Ticker

10/recent/ticker-posts

दुरितांचे तिमिर जावो!

जर तुमच्यातील माणूसपण जिवंत असेल नातर ज्यांना आयुष्यात ही दिवाळी कधीच बघता येत नाहीअशा अंध व्यक्‍तीकचरा गोळा करणारेहॉटेलमध्ये काम करणारे असे आपले छोटे भाऊ-बहीण आपल्याला पावलोपावली भेटतीलत्यांच्याही जीवनात दिवाळी उजळावी म्हणून फटाक्यांच्या वाचलेल्या पैशातून त्यांच्यासाठी कपडेमिठाई वाटप असे बरेच काही आपण करू शकतो.


दीपोत्सव किंवा दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. असा सण जगात अन्य कुठेही नसेल. दिवाळी सर्वात मोठा सण आहे. म्हणूनच आपल्या सर्व सणांमध्ये 'राणीचा दर्जा' दिवाळीला दिला जातो. दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे रांग. या सणात दिवे रांगेने लावले जातात म्हणून याला 'दीपावली' असे संबोधले जाते. आपण कित्येक वर्षापासून दिवाळी साजरी करीत आहोत. दु:खाचे कितीही डोंगर आपल्यावर कोसळले तरी आपण आपला सण कधीही विसरत नाही. म्हणतात ना, ऋण काढून सण साजरा... तशातला हा प्रकार. एका बाजूला दिवे पेटलेत, रंगांची, फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणावर होत आहे. गगनात आनंद मावेनासा झालाय. पण तो कुणाचा? ज्यांच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे त्यांचा! श्रीमंतांचे घर दिवाळीत दीपज्योतींनी, रोषणाईने न्हाऊन निघालेले असताना दुसरीकडे मात्र गरीबांच्या झोपडीत उजेड करण्यासाठी रॉकेल नाही तर विजेची गोष्टच सोडून द्या. एकीकडे श्रीमंतांच्या घरी पंचपक्वानांची देवाण-घेवाण होत असताना, शुद्ध गायीच्या तुपातील मिठाईची लज्जत चाखत असताना दुसरीकडे रस्त्यावरील गरीबांना खायला शिळे अन्नही मिळत नाही


एवढेच नव्हे तर अनेक क्षेत्रांतील कामगार वर्ग आज बेकारीच्या खाईत लोटला जातोय. चांगल्या कंपन्याही वेगवेगळी कारणे पुढे करून कामगारांना बोनस, इतर सुविधा नाकारत आहेत. महागाई तर आकाशाच्याही पुढे निघून गेलीय. वेळेवर पगार नाही, बोनस नाही, सुट्ट्या मिळत नाही, स्वतःच्या हक्कासाठी युनियनचा आधार घेऊ शकत नाही. युनियन कंपनीत आणली तर उद्यापासून घरचा रस्ता धरायचा असा सज्जड दम कंपनी मालकांकडून कामगारांना दिला जातो. सामान्य माणसाने जगायचे तरी कसे हा प्रश्‍न समाजासमोर वासून उभा आहे. एका बाजूला कामगार वर्ग असा दारिद्र्य भोगत असताना शेतकरीही दु:खातच आपले जीवन कंठीत आहेत. शेतीमध्ये काबाडकष्ट करून पिकविलेला माल सरकारच्या कुचकामी धोरणांमुळे, नियोजन शून्यतेमुळे सडून रस्त्यावर ओतून, फेकून द्यावा लागत आहे, तर काही ठिकाणी तो कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. शेतकऱ्यांनी विकत घेतलेले बी-बियाणे, मालाची ने-आण, खुरपणी, पेरणी, लावणी इत्यादीसाठी वापरलेले मनुष्यबळ यांचा मोबदला द्यायलाही शेतकऱ्यांकडे पैसे येत नाहीत. त्यामुळे त्यांच्यापुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नाहीय


