Ticker

10/recent/ticker-posts

घरात एसी-कुलर नाही, तरीही उन्हाळा करा सुखदायी

उन्हाळ्यात नैसर्गिकरित्याच रोग प्रतिकारक शक्ती कमी होत असते. योग्य आहार व विहार केल्यानेच रोगप्रतिकारक शक्ती टिकवली, वाढवली जाऊ शकते. या ऋतूत नैसर्गिकच भूक कमी होत असल्याने पचनास हलका व कमी प्रमाणात आहार घ्यावा. आहार गोड, आंबट व खारट या रसांचा असावा.


-दादासाहेब येंधे

भारतामध्ये सामान्यतः वसंत व ग्रीष्म ऋतू हे दोन ऋतू उन्हाळा म्हणून मानले जातात. त्यातही ग्रीष्म ऋतू जास्त उष्ण असतो. आता ग्रीष्म ऋतू सुरू आहे. हा ऋतू सामान्यतः एप्रिल उत्तरार्ध, मे, जून पूर्वार्ध मानला जातो. मराठी महिन्यानुसार ग्रीष्म ऋतूचा काळ चैत्र व वैशाख या दोन महिन्यांचा आहे. या ऋतूत सर्वात जास्त शारीरिक व मानसिक बळ कमी होते. घामाने शरीर ओले होते. शरीरातून घाम जास्त प्रमाणात बाहेर गेल्यामुळे रंध्रे मोकळी होतात. त्वचेवाटे शरीरातील उष्मा बाहेर पडतो. त्यामुळे भूक कमी होते. काम करण्यास उत्साह वाटत नाही. मन बेचैन, अस्वस्थ होते. अंग भाजून निघत आहे असे वाटते.


वाढत जाणाऱ्या सूर्याच्या प्रखरतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचा अंश कमी होत जातो. तसाच स्निग्ध गुणही कमी होत जातो. याचा परिणाम शरीरावर होऊन शरीरातील पाण्याचा अंश व स्निग्ध गुण कमी होऊन रुक्ष गुण वाढतो.

याच काळात अयोग्य पदार्थांच्या पेयाचे सेवन केले जात असल्याने पोटात मळमळ होणे, उलट्या होणे, टॉन्सिल सुजणे, सर्दी, खोकला घसा बसणे, पोटदुखी, डोकेदुखी, त्वचारोग, विषाणूजन्यता इत्यादी आजारांचे प्रमाण वाढते. हे खाजगी दवाखाने, खाजगी नर्सिंग होम, महानगरपालिकेचे रुग्णालय, सरकारी दवाखाने व सरकारी रुग्णालये यामध्ये केलेल्या अनेक सर्वेक्षणातून दिसून येते. अन्य ऋतूंपेक्षा उन्हाळ्यात रुग्णांचे प्रमाण दुप्पट व काही वेळा जास्तही होते. म्हणून उन्हाळ्यात आहार विहार जपून केला जाणे गरजेचे आहे. विशेषतः उन्हाळ्यात नैसर्गिकरित्याच रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते. योग्य आहार व विहार केल्यानेच रोगप्रतिकारक शक्ती टिकवली, वाढवली जाऊ शकते. या ऋतूत नैसर्गिकच भूक कमी होत असल्याने पचनास हलका व कमी प्रमाणात आहार घ्यावा. आहार गोड, आंबट व खारट या रसांचा असावा.


या ऋतूत कांदा खाणे चांगले असते, कांदा शांत म्हणजे थंड असल्याने तो या दिवसांत शरीरात जी उष्णता उत्पन्न होते ती कमी करतो. उष्णतेपासून उत्पन्न होणाऱ्या सर्व विकारांपासून शरीराचे रक्षण करतो. कांदा भाजून वा अन्य प्रकारे खाण्यापेक्षा कच्चा खाणे अधिक चांगले.


