सूड, द्वेष, मत्सर किंवा खूनांचे रहस्य उलगडणाऱ्या मालिका हा पालक वर्ग लहान मुलांसमोर बघताना, त्यांच्या मानसिकतेचा विचार कधी करेल?
लवकरच आपल्याला टि.व्ही. पाहणाऱ्यांसाठी टि.व्ही. वरच एक वैधानिक इशारा द्यावा लागणार आहे. हा वैधानिक इशारा सिगारेटच्या पाकिटावर असलेल्या इशाऱ्याप्रमाणे असल्यास वावगे वाटू नये. ‘तीन तासापेक्षा अधिक वेळ टि.व्ही. जी व्यक्ती पाहिल त्याला अकाली मृत्यूस निमंत्रण मिळेल’ असा तो इशारा असेल. परंतु या इशाऱ्याचे आदेश प्रसारण मंत्रालय देईल की, नाही त्याबद्दल साशंकता आहे. एवढेच नव्हे तर सदर वैधानिक इशारा छापून आल्यास टि.व्ही.चे प्रेक्षक रसिक तो कितपत मानतील हा देखील प्रश्नच आहे. कारण सिगारेटच्या पाकिटावर धोक्याची सूचना छापूनही सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये अजूनही घट झालेली नाही. त्यामुळे टि.व्ही. पाहणाऱ्यांमध्ये घट होईल याची सूतराम शक्यता नाही. तशी घट झालेली प्रसारण वाहिन्यांनाही परवडणार नाही आणि प्रसारण मंत्रालयालाही परवडणार नाही, कारण हा मुद्दा महसूलाशी निगडीत आहे. जीवाशी नाही.
दिवसेंदिवस चॅनल्सची वाढती संख्या व त्या चॅनल्सकडे प्रेक्षकांना वळविण्याकडे चॅनेलवाल्यांची चाललेली केविलवाणी धडपड या सर्व गोष्टी लक्षात घेता, लहान मुलांवर याची साधी जाणीव या चॅनल्सवाल्यांना का होत नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते, व त्याचवेळेला अशा वाहिन्यांविरूद्ध कारवाई करण्याचे धाडस सरकार कधी करणार? अशी चर्चा सर्वत्र होत आहे. गेल्या एक - दोन दशकांपासून या दूरचित्रवाणीने आपल्या सगळयांच्याच मनावर अधिराज्य गाजवायला सुरूवात केली आहे. ‘प्राईम टाईम’ या गोंडस नावाखाली खाजगी वाहिन्यानी मालिकांचा जो खेळ सुरू केला आहे व त्याची व्याप्ती पाहता याचे परिणाम लहानांपासून ते मोठयापर्यंत किती गंभीर असतील याची जाणीव गेल्या काही वर्षांपासून आपल्याला होऊ लागली आहे. वाढती गुन्हेगारी, बलात्कार, खून, दरोडे, आत्महत्या याचे प्रमाण या मालिकांमुळेच देशात वाढत आहे असे म्हटल्यास वाईट वाटू नये. कारण काही मालिकांमध्ये भडक दृश्य, क्राईम वर आधारित मलिका दाखविल्या जातात त्यामुळे आपण क्राईम मलिका पाहून अमुक अमुक गुन्हा केला अशी माहिती गुन्हेगार पोलिसांना देत आहेत. पण, असे असूनही या मालिका एकामागून एक बघण्याचा आपला हट्ट काही आपण सोडत नाही हेच आमचे दुदैव.
त्यावेळी दूरदर्शनच्या निर्मितीनंतर, हिंदीबरोबर इतरही प्रादेशिक भाषांमध्ये या वाहिनीने सुरू केलेल्या कार्यक्रमांमुळे प्रेक्षकांना दूरदर्शनची एक सवयच लागली होती. त्यात मराठी कार्यक्रमांनासुद्धा मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, दर्जेदार कार्यक्रमांचे पर्वच सुरू झाले असल्याचे म्हणावे लागेल. बुनियाद, नुक्कड, हमलोग, महाभारत, रामायण, सर्कस, शांती, करमचंद यासारख्या हिंदी मालिका तर एक शून्य शून्य, झोपी गेलेला जागा झाला, गोटया, पु. ल. देषपांडे यांचा एकपात्री कार्यक्रम असे एकापेक्षा एक मराठी कार्यक्रमांमुळे टीव्हीसमोर मनमुराद आनंद लुटत होते.