कामगार, शेतकरी, गरीब जनता अशी भरडली जात असताना राजकारणी मात्र कष्टकऱ्यांच्या घामाचा लिलाव करून चैनीत जीवन जगत आहेत. पण काहीही-असो, आपण आपले सण- परंपरा जपल्याच पाहिजेत. दररोज येणाऱ्या संकटाने पिचून जाता संकटांना, दुःखांना हृदयाच्या गाभाऱ्यात गाडून दिवाळी साजरी केली पाहिजे.  पण, प्रदूषणाचे आणि समाजाचे भान ठेवून... कारण फटाक्यांचा दिवाळी हा सण सध्या प्रदूषणाचा उत्सव बनत चालला आहे असे वाटत आहे. अँट्मबॉम्बची तर गोष्टच काढू नका. कारण अशा उच्च आवाजाचे फटाके वाजविल्याने आनंद तर सोडाच, पण मानवाचे नुकसानच मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. जसे सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब, डांबरी माळा यांच्या अति आवाजामुळे रात्री-अपरात्री निद्रानाश होतो. लहान मुले, वृद्ध, गरोदर स्त्रिया यांचा जीव घाबरतो. अनेक पशू-पक्षी सैरावैरा पळताना मृत्युमुखी पडतात. वाहन चालवणारी व्यक्‍ती दचकून अपघात होण्याचीही दाट शक्‍यता असते. फटाक्यांची आतषबाजी कफविकार, सर्दी आणि ऍलर्जीने त्रस्त असणाऱ्यांना जोखमीची ठरते. त्याशिवाय वातावरणात मिसळलेल्या विषारी कणांमुळे डोळे, घसा आणि नाक या अवयवांवरही विपरीत परिणाम  उद्भवतात.


शंभर टक्के निरोगी माणूसही यात अपवाद ठरू शकत नाही. काही वेळा तर या घटनांची बाधा तात्काळ लक्षात येत नाही, ती फार उशीरा जाणवू लागते. पण जेव्हा ती जाणवते तेव्हा ती अत्यंत गंभीर ठरलेली असते. फटाक्यांच्या धुरामुळे झाडांच्या पानांवर परिणाम होऊन ती काळी पडतात. अशा जीवसृष्टीला कानठळ्या बसविणाऱ्या आजारपणालाच निमंत्रण देणाऱ्या आवाजाला, प्रदूषणाला इतरही कित्येक पर्याय आहेत. मात्र, ते  पण स्वत:हून समजून घ्यायला पाहिजेत. फटाके फोडता त्या वाचलेल्या पैशांतून धैर्यचतुरपणा, हुशारी, प्रामाणिकपणा अंगी येण्यासाठी गोष्टींची पुस्तके विकत घेता येतील. विज्ञानाचे खेळ मुलांना शिकविता येतील.  झाडाची लहान-लहान रोपे विकत घेऊन ती वाटता येतील. आणि जर तुमच्यातील माणूसपण जिवंत असेल ना, तर ज्यांना आयुष्यात ही दिवाळी कधीच बघता येत नाही, अशा अंध व्यक्‍ती, कचरा गोळा करणारे, हॉटेलमध्ये काम करणारे असे आपले छोटे भाऊ-बहीण आपल्याला पावलोपावली भेटतील. त्यांच्याही जीवनात दिवाळी उजळावी म्हणून फटाक्यांच्या वाचलेल्या पैशातून त्यांच्यासाठी कपडे, मिठाई वाटप असे बरेच काही आपण करू शकतोपण, यासाठी गरज आहे ती आपली मानसिकता बदलण्याची. यंदाची ही तमोहारी दीपावली वातावरणातील तम दूर करून सर्वत्र प्रकाश, तेज, निर्माण करीत आहे. त्याप्रमाणे ती दुःखी, पीडित शेतकरी, स्त्रिया, नवजात शिशू, अपहृत बालके, रुग्ण यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करून जनतेचे भले करण्याची सुबुद्धी देवो!   

   



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या