Ticker

10/recent/ticker-posts

सापाला मारण्यापेक्षा त्याच्या जाती ओळखणे शिका

साप दिसल्याबरोबर त्याला ओळखण्याची कला शिकून घेणे गरजेचे आहे


अरे बापरे... साप! साप दिसला की आपली पहिली प्रतिक्रिया ही असते. प्रत्येक साप हा विषारीच असणार, तो आपल्याला चावणार आणि त्यामुळे आपण मरणार; ही अंधश्रद्धा माणसाच्या मनात घर करून बसलेली आहे. त्यामुळे साप दिसला रे दिसला की त्याला मारून टाकणे हे आपल्याला आपले परम कर्तव्य वाटते. 

पाऊस पडायला लागल्यावर प्रत्येक व्यक्तीची आश्रय घेण्याची जागा घरातील चार भिंतीमध्ये असते. पण, ज्यांचं घरदार पाण्याने भरून जाईल, ते कुठे आश्रय घेतील? हा तर विचार आम्ही कधी करतच नाही. तर ते ‘मान ना मान मै तेरा मेहमान’ असे म्हणून तुमच्या घरात दाखल होतील. स्वतःच्या घरात पाणी भरल्यावर माणूसच नाही तर सापदेखील घाबरून जाईल. त्यामुळेच मुंबईतील काही ठिकाणी तळमजल्यांवरील घरांत, दुकानांत, बगीच्यात, पावसाळयात साप बघायला मिळतात. ‘अॅनिमल वेलफेअर सोसायटी’ किंवा सर्पमित्र यांना अशा सापांना पकडण्यासाठी पावसाळयात बरेच फोन येतात. लवकर या, घरात, दुकानात साप घुसलाय. पावसाळयातील चार महिन्यांत सर्पमित्र जवळजवळ ४०० ते ४५० साप पकडून त्यांना बंगल्यात सोडतात असे त्यांचे म्हणणे आहे. 

सापांविशयी माहिती असणारे काहीजण सांगतात की, नाल्यात किंवा गटारात साप राहतात, अतिवृष्टी झाली की, नाले, गटारे तुंबल्यामुळे बाथरूममधील पाईपातून किंवा टाॅयलेटमधील कोपऱ्यामधून ते घरात प्रवेश करतात. भरतीच्या वेळेस हिरव्यागार शेतात देखील पाणी भरले जाते. अशा हिरव्या शेतात कोब्रा आणि वाईपर नावाचे साप राहतात. डोळयांवर चश्मा असल्यासारखा दिसणारा व स्पेक्टेकल-कोब्रा नावाने ओळखला जाणारा नाग या जातीतील साप विषारी जातीत मोडतात. अशा सापांवर प्रेम करणारे लोक शहरांत बरेच आहेत असे सर्पमित्र सांगतात. पावसाळयात कधी-कधी तर आठ ते दहा दिवसांत मोठे साप व त्यांची पिल्ले धरून अंदाजे १०० च्या वर सापांना जीवनदान देण्यात सर्पमित्र यशस्वी ठरतात. पण त्यात जास्त करून लहान सापच जास्त असतात. वाईपर नावाच्या सापाचा अंडी देण्याचा मौसम असतो. रस्सेल वाइपर नावाच्या सापाची पिल्ले याच ऋतूत अंडयातून बाहेर येतात.

