तुम्ही केमिकलने पिकवलेले आंबे खात आहात का..?
-दादासाहेब येंधे
उन्हाळ्यात आंबा हा फळांचा असलेला राजा अनेकांच्या ताटात दिसू लागतो, जाहिरातींचे पेव फुटू लागते. बाजारात पिकवलेले आंबे सहज उपलब्ध असतात. निसर्गाच्या सर्वात स्वादिष्ट फळांमध्ये एक असलेल्या आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम असा काळ आहे. भारतात जेथे आंब्याला फळांचा राजा मानले जाते, तिथे आंब्याचा आस्वाद मँगो लस्सी, मँगो शेक आणि आमरस सारख्या विविध स्वरूपांतून घेतला जातो. मात्र, अनेकांच्या मनात प्रश्न असतो की, आरोग्यासाठी नेमका कोणता आंबा चांगला आहे? आपण विकत घेत आहोत तो आंबा रासायनिक प्रक्रिया करून पिकवलेला तर नाही ना?
आंबा लवकर पिकावा म्हणून अशाप्रकारे केमिकलच्या पिशव्या पेटीमध्ये ठेवल्या जातात.
यंदा अवकाळी पडलेल्या पावसामुळे आंब्याचे उत्पादन घटले असून बाजारात आवक कमी झाली आहे. याचाच फायदा घेत काही नफेखोर व्यापारी रसायनांचा वापर करून कच्चे आंबे पिकवत असल्याचे समोर येत आहे. काही व्यापारी आंबे पिकवण्यासाठी 'कॅल्शियम कार्बाईड' आणि 'डायमंड रायप इथिलिन' यासारखी धोकादायक रसायने वापरत आहेत. वैद्यकीय तज्ञांच्या मते अशी फळे खाल्ल्याने उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि दीर्घकाळात गंभीर आजार उद्भवू शकतात. पोलिसांनी देखील आवाहन केले आहे की, केवळ चमक किंवा रंग पाहून आंबा खरेदी करू नका. सेंद्रिय किंवा आर्गोनिक लेबल असलेल्या आंब्याची देखील नीट खातरजमा करूनच आंबा खरेदी करा.
बाजारात पिवळसर, रसाळ आंब्याचे ढीग लागलेले असतात. पण, या मनमोहक रंगामागे नकळतपणे शरीराला घातक ठरू शकणारा धोका लपलेला असतो. जो आपल्याला माहित नसतो. कारण आजकाल अनेक व्यापारी आंबे लवकर पिकवण्यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर करतात. रासायनिक पदार्थांपासून पिकवलेले आंबे हे दिसायला खूप सुंदर दिसतात. पण, त्याचा शरीरावर गंभीर परिणाम होतो. अशा रासायनिकरित्या पिकवलेल्या आंब्यांचा तुम्ही बळी ठरू नये म्हणून काही चाचण्या तुम्ही घरीच करून पाहू शकता. आंबा चांगला आहे की नाही हे तपासून शकता.
आंबा पाण्यात टाका- आंबा पाण्यात टाकला तर सहज बुडतो. जर तो नैसर्गिकरित्या पिकवलेला असण्याची दाट शक्यता असते. पण, जर आंबा पाण्यावर तरंगला तर त्यात रासायनिक प्रक्रियेचा वापर झालेला आहे हे समजावे. कारण रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे जास्त हलके, फुगीर आणि आतून पोकळ असतात. कधीकधी आतून काळे देखील निघतात.
आंब्याचा रंग तपासा- रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा रंग अतिशय गडद आणि एकसंध असतो. तर नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यामध्ये थोडेसे डाग, थोडी हिरवळ आणि रंगात विविधता दिसून येते. शिवाय रासायनिक आंब्याचा सुगंध कमी असतो आणि तो कृत्रिम आहे असे वाटते.
आंब्याचा गर तपासा- रासायनिक पद्धतीने पिकवलेला आंबा कापल्यावर त्याची साल आणि गर यात एक प्रकारचा अंतराचा भाग असतो. गराचा रंग पिवळसर असूनही तो जरा कृत्रिम वाटतो आणि गर नाजूक न वाटता थोडासा कठीण किंवा कोरडा वाटतो. नैसर्गिक आंबा कापल्यावर गर रसाळ आणि एकसंध असतो.
आंब्याची चव- रासायनिक आंब्याची चव तोंडाला थोडीशी झणझणीत किंवा आंबटसर वाटते. तर नैसर्गिक आंब्यामध्ये गोडसर रसाळ चव आणि सुगंधित असतो. आंबा खाल्ल्यावर जर काही वेळाने घशाला कोरड पडत असेल किंवा घसा खवखवत असेल तर त्यावर रासायनिक प्रक्रिया करून आंबा पिकवला आहे असे समजावे.
उन्हाळ्यात प्रत्येकाने आंब्याचा आस्वाद घ्यायलाच हवा. पण, तो नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे की नाही हे ओळखणे देखील तितकेच गरजेचे आहे. कारण रसायनमुक्त फळांचा वापर केल्यास तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि चव देखील चांगली मिळेल.





0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.