मात्र खुल्या अर्थव्यवस्थेचे धोरण भारताने स्विकारल्यानंतर खाजगी वाहिन्यांचे आक्रमण भारतात झाले आणि त्याचेच काही गंभीर परिणाम समाजावर होताना आज घडीला दिसून येत आहेत. खाजगी वाहिन्यांवर दाखविण्यात येणारे सर्वच कार्यक्रम वाईट आहेत असे नाही. परंतु, सध्या ज्या प्रकारे या मालिकांचे प्रक्षेपण सुरू आहे त्यावर काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे. आज टि.व्ही.वर दाखविण्यात येणाऱ्या मालिकांमुळे घरातला कोणताही सदस्य एकत्ररित्या कार्यक्रम बघण्याचे धाडस करू शकत नाही हे वास्तव आहे. त्यात लहान मुलांबरोबर असे कार्यक्रम बघणे म्हणजे त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल याचा विचार करण्याची वेळ पालकांवर आली आहे.
काही दिवसांपूर्वीच, महाराष्ट्रात एका शाळकरी मुलाचा सीआयडी नावाची मालिका बघून खून करण्यात आल्याची दूर्दैवी घटना घडली होती. पोलिस तपासात पकडण्यात आलेल्या त्याच्या मित्रांनीच त्याचे अपहरण करून गळा दाबून खून केल्याचे कबूलीजबाबात सांगितले होते. त्यामुळे एका कोवळया जीवावर मालिकांचा किती भयंकर परिणाम होऊ शकतो याचे हे उदाहरण आहे. घरात बघितल्या जाणाऱ्या मालिका या दर्जेदार आहेत की नाही याची तमा ना वाहिन्यांना राहिली आहे ना ती कोणत्या वेळी बघावी याची जाणीव घरातल्या कोणत्याच सदस्याला राहिली नाही. सूड, द्वेष, मत्सर किंवा खूनांचे रहस्य उलगडणाऱ्या मालिका हा पालक वर्ग लहान मुलांसमोर बघताना, त्यांच्या मानसिकतेचा विचार कधी करेल? कारण लहान मुलांची आकलन शक्ती व प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारण्याची त्यांची चिकित्सक बुद्धी आपण अशा मालिका बघताना वाया घालवत असू तर उद्याचा भारत ज्यांच्याकडे म्हणून ज्या तरूणांकडे आपण बघता त्यांच्यावर कोणत्या पद्धतीचे संस्कार आपण करीत आहोत हे विचारात घेण्यासारखे आहे.
लहान मुलांच्या एवढ्याश्या जगात आपणच त्यांचे कोणीतरी असतो. त्यामुळे आपण जे काही करू ते योग्यच आहे असाच विचार करून ते तसं करण्याचा प्रयत्न करत असतात. मग ती देवाजवळ केली जाणारी प्रार्थना असो किंवा एखाद्या वाहिनीवर बघितले जाणारे कार्यक्रम असोत सर्वच बाबतीत ही लहान मुले तुमचे अनुकरण करायला उत्सुक असतात. त्यामुळे या टि.व्ही. वर दाखविण्यात येणाऱ्या मालिकांचा प्रभाव आपल्या मुलांवर पडत असेल तर त्यावेळी स्वतःहून अशा मालिका बघण्याचा मोह पालकांनी टाळायलाच हवा.
घरात राहणाऱ्या महिलाही टि.व्ही. वरील कार्यक्रम पाहण्यात जास्त वेळ घालवतात. मात्र त्यांनीही आपला जीव सलामत ठेवण्यासाठी आपल्या टि.व्ही.च्या आवडीपासून दूर राहणे गरजेचे आहे कारण आज शारिरीक हालचालींची कामे जास्त नसतात, अशा परिस्थितीत टि.व्ही. समोर तासनतास बसून राहिल्यास शरीराचे नुकसान होणार हे स्पष्टच आहे, त्यामुळे शारीरिक हालचालींच्या कामाचा पुरस्कार प्रत्येकाने केला पाहिजे, इतकेच नव्हे तर बसून काम करण्याच्या पद्धतीला देखील रोखले पाहिजे. याबाबत सरकार काही करणार नाही. त्यामुळे आपणच आपल्या जीवनशैलीकडेच गांभीर्याने पाहिले पाहिजे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.