या काळात भोपळा, दोडका, घोसाळी, पडवळ, भेंडी यांसारख्या फळभाज्या खाव्यात. सामान्यतः या भाज्या शरीरासाठी हितकारक, जास्त उष्ण नसलेल्या स्निग्ध गुण उत्पन्न करणाऱ्या शरीरात सत्वगुण वाढवणाऱ्या आहेत. सर्दी, खोकला, ताप, पोटातील जंत, रक्तदोष इत्यादी विकाऱ्यांवर उपयोगी आहेत. निसर्गच शरीरास हितकारक उपयोगी अशी फळे या ऋतूत उत्पन्न करीत असतो. द्राक्ष, टरबूज, कलिंगड, कैरी, करवंदे, आवळा, कोकम यांसारखी फळे याच ऋतूत येतात. सर्वात प्रिय असणारा आंबा देखील याच दिवसात येतो. सामान्यतः ही सर्व गोड, शीत व पाण्याचा अंश असणारी फळे आहेत. या दिवसात घामाद्वारे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने त्याची पूर्तता करण्याचे काम ही फळे करतात. शहाळ्याचे, नारळाचे पाणी या कारणासाठी प्यावे. अननस, संत्री, मोसंबी यांचा उपयोग याच कारणासाठी होतो. सामान्यतः सर्वच फळे पौष्टिक, रुचिकारक, शरीरात थंडपणा निर्माण करणारी, त्वरित पचन होणारी, खाल्लेले अन्नाचे पचन करणारी, पित्त दोष शामक, सर्व प्रकारची जीवनसत्व, खनिज द्रव्य असणारी आहेत. ही फळे खाल्ल्यानंतर मन तृप्त करणारी प्रसन्न करणारी आहेत. रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी आहेत.


या दिवसांत विविध प्रकारची सरबते प्यावीत. लिंबू सरबत, कोकम सरबत, गुलाब, वाळा, शतावरी इत्यादी सरबते शरीरासाठी हितकारक आहेत. या दिवसांत कैरी पन्हे अत्यंत उपयोगी असते. सामान्यतः सर्व सरबते शरीरात पाण्याची पूर्तता करणारी, मन प्रसन्न करणारी, हृदयास हितकारक आहेत. कारण ही चवीस गोड, आंबट आहेत. या काळात खजूर, खारीक, खोबरे, शेंगदाणे खावेत. हे सर्व पदार्थ शरीरातील थकवा त्वरित दूर करणारे आहेत. या दिवसांत एखादा पाहुणा घरी आला की, त्याला चहाऐवजी सरबत दिले जाते. ही सरबते थकवा दूर करणारी श्रमपरिहारक आहेत. शरीरात थंडावा निर्माण करणारी आहेत.


उन्हाळ्यात मांसाहार कमी करावा. परंतु या दिवसांत महाराष्ट्रभर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात याच दिवसांत विविध प्रकारच्या यात्रा असतात. यात्रांमध्ये यथेच्छ मांसाहार केला जातो. कित्येक बोकड गावागावांत कापले जातात. खरेतर, सर्व प्रकारचा मांसाहार हा उष्ण आहे, तसेच मांसाहार तयार करण्यासाठी ज्या मसाल्यांच्या पदार्थांचा वापर केला जातो तेही उष्णच असतात. परिणामी, शरीरात जास्त प्रमाणात उष्णता उत्पन्न होऊन मूळव्याध, भगंदर यासारखे गुद मार्गाचे विकार तसेच त्वचेचे आजार देखील होतात. यासाठी मांसाहार तयार करताना मसाल्यांच्या पदार्थांचा वापर कमी करावा. मांसाहाराबरोबर कच्चा कांदा, लिंबू खाण्याची पद्धत आहे. याचे कारण हेच आहे की, मांसाहाराने वाढणारी उष्णता कांदा आपल्या शीत गुणाने कमी करतो.


उन्हाळ्याच्या दिवसांत तळलेले पदार्थ, मॅगी सारखे सर्व चायनीज पदार्थ, शिळे अन्न, पुन्हा गरम केलेले अन्न खाऊ नये. उन्हाळ्यात लस्सी, ताक अश्या प्रकारची थंड पेये, आईस्क्रीम, माठातील थंड पाणी प्यावे. थंड पेये प्यावीत. परंतु, ती फ्रिज मधून काढल्याबरोबर पिऊ नये. थोडा वेळ बाहेर ठेवून नॉर्मल स्थितीत असल्यावर प्यावे. अति थंड पाणी पिऊ नये. वरील उपाय केल्यास व योग्य आहार घेतल्यास तुमच्या घरात उन्हाळ्यात एसी, कुलर नसला तरी उन्हाळा सुखकारक होऊ शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या