अनेक टीव्ही मालिकांमध्ये तंत्र मंत्र, भूतबाधा यांसारखे प्रकार दाखवून प्रेक्षकांमध्ये चुकीचे संदेश पसरवले जात आहेत. परिणामी, भोंदूगिरीला प्रोत्साहन मिळत आहे. महिला जास्त प्रमाणात मालिका बघत असल्याने मालिकांचा प्रभाव नकळतपणे महिलांवर पडतो. परिणामी, महिला अशा प्रकारांवर जास्त विश्वास ठेवतात. खरेतर अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अशा मालिका बंदच करायला हव्यात.
-दादासाहेब येंधे
सध्या महाराष्ट्रातील बहुतेक खेडेगावांमध्ये तसेच शहरांमध्ये देखील टीव्हीवर मालिका आवडीने पाहिल्या जातात. काही मालिका भडक नाट्याने भरलेल्या, सूड भावना उभारणाऱ्या अशा असतात. एक तर श्रीमंत लोकांच्या कुटुंबातील कट- कारस्थाने फारच वाईट पद्धतीने दाखविले जातात. खेड्यातले सामान्य लोक जर या मालिका चवीने पाहत असतील तर गावागावांमध्ये जो हिंसाचार व गुन्हे वाढले ते यामुळेच वाढलेत की काय असे देखील वाटते.
सध्या बऱ्याच टीव्ही मालिका अंधद्धेला खतपाणी घालत असल्याचे दिसून येते. अनेक मालिकांमध्ये तंत्र मंत्र, भूतबाधा यांसारखे प्रकार दाखवून प्रेक्षकांमध्ये चुकीचे संदेश पसरवले जात आहेत. परिणामी, भोंदूगिरीला प्रोत्साहन मिळत आहे. महिला जास्त प्रमाणात मालिका बघत असल्याने मालिकांचा प्रभाव नकळतपणे महिलांवर पडतो. परिणामी, महिला अशा प्रकारांवर जास्त विश्वास ठेवतात. खरेतर अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अशा मालिका बंदच करायला हव्यात.
आजच्या विज्ञान युगातही मालिकांमधून वास्तुदोष, करणी, ग्रहण काळातील नियम, अंधभक्ती तसेच विविध ग्रहांची भीती दाखवून अंधश्रद्धेचे समर्थन केले जात आहे हेच मुळी चुकीचे आहेत.
कोणतीही मालिका पाहिली की, तिचा हेतू सरळ नसून त्यामागे नक्कीच काहीतरी कट, कारस्थान असणार असं सारखं सारखं त्या मालिका पाहताना वाटतं. महिलाच महिलांच्या शत्रू दाखवणं आता बंद करायला हवं. सारखं सारखा नकारात्मक दाखवण्याचा हेतू तरी काय? हे असंच नेहमी चांगल्या माणसांना भोगत राहावं लागणार, असं काहीतरी दाखवणारं कथानक दाखवणार यात दिसते. लोक निष्क्रिय व्हावेत हा हेतू त्यामागे आहे असे वाटते.
यामध्ये एक सतत अन्याय सहन करणारी स्त्री दाखवायची, ती कधीच काहीच प्रतिकार करत नाही. हे असंच चालू राहिलं पाहिजे अशी कथाकाराची इच्छा मालिकांतून दिसते. बऱ्याच स्त्रिया आज नवीन विचार करत आहेत. तरुण मुली गावाकडील घरातील सगळ्या अडचणींवर मात करून उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व क्षेत्रात गावातील स्त्रिया देखील पुढे आहेत. स्वतःच्या पायावर बचत गटांच्या माध्यमातून त्यात काहीतरी करू पाहत आहेत. हे प्रत्यक्षातलं चित्र मालिकांमधून का दिसत नाही? सासू- सून हेवेदावे, कुटुंबकलह यातून जरा बाहेर पडणे गरजेचे आहे. तरुण-तरुणींना हे असलं आवडत नाही. पुरुष देखील आता बदलू पहात आहेत. हे का मालिकांमधून दाखवले जात नाही? या सर्व मालिकांमध्ये फक्त आणि फक्त सूड घेण्याचाच प्रकार कायम दाखवला जातो. एक खलनायक सतत त्या एका कुटुंबाच्या मागे लागलेला असतो. त्याला दुसरा उद्योगच नसतो. फक्त तेवढेच काम. प्रत्यक्षात इतकं भीषण वास्तव असतं का?
सध्या काही वाहिन्या भूत, प्रेत, नागीण, मागचा जन्म, पुढचा जन्म इत्यादी सर्व गोष्टी छान रंगवून मालिकांमधून दाखवतात. लोकांच्या अंधश्रद्धा वाढाव्यात हीच इच्छा यामागे दिसत आहे. एका मालिकेत बहीणच बहिणीची वैरी दाखविली आहे. स्वतःला मूल नसणारी स्त्री कायद्याने मूल दत्तक घेऊ शकते, पण, असं दाखवलं जात नाही. बहिणाचा अंत दाखवल्याने टीआरपी वाढतो. तो कसा सोडायचा.? शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, दुष्काळ हे काही दाखवले जात नाही. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे सारखे समाजसेवक काहीतरी करू पाहत आहेत ते का मालिकांमधून, कथानकांमधून दाखवले जात नाही. दुष्काळामुळे खेडी ओस पडली आहेत हे सर्व प्रश्न मालिकांमधून दाखवले जाणे गरजेचे आहे.
Photo:google





0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.