त्याकाळी चित्रपटात लावणी म्हटले की सुलोचना चव्हाण यांचेच नाव पुढे येत असायचे. त्यांच्या आयुष्याचा जणू लावणीशीश करार झाला असावा असे म्हटल्यास वावगे ठरू नये...
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
ठसकेबाज लावण्यांनी मराठी मनाला वेड लावणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने सहा दशकांहून अधिक काळ रंगलेला लावण्याचा फड पोरका झाला आहे. उत्तरेकडून येत स्वतःचे रूपडे घेऊन महाराष्ट्रात रुजलेल्या लावणीच्या रोपट्यावर अनेकांनी आपल्या कलेचे शिंपण केले. त्यामध्ये सुलोचना चव्हाण यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. मुळात शृंगार हा लावणीचा आत्मा; पण शृंगार आणि बीभत्सरसातील अंधुक सीमारेषा जपणे, हे सादरीकरणातील मर्म जाणून त्यांनी उतावळेपणाचा स्पर्शही आपल्या कलेला होऊ दिला नाही. हिंदी, मराठी सह विविध भाषांतील अनेक चित्रपटांमधून त्यांनी भजनांपासून गझलांपर्यंत अनेक गाणी गायली असली तरी आचार्य यात्रे यांनी दिलेल्या 'लावणीसम्राज्ञी' हा किताबच त्यांची ओळख ठरला. ग. दि. माडगूळकर, जगदीश खेबुडकर, राजा बढे यांच्यासारखे सिद्धहस्त गीतकार वसंत पवार, राम कदम आणि बाळ पळसुले यांच्यासारखे मातीशी नाळ जोडलेले संगीतकार आणि सुलोचना चव्हाण यांनी जमविलेल्या 'कळीदार कपुरी पाना'चा वर्खाचा विडा उभ्या महाराष्ट्रात रंगून गेला. एकीकडे लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यासारख्या दिग्गज गायिकांनी रसिकांच्या मनावर घर केलेले असले तरी चित्रपटात लावणी म्हटले की सुलोचना चव्हाण यांचेच नाव पुढे येत असायचे. त्यांच्या आयुष्याचा जणू लावणीशीश करार झाला असावा असे म्हटल्यास वावगे ठरू नये. घरी ग्रामोफोन ऐकत एका लावणीचे बोल गुणगुणताना आईने राग भरलेल्या लहानशा सुलोचना चव्हाण यांनी पुढे लावणीसम्राज्ञी होऊन रसिकांच्या मनावर राज्य केले.
सुलोचनाताई चव्हाण यांचा जन्म १३ मार्च १९३३ रोजी मुंबईतल्या गिरगावातील फणसवाडीचा. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांनी गायनाला सुरुवात केली. त्यावेळेस मुंबईत अनेक मेळे व्हायचे. 'श्रीकृष्ण बालमेळा' या नावाने सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच एक मेळा होता. या बालमेळ्यातून त्यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले. हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकांत त्यांनी बाल भूमिका साकारल्या. त्यांच्या मोठ्या भगिनीने त्यांना कलाक्षेत्रासाठी प्रोत्साहन दिले. सुलोचना यांनी गायनाचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण घेतलेले नव्हते. ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकूनच त्या गायनाचा रियाज करायच्या.
सुलोचना चव्हाण यांच्या 'पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, 'सोळावं वरीस धोक्याचं', 'पाडाला पिकलाय आंबा', 'कसं काय पाटील बरं हाय का', 'खेळताना रंग बाई होळीचा', 'तुझ्या ऊसाला लागल कोल्हा',अशा त्यांच्या अनेक लावण्यांनी रसिकांना वेड लावले. हंसा वाडकर, जयश्री गडकर आणि लीला गांधी यांच्यासारख्या नृत्यकुशल अभिनेत्रींनी त्यात आणखी रंग भरले. श्रीनिवास खळे यांच्या 'कळीदार कपुरी पान' सारख्या लावणीतून सुलोचना चव्हाण यांनी अभिजातताही जपली.
👇क्लिक करा
चित्रपटांमधील पार्श्वगायनासह विविध देशांमध्ये चव्हाण यांनी लावण्याचे हजारो कार्यक्रम केले यातून त्यांनी सामाजिक वाणही जपले राज्यातील अनेक शाळा मंदिरे अनाथ आश्रम अशा संस्थांच्या तसेच लष्कराच्या मदतीसाठीही त्यांनी कार्यक्रम केले पानशेत पूरग्रस्तांसाठी केलेल्या कार्यक्रमातून पुरेसा निधी गोळा न झाल्यामुळे त्यांनी रस्त्यावर उभे राहून पैसा गोळा केले आणि स्वतःच्या दागिने विकून मदत केली मंचावरून ठसकेबाज लावणीचे सादरीकरण करताना त्यांच्या डोईवरील पदर कधी ढळला नाही. आपल्या कार्यक्रमांमधून त्यांनी कधीही खिल्लारपणाला थारा दिला नाही. त्यांच्या कार्यक्रमांमधील महिलांची उपस्थिती याचीच साक्ष देते.
एक काळ असा होता की, 'श्रीमंत आणि रंगेल माणसांचा शौक' म्हणून नाक मुरडली जात असणारी लावणी चित्रपट आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून आता घराघरात ऐकू येऊ लागली आहेत. हीच मराठी रसिकांनी सुलोचना चव्हाण यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली आहे.
Photo:google
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.