या दोन्ही विषारी जातींव्यतिरिक्त बिनविषारी सापांची संख्यादेखील काही कमी नाही. रेट स्नेक आणि सॅन्ड बोआ नावाचे साप हे बिनविषारी आहेत. ठाणे येथील काॅलेजात काही वर्षांपूर्वी एक रेट स्नेक आढळून आला होता. तो एअरकंडिशनच्या  कोपऱ्यातून आत आला होता. पहिले तर मुले घाबरून गेली. परंतु, माहितगार असलेल्या एकाने त्याला पकडले आणि सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की, हा साप विषारी नाही की, त्रासदायकही नाही. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्श करायला सांगितले. पण कोणाची हिंमत झाली नाही. असेच एक प्रदर्शन काही वर्षांपूर्वी  वाशी येथील राजेंद्र घरत यांनी त्यांच्या साप्ताहिकाच्या कार्यक्रमानिमित्त एका हाॅलमध्ये भरविले होते. त्यातदेखील सर्पमित्रांनी बरेचसे साप आणले होते. त्यातील काही साप त्यांनी पकडून प्रेक्षकांना दाखविले, त्यांना हात लावायला सांगितला, हात लावून बघितल्यावर प्रेक्षकांचा विश्वास बसला. त्यातील एक सर्पमित्र म्हणाला की, पहिले लोक सापाला घाबरून त्याला मारून टाकत होते. आता हळूहळू नागरिकांमध्ये जागृती येते आहे. ते साप दिसल्यास सर्पमित्रांना कळवितात व ते त्यांना पकडून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून देतात.

मानव सापाला घाबरतो, खरेतर त्यापेक्षा कितीतरी पटीने सापच माणसाला घाबरतो. साप दिसल्याबरोबर त्याला ओळखण्याची कला शिकून घेणे गरजेचे आहे. पण, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की, विषारी सापाची पिल्ले देखील अंडयातून बाहेर निघतात. त्यावेळी ते विषाबरोबरच बाहेर पडतात. त्यांना हाताळताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. खरेतर सापाचे विष म्हणजे एक रूपांतर झालेला लाळरस होय. मानवाच्या तोंडामध्ये ज्याप्रमाणे लाळ असते आणि हया लाळेचा उपयोग पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी होतो. तसेच सापाचे विष हे सापाच्या भक्षाचे नीटपणे पचन होण्यासाठी असते. जेव्हा साप भक्ष्याच्या शरीरात विष सोडल्यानंतर ते विष भक्ष्याच्या शरीरात रक्तामधून पसरते आणि पेशींवर रासायनिक प्रक्रिया घडवून आणते. त्यामुळे पेशी कमकुवत होऊन त्या पचनासाठी सुलभ होतात. कारण साप आपले भक्ष्य चावून खात नाही. तो आपले भक्ष्य सरळ गिळतो.

शहरांत नागरीक अनेक दिसणाऱ्या अज्ञात जीवजंतूंबरोबर रोज जगत आहेत. कधी-कधी या ऋतुंमध्ये ते तुम्हाला भेटायला येतील ते स्वाभाविक आहे, लक्षात ठेवा, सापासारखे सहवासी तुम्हाला भेटावयास आल्यास त्यांना उगाचच मारण्याचा प्रयत्न करू नका, त्यांच्यावर फक्त बारीक नजर ठेवा आणि सर्पमित्रांना फोन करून त्यांना त्यास पकडावयास सांगून त्याला पुन्हा (जंगलात) त्याच्या घरी सोडून द्या. सर्पमित्रांकडून त्यांची शरीररचना, त्यांची जात (विषारी/बिनविषारी) कोणती आहे, रंग कोणता आहे, त्याची शरीररचना कशी असते, याचा अभ्यास करा. चावणे हा सापाचा गुण नव्हे. साप मुद्दाम चावण्याचे धाडस कधीही करत नाही. स्वतःला धोका आहे असे जाणवल्यास साप हल्ला चढवत असतो आणि तेही त्याला पळून जाणे शक्य नसल्यासच. खरेतर साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो शेतकऱ्यांच्या शेताचे नुकसान करणाऱ्या उंदीर, घुशी, ससे, छोटे डुक्कर, बेडूक यांना आपले भक्ष्य बनवितो. ज्यामुळे शेतारकऱ्यांच्या शेतीचे नुकसान कमी होते.  मग काय, या आपल्या निसर्गरक्षकांना तुम्ही वाचविणार ना! 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या