खरे तर माणसाने कर्मावर विश्वास ठेवायला हवा, कर्मकांडावर नव्हे. जीवनातील समस्या सोडवण्याचा मार्ग परिश्रम, शिक्षण आणि योग्य विचार यातूनच मिळतो. कोणत्याही चमत्काराने किंवा तथाकथित बाबांच्या आशीर्वादाने जीवन बदलत नाही. समाजाने अशा भोंदूबाबांपासून सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे.
-दादासाहेब येंधे
ऐसे कैसे झाले भोंदू | कर्म करोनी म्हणती साधू ||
अंगा लावूनियां राख | डोळे झाकुनी करिती पाप||
दावुनिया वैराग्याची कळा | भोगी विषयांचा सोहळा॥
तुका म्हणे सांगो किती| जळो तयांची संगती॥
संत तुकाराम महाराजांचा हा अभंग सामान्य लोकांना भोंदू बाबांपासून सावध राहण्याचा संदेश देतो. दुर्दैवाने अशिक्षित, अडाणी लोकांचा शिकलेल्या सवरलेल्यांनाही संत वाचनाचा विसर पडत गेला का काय असेच वाटत आहे. धर्म आणि अध्यात्माच्या नावाने लुबाडणूक करणाऱ्या बुवाबाजीला असंख्यजन वेळोवेळी बळी पडत गेले. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगावचा स्वयंघोषित अशोक खरात उर्फ 'कॅप्टन' हा ज्योतिषी भोंदू त्याच्या कुकर्मामुळे प्रसिद्धीस आला असला तरी जिल्ह्यातील अनेकांना तो काही वर्षांपासून ठाऊक होता. तो केवळ अंकशास्त्र व तत्सम शास्त्राचा अभ्यासक म्हणून नव्हे तर तंत्र-मंत्र करणारा, काळी जादू आणि पिरांना मानणारा, त्यांची पूजा करणारा म्हणूनही प्रसिद्ध होता.

मुंबई, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यांत त्याला मानणारा मोठा उच्चभ्रू वर्ग आहे. स्थानिक आणि नाशिक जिल्ह्यातील लोकांशी मात्र तो अंतर ठेवून होता. इतर जिल्हावासीयांना त्याचे प्रताप ठाऊक नसले किंवा त्यांच्या उशिराने लक्षात आले असले तरी काही लोकांना मात्र त्याच्या पापांचा घडा कधीतरी नक्की भरेल याची खात्री होती. परंतु त्यात महिला आणि त्याही इतक्या मोठ्या संख्येने भरडल्या जातील याचा मात्र अंदाज कोणालाच नव्हता. एक महिला नातेवाईकाच्या मदतीने तक्रार करण्यासाठी पुढे आलेली या स्वयं घोषित कॅप्टनचा बुरखा फाडला गेला. त्याचे पीडित महिलांसोबतचे शंभरएक व्हिडिओ पाहून पोलीस तपास अधिकारीही चक्रावून गेले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनासुद्धा तो घाबरला नाही एवढी त्याची हिंमत वाढली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीत आरोपीने स्वतःला अध्यात्मिक मार्गदर्शक आणि मांत्रिक म्हणून ओळख निर्माण केली होती. विविध अडचणी दूर करण्याचे तसेच जीवनातील समस्या सोडविण्याचे आश्वासन देत त्याने अनेक महिलांशी संपर्क साधला होता. तक्रारदार महिलेचाही त्याने अशाच प्रकारे विश्वासात घेतल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, आरोपीने महिलेला धमकी देत तसेच गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर नाशिक क्राईम ब्रांच युनिट-१ च्या पथकाने अशोक खरात याला ताब्यात घेत अटक केली. त्यानंतर त्याच्या विविध ठिकाणी छापा टाकून तपास करताना पेनड्राइव्हसह काही इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले.
सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना आरोपीकडून एक पेनड्राइव्ह जप्त केला असून त्यामध्ये तब्बल ५८ महिलांसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला, सेलिब्रिटी, वरिष्ठ अधिकारी तसेच राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्ती असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व व्हिडिओंची पोलिसांकडून सखोल तपासणी सुरू असून या प्रकरणातून आणखी गंभीर बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यामध्ये तब्बल ५८ महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. आरोपी आपल्या कॅनडा कॉर्नर येथील ऑफिस आणि सिन्नरमधील फार्महाऊसवर 'ग्रहशांती' किंवा 'दोष निवारण' करण्यासाठी येणाऱ्या महिलांना नशीला पदार्थ देऊन त्यांचे शोषण करायचा आणि गुप्त कॅमेऱ्यांच्या साहाय्याने त्याचे रेकॉर्डिंग करायचा, असे तपासात उघड झाले आहे. असे पोलीस तपासात उघड झाले आहे.
एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सांगितले की, पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार २० मार्चपासून अशोक खरात याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांचा तपास एसआयटी मार्फत सुरू करण्यात आला आहे. सध्या एकूण ११ गुन्ह्यांचा तपास या पथकाकडून केला जात आहे. यामध्ये मुख्य प्रकरणासह इतर १० गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यापैकी ८ गुन्हे लैगिक शोषणाचे तर २ गुन्हे फसवणुकीचे आहेत. याव्यतिरिक्त शिर्डी आणि रहाता या दोन ठिकाणी प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गुन्हे फसवणुकीचे आहेत, अशी माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली.
आजपर्यंतच्या ३० पेक्षा अधिक साक्षीदारांकडं पोलिसांच्या पथकाने विचारपूस केलेली आहे, साक्षीदारांकडे आणि पीडितेंकडे आपण जी चौकशी केली त्यातून आरोपी हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता, त्यांना भीती दाखवत होता. खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधि इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उकळत होता. महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत होता, त्यांच्या कुटुंबीयांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता. त्याच पद्धतीने ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये हातचलाकीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवून समाजामध्ये सातत्याने अंधश्रद्धा पसरवण्याचं कामही अशोक खरात करत होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
खरे तर माणसाने कर्मावर विश्वास ठेवायला हवा, कर्मकांडावर नव्हे. जीवनातील समस्या सोडवण्याचा मार्ग परिश्रम, शिक्षण आणि योग्य विचार यातूनच मिळतो. कोणत्याही चमत्काराने किंवा तथाकथित बाबांच्या आशीर्वादाने जीवन बदलत नाही. समाजाने अशा भोंदूबाबांपासून सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. कोणताही व्यक्ती स्वतःला दैवीशक्ती असल्याचा दावा करत असेल तर त्यावर आंधळा विश्वास न ठेवता प्रश्न विचारणे, तर्क लावणे आणि कायद्याची मदत घेणे आवश्यक आहे. शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जागरूकता यांच्याद्वारेच समाज या जाळ्यातून बाहेर पडू शकतो.
संत तुकाराम महाराजांनी विचारलेला प्रश्न "ऐसे कैसे झाले भोंदू?" आजही तितकाच महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधताना समाजाने विवेक, विज्ञान आणि कर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्धार करणे हीच खरी गरज आहे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.