कलिंगड आठवड्यापर्यंत खराब होत नाही. जर कलिंगडामधून दोन चार दिवसांनी फेस किंवा पाणी बाहेर येत असेल तर समजावे की, त्यात रासायनिक इंजेक्शन टोचलेले आहे.
-दादासाहेब येंधे
उन्हाळ्याच्या दिवसात तयार होणारे कलिंगड हे फळ म्हणजे आपल्यासाठी एक वरदानच आहे. उन्हाळ्याच्या दिवसात प्रखर उष्णतेने अंगाची लाहीलाही होते. त्यावेळी कलिंगडाच्या सेवनाने शरीराला थंडावा मिळतो आणि अति घामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन मन उत्साही होते. ९२ टक्के पाण्याने भरलेले कलिंगड हे फायबरचे एक मुख्य भांडार आहे. कलिंगड खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात सहा टक्के साखर असल्यामुळे डायबेटीज असलेले लोकही ते सहजपणे खाऊ शकतात. मात्र, खरे आणि खोट्याच्या गोंधळामुळे कलिंगडाबद्दल लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. खरे तर उन्हाळ्यात कलिंगडाची मागणी मोठ्या प्रमाणात असते अशा परिस्थितीत ते लवकर पिकवण्यासाठी ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन देण्याचे पेव सध्या फुटले आहे. हे एक हानिकारक रसायन आहे जे कलिंगडाचे गुणधर्म नष्ट करून त्यास हानिकारक बनवू शकते. काही वेळा कलिंगड खराब होऊ नये म्हणून रसायनांचाही वापर केला जातो. त्यांना लालेलाल आणि गोड बनवण्यासाठी कृत्रिम रंग नायट्रेट, कॅल्शियम कार्बाईड यासारखी रसायने वापरली जाऊ शकतात. कलिंगडाचा पुरवठा मागणीनुसार करता यावा म्हणून नायट्रोजनचा वापर केला जातो. त्यामुळे पीक रात्रभर वाढते. हे सर्व घटक आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत. कलिंगडाच्या लालेलाल रंगाला भुलू नका.
उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारामध्ये कलिंगड, द्राक्षे, आंबे आदी रसाळ फळांना मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. लालेलाल दिसणारे कलिंगड बरेचसे फळ विक्रेते कापून ठेवतात. त्याकडेही ग्राहक आपोआप आकर्षित होतात. घरोघरी कलिंगडाला मोठी मागणी असते. रस्त्यावर कापलेल्या कलिंगडाच्या लालेलाल फोडी तर रस विक्रेत्यांकडे 'वॉटरमेलन ज्यूस'ला ग्राहकांची मोठी पसंती असते. पण, बऱ्याच कलिंगडांमध्ये आतून लालेलाल दिसण्यासाठी केमिकलचा वापर केला जातो. त्याचे सेवन केल्यास आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. असे आता आरोग्यतज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे लालेलाल टरबूज घेताना ग्राहकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
कलिंगडाच्या रसाऐवजी केमिकलने भरलेले कलिंगड खाल्ल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या आपल्याला उद्भवू शकतात. कलिंगडामध्ये कृत्रिम रंग टाकल्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता आहे. तर नायट्रोजन, कॅल्शियम कार्बाईड यासारख्या रसायनामुळे किडनी आणि यकृताचे देखील नुकसान होऊ शकते. यामुळे पचनाशी संबंधित समस्या देखील होऊ शकतात.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने सांगितल्याप्रमाणे, यासाठी पांढऱ्या रंगाचा स्वच्छ रुमाल, टिश्यू पेपर किंवा कापड घ्या. आता कलिंगडाच्या आतील लाल भाग कापून घ्या. त्यावर पांढरे कापड हलके घासून घ्या. जर कपड्यावर गुलाबी किंवा लाल रंगाचे ठसे आले तर समजा कलिंगडामध्ये 'एरिथ्रोसिन' नावाचा लाल रंग मिसळण्यात आला आहे. पण जर कापडावर रंग दिसला नाही तर ते कलिंगड नैसर्गिक आहे आणि त्यात कोणतीही भेसळ केलेली नाही.
असं ओळखा रासायनिक इंजेक्शन दिलेले कलिंगड :
१. कलिंगड कापल्यानंतर त्यावर कापसाचा बोळा किंवा पांढरे कापड चोळावे जर तुम्हाला त्यावर लाल रंग दिसला तर याचा अर्थ लाल रंग त्यात रासायनिक इंजेक्शन द्वारे टोचला गेला आहे.
२. एरवी कलिंगडावर पांढरी पावडर असते. अनेकदा लोक याला धुळ किंवा माती असे समजतात. पण, ते कॅल्शियम कार्बाईड आहे, जे कलिंगड लवकर पिकवण्यासाठी लावले जाते. असे कलिंगड खरेदी करू नका.
३. बाजारातून कलिंगड विकत घेतल्यानंतर किमान दोन चार दिवस ठेवता येते. कलिंगड आठवड्यापर्यंत खराब होत नाही. जर कलिंगडामधून दोन चार दिवसांनी फेस किंवा पाणी बाहेर येत असेल तर समजावे की, त्यात रासायनिक इंजेक्शन टोचलेले आहे.
2 टिप्पण्या
खुप छान माहिती दिली दादा साहेब धन्यवाद
उत्तर द्याहटवाखुप छान माहिती दिली दादासाहेब धन्यवाद
उत्तर द्याहटवाPlease do not enter any spam link in the comment box.