Ticker

10/recent/ticker-posts

लग्न म्हणहे कन्या विकण्याचा बाजार नव्हे

हुंडाबंदी आहे, पण वरपक्षाच्या मागण्या, चोचले आणि हाव काही थांबलेली नाही

हिंदू संस्कृतीनुसार, विवाह म्हणजे एक पवित्र बंधन, दोन जिवांचा मेळ. एकीकडे निवडणुकांच्या पार्श्व्भूमीवर आता महिला राज येणार, महिलांचा ठसा सर्वच क्षेत्रात आहे तसाच महिला काही परिवर्तन करून दाखविणार, असे आपण जेव्हा मोठया फुशारक्या मारत म्हणतो तेव्हाच दुसरीकडे आपल्या देशात महिलांचे जगणे किती भीषण आहे यावर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
बाळा, जरा शांततेने विचार कर, ते मुलाकडील लोक आहेत. मनिषा पुढे बोलणार त्याआधीच शैला रागात बोलली, ‘सो व्हाॅट’ अगं, आई आपल्याला पण काही स्वाभिमान नावाची गोष्ट आहे का नाही. तेव्हा मनिषा शांत मुद्रेत म्हणाली, मी तर असं मानते की, लग्न व्हायला फक्त चारच दिवस आहेत. आता हा - ना करायची ही वेळ नाही. टेस्ट करून घ्यायला आपलं काय जातंय? कोणालाही कानोकान समजणार नाही. बी. ए. झालेल्या शैलाचं लग्न इंजिनियर झालेल्या चांगल्या गलेलठ्ठ पगार असलेल्या पंकज बरोबर करण्याचे ठरविण्यात आले होते. विधी, लग्न आणि रिसेप्शनचे मेनू पंकजच्या आई-वडीलांना विचारूनच नक्की करण्यात आले होते. सगळी तयारी जेमतेम चालू होती. प्रत्येक कुटुंबात एखादा विघ्नसंतोषी असतोच असतो. त्यातच पंकजच्या आत्याने त्याचे कान भरविले.


साखरपुडयाच्या वेळेस, शैलाचं शरीर भरलेलं दिसत होतं. रितसर जाडी म्हणावी, अगदी तसं. फक्त सहा महिन्यात तीचं वजन कमी कसं झालं. मी विचारलं तर म्हणाली, डायटिंग करतेय म्हणून. वजन कमी करण्यासाठी जिममध्ये कसरतीसाठी जाते. जाॅगिंग आणि पोहण्यासही जाते. मला वाटते वजन कमी होण्याचं दुसरं काही कारण असलं पाहिजे. शैलाचा छातीचा एक्सरे आणि रक्ताची  एच.आय.व्ही. टेस्ट करून घ्यावी.  टि.बी. किंवा इतर काही असलं तर बिचाऱ्या पंकजची काय स्थिती होईल? आणि त्यांच्याकडून आपल्याला काही हुंडा म्हणून मिळणारदेखील नाही तेव्हा पंकज तू तिला नाकारूनच टाक.’’ ‘तु काळजी करू नको, आत्या’. शैला तंदुरूस्त आहे. टेस्ट करायला सांगशील तर हंगामा होईल, आणि अशी गोष्ट आपण पुन्हा लपवू शकत नाही. तेव्हा आत्याने स्वतःच शैलाची आई मनिषाला फोन करून सल्ला दिला. शैलाला हे समजताच तिने लगेचच पंकजला फोन केला आणि म्हणाली, तुझ्या आत्याला सांग की, मी कोणताही एक्स रे, कोणतीही टेस्ट वगैरे करणार नाही. 'धीस ईज नाॅनसेन्स’. मनिषाने शैलाला समजविण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. त्यावर आत्या म्हणाली, टेस्ट करायची नाही तर लग्न मोडले. कुणाच्याही स्थितीचा विचार न करता मुलाकडच्यांनी सरळ लग्न मोडून टाकलं. मुलीकडील मंडळी मनःस्तापाशिवाय दुसरे काहीही करू शकले नाहीत. खरं कारण होतं हुंडा न मिळणं.


दुसरीकडे राजस्थान राज्यातील झुंझुनू शहरात तरूणांना लग्नासाठी बायको मिळत नाही म्हणून वधूची तिथे मोठया प्रमाणात मागणी आहे. इथे दलालांना मुली विकून मोठया प्रमाणात पैसा मिळतोय. राजस्थानात लग्नासाठी वधूंची खरेदी-विक्री मोठया प्रमाणात होत आहे, अशी प्रकरणेही प्रकाशझोतात येत आहेत. राजस्थानात ज्यांना वधू मिळत नाही किंवा ज्या पुरुषांची पहिली, दुसरी बायको वारली आहे असे पुरुष या दलालांना भरपूर पैसे देऊन मुली विकत घेतात. मग हेच दलाल दुसऱ्या राज्यांतून मुलींना आणून काही ना काही कारणांनी फसवून आणून त्यांना मोठया रकमांना त्यांची विक्री करतात. राजस्थानातील मेवाड परिसरात असा गोरखधंदा मोठया प्रमाणात सुरू आहे. मुलींना, विवाहितांना विकण्यासाठी त्यांना फूस लावून ते त्यांच्या मुलांना मारण्यापर्यंत असे दलाल मागेपुढे पाहत नाहीत. यावर ठोस कारवाई होण्याची गरज असून त्याबरोबरच भीषण वास्तवाचाही विचार होण्याची नितांत गरज आहे. ज्या ठिकाणी मुलींची संख्या कमी आहे तिथे कोणत्याही परिस्थितीत आणि कशाही प्रकारे मुलींची, महिलांची खरेदी-विक्री होत आहे हा सारा प्रकार मुलींच्या कमी होणाऱ्या संख्येशी निगडीत आहे. स्त्रीला उपभोग्य गुलाम मानून तिची खरेदी-विक्री होण्याचा प्रकार लांच्छनास्पद म्हणावा लागेल. स्वखुशी आणि जबरदस्ती यात फरक आहे. आपली पत्नी ही लग्नानंतरची आपल्या घरची साक्षात लक्ष्मी आहे, तिला आनंदात ठेवणं हे प्रत्येक पतीचे काम आहे. हाच विचार सासू-सासऱ्यांनीही करायला हवा. घरी येणारी सून ही काय तुमची देणेकरीण असते का? पाहिजे तेव्हा काहीही मागणी करा आणि तुमच्या मागण्या लगेचच पूर्ण होतील. 


विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हुंडाबंदी आहे, पण वरपक्षाच्या मागण्या, चोचले आणि हाव काही थांबलेली नाही. आजही या अपेक्षांच्या ओझ्याने नववधू होरपळून जात आहेत. त्यांना जगण्यापेक्षा मरण जवळ करावसं वाटावं इतका त्यांचा छळ होतोय. कधी सुधारणार आपण आणि आपला समाज?


जरा विचार करा, त्याच सुनेच्या जागी आपली मुलगी असती तर असेच वागला असता का? नाही ना ! लग्नासारख्या पवित्र बंधनात नववधूला राजीखुशीने नांदू द्या. तिला हुंडा नावाच्या जोखडाखाली दाबून किंवा लग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून तिची खरेदी-विक्री करून तिला विकण्याचा फसवा प्रयत्न करू नका. 





 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या