Ticker

गल्लोगल्लीत होतोय आरोग्याशी खेळ

खाद्यपदार्थ तयार करण्यापूर्वी भाज्या धुवून घेणे वगैरे अपेक्षा तर दूरचीच गोष्ट. मात्र, कचऱ्याच्या पिशव्या आणि डब्यांमध्ये कचरा टाकून तोच हात परत अन्नपदार्थाला लावला जातो. हात धूत बसायला इथे कोणाला वेळ नसतो.

-दादासाहेब येंधे


उघड्यावर खाद्यपदार्थ शिजवण्यास पालिकेच्या आरोग्य उपविधी नुसार मनाई असूनही मुंबईत हा नियम सर्रास पायदळी तुडविला जात असताना दिसून येत आहे. रस्ते फूटपाथ, गटारे, नाल्यांच्या अस्वच्छ ठिकाणी हमखास वडापाव, भाजीपाव, बुरजी पाव बनवला जातो. या ठिकाणी कारवाई करून पालिका गॅस सिलेंडर, स्टोव्ह जप्तीची कारवाई करते. कारवाई पाठोपाठ दंडाची रक्कम देखील वसूल केली जाते. पण, विक्रेते दंडाची रक्कम भरून आपले सामान पुन्हा सोडवतात आणि त्या ठिकाणी पुन्हा दिसून येतात.


फोर्ट येथील गर्दीच्या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्री  फेरीवाल्यांची संख्या जास्त आहे. बोरा बाजार, शेअर मार्केट इमारतीसह इतरत्र फेरीवाले दिसून येतात. सरबत, वडापाव, दाबेली, डोसा, इडली प्रमाणे पाणीपुरीवाले देखील अधिक संख्येने आहेत. पाणीपुरी विक्रेते कोणते पाणी उपयोगात आणतात हा मोठा प्रश्न आहे. अनारोग्यकारक पद्धतीने चाट पदार्थ तयार केले जातात. पण, तिथेही कोणाचे लक्ष नसते. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा अभाव आहे. पाणीपुरीच्या वापरातील पुऱ्या कुठे, कशा बनवल्या जातात याची कोणालाही माहिती नसते. तरीही मुंबईत उघडपणे त्याची सर्वत्र विक्री केली जाते. तिथेही खाद्य सुरक्षा नियम कधीही पाळले जात नाही. मुंबईतील फोर्ट येथील बोरा बाजारात प्रवेश केल्यापासूनच खाद्य विक्रेते दिसून येतात. येथील आजूबाजूच्या मार्गावर या फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडलेले दिसून येते. जीपीओ कडून ओल्ड कस्टम हाऊस कडे जाणारा रस्ता, बोरा बाजारातून फ्लोरा फाउंटन पर्यंतचा रोड तिथून कुलाबापर्यंतचा रस्ता सीएसएमटी पर्यंतचा रस्ता हा फेरीवाल्यासाठी अनुदान दिल्यासारखेच वाटत आहे. सर्वच प्रकारच्या फेरीवाल्यांनी फुटपाथ, रस्ते अडवून ठेवले आहेत. त्यात खाद्यपदार्थ विक्रेत्यांची संख्या भरमसाठ आहे. न्यू एक्सेल्शियर थेटर जवळ देखील फेरीवाले दिसून येतात. या उघड्यावरच्या लस्सी, ताक, फळांच्या सरबतांच्या दर्जाविषयी कोणतीही शाश्वती नाही. त्यातील पाणी, फळांचा दर्जा हा सगळा भाग स्वच्छतेचे किती निकष राखणारा आहे याविषयी मनात भीती आहे. कारण, अनेक ठिकाणी किमती अत्यंत कमी असल्याने दर्जा विषयी संशय मोठ्या प्रमाणात निर्माण होतो.

येथे एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येते ती म्हणजे गटाराच्या बाजूला उभ्या केलेल्या गाड्या, उघडे अन्नपदार्थ एकंदरीतच तेथे  माशांचे प्रमाण तेथे मोठ्या प्रमाणात असल्याने उघड्यावरच्या अन्नपदार्थांवर माशा घोंगावत असतात. तसेच रस्त्यावरची धूळ, गटारातून काढून ठेवलेला कचरा, रस्त्याच्या बांधकामांचे सिमेंट डेब्रिजचे ढीग असे असूनही गाडीवरच्या पदार्थांचा आस्वाद घेत अनेक जण दिसून येतात. 

खाद्यपदार्थ तयार करण्यापूर्वी भाज्या धुवून घेणे वगैरे अपेक्षा तर दूरचीच गोष्ट. मात्र, कचऱ्याच्या पिशव्या आणि डब्यांमध्ये कचरा टाकून तोच हात परत अन्नपदार्थाला लावला जातो. हात धूत बसायला इथे कोणाला वेळ नसतो. एकामागून एक ऑर्डर येत राहतात आणि हात चालत राहतात. काही सँडविच वाले, चाटवाले, बटाटे उकडून घेऊन येतात. तर काही वेळा ते स्टॉलवरच उकडले जातात. गॅस, स्टोव्ह, शेगड्या वापरण्याची परवानगी नसताना देखील हे स्टॉलवाले मात्र रस्त्यावरच शेगड्या पेटवून त्यावर खणखण आवाज करत ग्राहकांना आकर्षित करत असतात. दिवसाच्या शेवटी सगळा पसारा घरी जाताना उरलेला कचरा हा गाडीच्या, स्टॉलच्या आजूबाजूला तसाच पडलेला असतो.

बर्फ, सरबत, फालुदाच्या गाड्या यामध्ये वापरले जाणारे सरबते, कधीही ब्रँडेड नसतात. काचेच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये ही सरबते भरून ठेवली असतात. त्यामुळे ही सरबते कोणती आहेत त्याचा कोणालाही पत्ता लागत नाही. तसेच बर्फही कसला वापरला जातो त्या बर्फाची वाहतूक कशी होते याकडेही ग्राहकांचे लक्ष नसते. काही वेळा ही सरबते, बर्फाचे गोळे खाल्ले असता नंतर घसा खवखवतो. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्याकडे बऱ्याच जणांचा कल असतो. मळकट फडक्याला हात पुसणे. तेच हात नंतर पुन्हा भाज्यांना, अन्नपदार्थांना लावणे किंवा त्याच हाताने बर्फाचा गोळा तयार करून देणे हे हमखास दृश्य दिसून येते. कोणीही ग्लोज घालून स्टॉलवर, गाड्यांवर किंवा फूड स्टॉलवर काम करताना दिसून येत नाही.

महानगरपालिका, एफडीए अशा सर्व यंत्रणांना हे माहीत असूनही या यंत्रणा याकडे कानाडोळा करतात. त्यामुळेच अस्वच्छ वातावरणात तयार केलेल्या पदार्थांची खुलेआम विक्री मुंबईत होत आहे. तिथे लक्ष द्यायला सरकारी यंत्रणा पुढे येत नाहीत. परिणामी, गल्लो-गल्ली मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ होताना दिसून येत आहे. (लेखक क्राईम रिपोर्टर आहेत.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या