाल अशा ओवाळून टाकलेल्या वस्तू शिवसेनाप्रमुखांनी थेट लाथ मारून उडवून दिल्या होत्या. हा प्रकार घाबरलेले त्यांचे भाऊ श्रीकांतजी यांनी प्रबोधनकारांच्या कानी सर्व घटना शिवसेनाप्रमुख त्यांच्या घरात शिरण्याआधीच कथन केली होती. पण, प्रबोधनकार रागावले नाहीत तर त्यांनी सेनाप्रमुखांची पाठ थोपटली.
निसर्ग नियमानुसार जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यूही ठरलेलाच असतोच; पण ज्या व्यक्ती कोट्यवधी जनतेच्या जीवनाचा आधार बनलेल्या असतात, ज्यांच्या सावलीत संपूर्ण समाज सरक्षित असतो, अशा देव माणसाच्या जाण्याने समाजात जी पोकळी निर्माण होते, ती कधीच भरून निघत नाही. शिसेनाप्रमुख हे तर महाराष्ट्राचा आधारवड होते. महाराष्ट्रात आज जो मराठी माणूस स्वाभिमानाने जगतोय, मुंबईसारख्या संवेदनशील शहरात मराठी माणूस जो सुरक्षित आहे तो फक्त बाळासाहेबांमुळेच. त्यामुळे बाळासाहेबांच्या जाण्याने महाराष्ट् अक्षरशः पोरका झालाय. असे म्हटल्यास वावगे वाटू नये. महारष्ट्रातील प्रत्येक घराघरांत आपल्या कुटुंबातलाच कुणीतरी गेलाय, अशो भावना व्यक्त होताना दिसत आहेत. बाळासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी अवघा महाराष्ट्र रदिवार, दि. १८ नोव्हेंबर २०१२ ला मुंबईतील दादर येथे जमला होता. त्यांच्या अंत्ययात्रेत जवळजवळ २० ते २२ लाख नागरिक सहभागी झाले होते. ज्यात हिंदू, मुस्लिम, खिश्चन आदी धर्माच्या लोकांसह विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि नेतेही हजर होते. याचाच अर्थ बाळासाहेब सर्वांचे होते. सर्वांना त्यांच्याविषयी आदर होता. त्या शिवसैनिकांवर बाळासाहेबांनी पित्याप्रमाणे प्रेम केले. अशा शिवसैनिकांचे बाळासाहेब तर देवच होते. पण, ज्यांच्यावर टीकेचे आसूड ओढले, त्यांच्याही मनात बाळासाहेबाविषयी आदर अन् प्रेम होते. मित्र अन् शत्रू दोघांच्याही मनात आदराचे स्थान निर्माण करणारा हा देशातील एकमेव नेता असावा. म्हणूनच बाळासाहेबांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. मराठी अस्मिता जपण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचले. त्या बाळासाहेबांची 'मातोश्री' या त्यांच्या बंगल्यावरून निघालेली त्यांची अंत्ययात्रा तब्बल १० तासांनंतर शिवतीर्थावर पोहोचली. भारताच्या इतिहासामध्ये जनतेने अनेक मोठी व्यक्तिमत्वे पाहिली, अनुभवली. विराट मेळावे, सभाही पाहिल्या. परंतु, बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्व त्यांचे निःस्वार्थी कर्तत्व आणि शेवटी १० तास चाललेली अंत्ययात्रा या सगळ्याच गोष्टी एकमेवाद्वितीयच म्हणाव्या लागतील. प्रखर हिंदुत्ववादी व मराठी जनासाठी आपले देहभान विसरून जगणारा असा नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली!
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.