Ticker

10/recent/ticker-posts

पोलिस दलाला सॅल्युट…

पोलिसांतील कोरोना योध्यांना सलाम...

-दादासाहेब येंधे 

राज्यात कोरोना संसर्गामुळे उदभवलेल्या स्थितीत आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी आणि पोलीस विभाग एखाद्या योद्ध्यासारखे लढताहेत. सर्वजण झोकून काम करताना दिसून येत आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिक कोरोना रुग्णाच्या संपर्कात येण्यापासून टाळण्यासाठी सामाजिक अंतर राखण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असताना दुसरीकडे रुग्णालयांमधील डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी वर्ग कोरोना रुग्णाच्या संपर्कात असून २४ तास त्यांच्या सेवेत व्यस्त आहेत. यात आणखी सर्वात महत्त्वाची भूमिका आज आपले पोलिस दल पार पाडत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.



रस्त्यारस्त्यांवर, गल्लोगल्ली गस्त घालत पोलीस कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आखत आहेत. सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत.

कोरोनामुळे मुंबईसह महाराष्ट्रात 'लॉक डाऊन' यशस्वी करण्यासाठी पोलीस अक्षरशः रस्त्यावर उभे आहेत. रस्त्यावर उतरू नका, आपल्या घरातच राहा असे जनतेला हात जोडून सांगत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या लढाईतून पोलिस वजा झाले तर काय परिस्थिती होईल याची साधी कल्पनाही करवत नाही. असे झाले तर आपल्याकडे वुहान वा न्यूयॉर्कपेक्षा वेगळी परिस्थिती नसेल हे येथे नमूद करावेसे वाटते. आज प्रत्येकाला स्वतःचा जीव प्रिय असताना पोलीस अधिकारी-कर्मचारी मात्र डोळ्यात तेल घालून खडा पहारा देत आहेत. कोरोना वाहणाऱ्या जिल्हा, तालुका आणि शहर यांच्या सीमेवरच कोरोना वाहकांना रोखण्याचं काम पोलिसांकडून केले जात आहे.

कित्येक नागरिक तर सोशल डिस्टंसिंग नियमांचे उल्लंघन करू नका असे सांगू पाहणाऱ्या पोलिसांवरच ठीकठिकाणी हल्ले करत आहेत. काही ठिकाणी दगडफेकही झाली आहे. यात हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. काही पोलीस कोरोना बाधित भागात राहत असल्याने स्वतःला जाणीवपूर्वक आपल्या कुटुंबियांपासून दूर ठेवत आहेत. बरेच पोलीस कोरोना बाधितही झाले असून कित्येक जणांचा या रोगाने बळीही घेतला आहे. सर्वसामान्यांनी आता किमानपक्षी या कोरोना योद्ध्यांसाठी समजुतीची भूमिका घेणे गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रत्यक्ष सहभाग घेता येत नसला तरी कोरोनाशी लढणाऱ्यांना सहकार्य केले, नियमांचे पालन केले तरीही या संकटाची किनार काही प्रमाणात पुसट होत जाईल.

प्रत्यक्षात आज नागरिकांमध्ये कोरोनाचे गांभीर्य दिसून येत नाही. लोक विनाकारण घराच्या बाहेर पडत आहेत. बाजारात गर्दी करत आहेत. सुरक्षित वावराचा विसर पडला आहे. असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. नियम मोडणाऱ्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनविणे अशी कामे करताना पोलिसांचा त्यांच्याशी थेट संपर्क येतो. यामुळे पोलिसांनाही कोरोनाची लागण झपाट्याने होत आहे. त्यामुळे पोलिसांनाही शासकीय सेवेतून अधिकाधिक मदत मिळावी त्यांनाही आरोग्यसेवा वेळेवर मिळावी ही अपेक्षा आहे.

लॉक डाऊन दरम्यान पोलीस महत्त्वाचे ठिकाण, मुख्य रस्ते आणि विविध चौकात तैनात आहेत. ऊन-पावसाची तमा न बाळगता नाही ते आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. वाहनांची आणि अनावश्यक बाहेर पडणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करत आहेत. प्रसंगी त्यांच्यावर कार्यवाही केली जात आहेत. अनेक पोलिस कर्मचारी कित्येक दिवस आपल्या घरी गेलेले नाहीत.

पोलीस कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या राज्यातील, परिसरातील नागरिकांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहेत. त्यामुळेच, सर्वसामान्य नागरिक म्हणून आपणही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, या उद्देशाने प्रत्येक ठिकाणी पोलिसांचे जोरदार स्वागत करणे गरजेचे आहे. त्यांच्याप्रती सहानुभूती दाखविणे गरजेचे आहे. त्यांचे मनोबल वाढविणे गरजेचे आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता केवळ नागरिकांना या रोगाची बाधा होऊच नये म्हणून रस्त्यावर उतरलेल्या या कोरोना योद्ध्यांना सलाम...!






























































समस्त जनहो, पोलीस दलाला काय काय कामं करावी लागतात हे वरील फोटोंतून कळले असेलच.  







टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या

Please do not enter any spam link in the comment box.